Get it on Google Play
Download on the App Store

रावण मंदोदरी संवाद

१.
मंदोदरी सांगे रावणाप्रती । स्वप्न देखिलें म्यां मध्यरातीं । नेणों वान्नर मिळाले किती । शिळा सागरू बांधिला ॥१॥
दोघे धनुर्धर वीर वान्नर । उतरोनी आले पैलसागर । एकापरीस एकगा वीर । ते बडीवार बोलताती ॥२॥
नेणों त्याचा वळीया आला । लंकेमोवता वेढा घातला । सभामंडप उडोनि नेला । जो केला त्रिकुटेसी ॥३॥
लंकेभोंवता रुधिराचा पूर । रणीं पडिला कुंभकर्ण वीर । तो तुमचा सखा सहोदर । निद्रा करी सामास ॥४॥
सत्य तुझीं छेदील दश शिरें । येणें रामें रणरंगधीरें । लंका जाळोनी केली जोहरें । अंबरीं तुरे गर्जताती ॥५॥
हें स्वप्न सत्य होईल जाणा । लंका दान बिभीषणा । शरण जाईं रघुनंदना । नामयाच्या स्वामीसी ॥६॥
२.
विनंति करी मंदोदरी । परिसा स्वामी दशकंधरि ॥१॥
वांयां आणिली जानकी घरीं । लाज झाली तिहीं लोकीं ॥२॥
मज पाहातां हे विवसी । क्षय आणिला कुळासी ॥३॥
आभिलाषितां पर सती । हे तों  नव्हे राजनीती ॥४॥
कोण आमुचा हितकरू । सांगे निर्मळ विचारू ॥५॥
नामया स्वामीसी शरण जावें । स्वहित आपुलें करावें ॥६॥
३.
ज्यातें ध्यानीं ध्याती योगी । तो मज येतो भेटीलागीं ॥१॥
तया रामासी विन्मुख होणें । जळो जिणें लाजिरवाणें ॥२॥
व्रतें तपें ज्या साधिती । तो मज नित्य ध्यातो चित्तीं ॥३॥
जो अगम्य वेद पुराणां । तो मज येतो समरंगणा ॥४॥
नामया स्वामीच्या दर्शनें । मग कैंचि भवबंधनें ॥५॥
४.
मंदोदरी करी विनंती । परिसा स्वामी लंकापती ॥१॥
सोडा रामाची अंतुरी । जंव तो राम आहे दुरी ॥२॥
उदकीं तारिले पाषाण । हा तो प्रताप नव्हे सान ॥३॥
झाला बिभीषण शाहाणा । देखोनी तुमच्या दुश्चिंतपणा ॥४॥
जाउनी रामासी भेटला । मृत्युपासूनि सुटला ॥५॥
नामयास्वामी रघुनंदन । वेगीं करावा प्रसन्न ॥६॥
५.
म्हणसी बिभीषण शाहाणा । परि तो महा नूर्ख जाणा ॥१॥
काय तो रामासी भेटला । अवघा रामचि नाहीं झाला ॥२॥
कोण हित केलें तेणें । राम नाकळीचि मनें ॥३॥
राम द्दष्टी देखतांची । पदवी न घेववे त्याची ॥४॥
म्हणशी झाला लंकापती । नाश पावेल कल्पांतीं ॥५॥
नामया स्वामीतें जिंकोन । आवघा रामचि मी होईन ॥६॥

संत नामदेवांचे अभंग

अभंग संग्राहक
Chapters
श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद शिवस्तुति तुळसीमाहात्म्य चोवीस नामांचा महिमा गंगामाहात्म्य कलि प्रभाव प्रारब्धगती समाधियोगनिषेध हरिश्चंद्रराजाचें चरित्र श्रीयाळ चरित्र उपमन्यूचें चरित्र भीष्मप्रतिज्ञा रावण मंदोदरी संवाद नक्र उद्धार चोखोबाचे स्त्रीचें बाळंतपण चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग विरहिणी भूपाळ्या संत नामदेवांचे अभंग - भेट संत नामदेवांचे अभंग - मागणें संत नामदेवांचे अभंग - संतस्तुति संत नामदेवांचे अभंग - जनाबाईचा निश्चय संत नामदेवांचे अभंग - भाट संत नामदेवांचे अभंग - आऊबाईचे अभंग संत नामदेवांचे अभंग - लाडाईचा अभंग