वेदकाल 1
आपला देश स्वतंत्र झाला आहे. सर्वांच्या विकासाला आता वाव हवा. कोणाचा कोंडमारा नको. आत्म्याची अनंत शक्ती सर्व क्षेत्रांत सर्वांनी प्रकट करावी. स्त्रियांनीही केवळ संसारातच रमू नये. संसार तर नेटका करावाच, परंतु स्वतःचा संसार राष्ट्राच्या संसारातही जोडावा. अलग असणे म्हणजे माया. सर्वांशी मिळून असणे म्हणजे सत्य. हेच ब्रह्मज्ञान. भारतीय नारींनी हे लक्षात ठेवावे.
आज स्वतंत्र भारतात सात्त्विक अभिमानाने उभे असताना मला शेकडो शतकांतील भारतीय नारींचा इतिहास दिसत आहे. भारतीय इतिहासात तुम्हीही भर घातली आहे. भारतीय संस्कृती तुम्ही वाढवली, सांभाळली. तुमच्या इतिहासाचा धावता चित्रपट दाखवू ? या माझ्याबरोबर.
तो बघा वेदकाळ. पाचसात हजार वर्षांपूर्वीचा काळ. आर्य़ आणि नाग यांच्या संमिश्रणाचा काळ. आर्य़ आणि एतद्देशीय यांच्या संघर्षाचा नि संग्रामाचा काळ. तो मोकळा काळ होता. स्त्रिया श्रमजीवनात रमत. त्या दळीत, कांडीत, विणीत. वयन्ती म्हणजे विणणारी, हा शब्द वेदांत येतो. घरात हातमागावर का तुम्ही विणीत होता ? तुम्ही श्रमाने मिळवीत होता म्हणून स्वतंत्रही होता. त्या वेळेस प्रेमविवाह होते. ‘उषेपाठोपाठ हा सूर्य तिची प्रेमराधाना करीत जात आहे, जसा पुरुष स्त्रीच्या पाठोपाठ जातो’ असे वर्णन येते. एक प्रियकर रात्री प्रियेच्या घराजवळ येतो. कुत्रा भुंकू लागतो. ‘अरे कुत्र्या, नको भुंकू’ असे तो प्रार्थितो. त्या काळात का वैवाहिक नीती आली ?
यमयमी संवादात बहीण भावांच्या लग्नाचा उल्लेख आहे. यमी यमाला म्हणतेः “पूर्वी तशी प्रथा असेल, परंतु आता नाही.” म्हणजे नवीन नियम आले. “सप्तमर्यादा कवयस्ततक्षुः” सात मर्यादा शहाण्या लोकांनी घातल्या, असे वेद सांगतो. वेदांतील स्त्रिया सुशिक्षित असत. त्यांनी सूक्ते रचली आहेत. वेदांत त्यांचा अंतर्भाव आहे. विवाह प्रौढपणी होत. कारण विवाहसूक्तातील मंत्र म्हणतातः “मुली, तू आता घराची स्वामिनी. सासूसास-यांना विश्रांती दे.” स्त्रीला प्रतिष्ठा होती. विवाहसुक्तांत सुंदर उपमा वधुवरांस दिलेल्या आहेत. वर ऋग्वेद तर वधू सामवेद. हा सामवेद म्हणजे संगीताचा वेद. संसारात संगीत आणणारी अशी ही नववधू आहे. स्त्री म्हणजे व्यवस्था, स्वच्छता, सुंदरता. वराला आकाश म्हटले तर वधूला पृथ्वी म्हटले. पृथ्वीप्रमाणे ती क्षमाशील. असा तुम्हा नारींचा वेदकालीन महिमा आहे. पुरुष द्युत खेळणारा म्हणतोः “सर्वत्र अपमान, घरी बायकोही बोलते.” स्वतंत्र वृत्तीची, स्वाश्रयी, कष्ट करणारी, ज्ञानी, अशी ही प्राचीन भारतीय स्त्री दिसते.