इंग्रजी आमदानी 2
पुण्याचे श्री. गोपाळराव जोशी यांनी आपल्या पत्नीस अमेरिकेत पाठवण्याचे धाडस केले. आनंदीबाई त्यांचे नाव. मराठीत त्यांचे चरित्र आहे. काही सुंदर चरित्रांपैकी ते एक आहे. आनंदीबाई अनेरिकेत गेल्या. त्या डॉक्टर झाल्या. तिकडेही त्या हिंदी पद्धतीने राहत. भारतीय विचार, राहणी यांविषयी त्यांनी आदर उत्पन्न केला. तिकडील भगिनींना पुरणपोळी वगैरे करुन खायला द्यायच्या. त्यांनाही कधी साडी नेसवायच्या. अती मनमिळाऊ, कष्टाळू आणि सद्गुणी. परंतु डॉ. आनंदीबाईंना देवाने आयुष्य कमी दिले. त्या लौकरच देवाघरी गेल्या. एक निर्मळ सुगंधी फूल सेवा करणार तोच सुकून गेले !
स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे, म्हणून प्रचार सुरु झाला. काँग्रेसची स्थापना झाली होती. काँग्रेसच्या अधिवेशनावर सामाजिक सुधारणांचे अधिवेशन न्या. रानडे भरवू लागले. सामाजिक सुधारणेच्या अधिवेशनाचे ते प्राण होते. त्यांची ती भाषणे अती उद्बोधक आहेत. आगरकर स्त्रियांचा आत्मा मुक्त व्हावा म्हणून सर्वशक्तींनिशी लढत होते. तिकडे स्वामी दयानंदांच्या स्फूर्तीने स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न असा पुढे येत होता; तर बंगालमध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी पुनर्विवाहाचा प्रश्न हाती घेतला. स्त्रियांना पुनर्विवाहाची का अनुज्ञा नसावी ? राजा राममोहन राय यांनी बंगालभर नवविचारांची गुढी उभारली. सतीसारख्या चाली बंद पाडायला ब्रिटीश सरकारला त्यांनी नैतिक पाठिंबा दिला. पंरतु स्त्रियांचा सर्व प्रकारे आत्मा मुक्त व्हावा म्हणून प्रयत्न हवे होते. सहस्त्रमुखी प्रयत्न हवे होते. बालविधवांना का मरेपर्यंत संन्यासाची दीक्षा देऊन सक्तीने अंधारात ठेवायचे ? तो कठोरता अमानुष होती. विद्यासागर कळवळले. शास्त्राधार मिळावा म्हणून कलकत्त्यास रात्रदिवस ते स्मृतिग्रंथ बघत राहिले. आणि एके दिवशी पहाटे त्यांना स्त्रियांना पुनर्विवाहाची परवानगी देणारे वचन आढळले. त्यांच्या आनंदास पारावार राहिला नाही. विद्यासागर पुनर्विवाह रुढ करायला उत्सुक होते. तळमळीने म्हणायचेः “माझी मुलगी विधवा झाली तर तिचा पुनर्विवाह करीन नि समाजाला उदाहरण घालून देईन.” महाराष्ट्रातही हे विचार आले. आणि आण्णासाहेब कर्वे यांनी पुनर्विवाह केला. हरी बल्लाळ परचुरे यांनी पुनर्विवाह केला. हे दोघेही धर्मवीर दापोली तालुक्यातलेच. दोघांवर बहिष्कार पडले. महर्षी कर्वे पाच वर्षांपूर्वी म्हणालेः अजून मुरुडला गेलो तरी निराळे जेवायला बसवतात !” मग त्या काळात परिस्थिती कशी असेल ? इंग्रजी वाङमयाने नवीन वाङमयप्रकार येत होते. कादंबरी हा त्यांतलाच प्रकार. कादंबरी समाजात क्रांती करु शकते. हरिभाऊंच्या ‘पण लक्षात कोण घेतो’ या कादंबरीने महाराष्ट्रीय जनतेचे हृदय हलवले. बाबा पदमजींची ‘यमुनापर्यटन’ कादंबरी यापूर्वी बरीच वर्षे प्रसिद्ध झाली होती. तीही एका विधवेचीच करुण कथा. परंतु ती कथा मागे पडली. एका ख्रिश्चन झालेल्या बंधूने लिहिलेली म्हणून ती कादंबरी मागे पडली असले, परंतु सामाजिक प्रश्न हाती घेऊन ती लिहिलेली होती. अशा प्रकारे स्त्रियांची स्थिती सुधारावी म्हणून साहित्यिकही पुढे य़ेऊ लागले.