इस्लामाच्या आगमनानंतर 5
“शास्त्रीबुवा, पुरुषांनी पुनः पुन्हा लग्ने करावीत. एक बायको मेली, दुसरी ; ती मेली तर पुन्हा आणखी. परंतु शास्त्राने पुरुषांना ही परवानगी दिली. स्त्रियांना का दिली नाही ? त्यांना का मरेतो वैधव्य ?” शास्त्रीबुवा निःस्पृह. ते म्हणालेः “स्मृती पुरुषांनी लिहिल्या. त्यांनी पुरुषांची सोय पाहिली. स्त्रियांनी लिहिल्या असत्या तर स्त्रियांनी स्वतःच्या भावनांना अनुरुप लिहिले असते.” सामशास्त्र्यांनी बालविधवांच्या पुनर्विवाहास संमती दिली होती. मोरोपंत, रामशास्त्री ही माणसे काळाच्या पुढे होती, थोर. विचारवंत होती म्हणाना ! मानवतेचा उदार धर्म त्यांच्याजवळ होता.
महाराष्ट्रात जरी स्त्रियांना एक प्रकारचा मोकळेपणा होत, तरी सर्वसाधारणपणे त्यांना जीवनात खालचेच स्थान. विवाह लहानपणीच व्हायचे. स्वतःची सुखदुःखे मनातच राहायची, बायकांच्या ओव्यांत हे चित्र आहे-
‘लेकीचा जन्म, नको होऊ सख्याहरी
जन्मवेरी ताबेदारी, परक्याची।।
लेकीचा जन्म, जन्म घालून चुकला
बैल घाण्याला जुंपला, जन्मवेरी।।’
देवा, मुलीचा जन्म नको देऊ. जन्मवेरी परक्याची ताबेदारी. मरेपर्यंत बैलाप्रमाणे राबायचे. जणू पोटाला चार घास आणि अंगावर वस्त्र, एवढे तिला मिळाले म्हणजे झाले. तिची कशावर सत्ता नाही. देवाधर्माला दोन दिडक्या हव्या असल्या तरी त्या मागाव्या लागायच्या. जरा नवर्याची मर्जी गेली की अपमान, मारहाण. एकंदरीत जीवनाचा कोंडमाराच !
मी काही जुनी गाणी ऐकली होती. त्यांत गावच्या पाटलासमोर नवराबायकोचे भांडण आले आहे, असे सुंदर वर्णन आहे. ती बाई म्हणतेः “पाचमुखी परमेश्वर असतो. न्याय द्या. हा कसला नवरा ! डोक्याचे पागोटे तीन-तीनदा सोडतो, बांधतो. मिळवायची अक्कल नाही. माझे माहेर केवढे ! याला काही शिकवा.”
नवरा आपलीही बाजू मांडतो व म्हणतोः “माहेरची ऐट ही तीनतीनदा सांगते. माझा का हिने अपमान करावा ?” वगैरे. म्हणजे गावातील अशी भांडणे पंचांसमोर जात की काय ? इंग्लंडमध्ये अशा गोष्टी घडत, असे इतिहास सांगतो. भांडखोर बायकोला नवर्याने विहिरीत दोरीला बांधून सोडावे, पाण्यात बुडवावे, वर काढावे, नाकातोंडात पाणी दवडावे असे प्रकार तिकडे होते. नवर्याला असा छळ करण्याचा हक्क असे. आपल्याकडे हक्क होता की नव्हता, प्रभू जाणे. परंतु नवरे बायकांना मारायचे. रस्त्यांतूनही मारीत न्यायचे. त्यांचा तो हक्क ! अजूनही अशा समजुती आहेत. स्त्रियांची सुखदुःखे स्त्रियाच जाणत. इतर ठिकाणांपेक्षा महाराष्ट्रात मोकळेपणा दिसतो. परंतु स्त्रीच्या स्वतंत्र आत्म्याचे वैभव ही निराळीच गोष्ट. ती प्रभा अजून फाकायची होती.