Get it on Google Play
Download on the App Store

चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग

१.
मंगळवेढयाभोंवतें कुसूं घालावया । महारासी न्यावया दूत आले ॥१॥
महारासमागमें चोखा मेळा गेला । काम तें लागला करावया ॥२॥
सर्वकाळ वाचे विठ्ठलनाम छंद । आठवी गोविंद वेळोवेळां ॥३॥
चार महिने याचि रीतीनें लोटिले । कुसूं कडाडिलें अकस्मात्‌ ॥४॥
तयाखालीं महार बहु चूर झाले । चोख्यानें अर्पिले प्राण देवा ॥५॥
देव म्हणे नाम्या त्वां जावें तेथें । त्याच्या अस्थि येथें घेऊनि याव्या ॥६॥
नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या । विठ्ठलनाम जयामध्यें निघे ॥७॥
२.
ऐकोनिया कानीं अचळीं भराव्या । आणोनियां द्याव्या आम्हापाशीं ॥१॥
शालिवाहन शके बाराशें साठ । प्रमाथी नाम स्पष्ट संवत्सर ॥२॥
वैशाख वद्य पंचमी सुदीन । गुरुवारीं प्रयाण करी चोखा ॥३॥
चोखा माझा जीव चोखा माझा भाव । कुळ धर्म देव चोखा माझा ॥४॥
काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति । मीहि आलों व्यक्ति तयासाठीं ॥५॥
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान । तया कधीं विन्घ पडों नेदीं ॥६॥
नामदेवें अस्थि आणिल्या पारखोनी । घेत चक्रपाणी पितांबरीं ॥७॥
३.
देवाचे अंचळीं उठिला गजर । विठ्ठलनामें अंबर गर्जतसे ॥१॥
संत समुदाय पताकांचे भार । लोटले गजर ऐकावया ॥२॥
वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार । नामाचा गजर महाद्वारीं ॥३॥
ऐसी आनंदानें नामाच्या गजरीं । दिली महाद्वारीं समाधि त्या ॥४॥
अस्थि निक्षेपण आपुलीया हातें । करूनि अनंतें पाषाण ठेवी ॥५॥
राही रखुमाई कुर्वंडी करिती । सत्यभामा आरति ओंवाळीत ॥६॥
नामा म्हणे धन्य विठोबाची कृपा । जाईन माझ्या बापा ओंवाळून ॥७॥

संत नामदेवांचे अभंग

अभंग संग्राहक
Chapters
श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद शिवस्तुति तुळसीमाहात्म्य चोवीस नामांचा महिमा गंगामाहात्म्य कलि प्रभाव प्रारब्धगती समाधियोगनिषेध हरिश्चंद्रराजाचें चरित्र श्रीयाळ चरित्र उपमन्यूचें चरित्र भीष्मप्रतिज्ञा रावण मंदोदरी संवाद नक्र उद्धार चोखोबाचे स्त्रीचें बाळंतपण चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग विरहिणी भूपाळ्या संत नामदेवांचे अभंग - भेट संत नामदेवांचे अभंग - मागणें संत नामदेवांचे अभंग - संतस्तुति संत नामदेवांचे अभंग - जनाबाईचा निश्चय संत नामदेवांचे अभंग - भाट संत नामदेवांचे अभंग - आऊबाईचे अभंग संत नामदेवांचे अभंग - लाडाईचा अभंग