Android app on Google Play

 

तुळसीमाहात्म्य

 

१.
तुळसीविण ज्याचें घर । तें तंव जाणावें अघोर । तेथें वसती यम किंकर । आज्ञा आहे म्हणोनी ॥१॥
तुळसी वृंदावन ज्याचे धरी। त्यासी प्रसन्न श्रीहरी । तें वर्जिलें यमर्किकरीं । आज्ञा आहे म्हणोनी ॥२॥
तुळसीवृंदावना । जे करिती प्रदक्षणा । अंत्त-काळां होतां स्मरण । जन्ममरण नाहीं नामा ह्मणे ॥३॥

२.
तुळसीवृंदावन दर्शन । त्यासी वैकुंठीं गमन । लटिकें ह्मणे कोण । त्यासी आण केशवाची ॥१॥
तुळसीमाळा घाली गळां । त्या भेटे घनसांवळा । चतुर्भुज सहित कमळा । केशिराज प्रत्यक्ष ॥२॥
तुळसीरोपा घाली उदक । त्याचे हरती महादोष । ब्रह्मादिकां न कळे नि:शेष । जन्ममरण त्या नाहीं ॥३॥
तुळसीची देवा बहु प्रीति । आणिक पुष्पें न लागती । नामा म्हणे जी श्रीपति । हेचि भक्ति द्यावी मज ॥४॥

३.
तुळसी पुष्पांहूनि आगळी । वृंदावनीं ते मिरवली । देवें मस्तकीं वंदिली । वंद्य झाली तिहीं लोकां ॥१॥
तुळसी वंदाची माउली । अरे हे संतांची साउली । तुळसीपासीं वनमाळी । सदा रहात असे ॥२॥
तुळसी दळ भूमीवरी पडिलें । तें जरी मस्तकीं वंदिलें । कोटी तीर्थस्नान केलें । एवढें फळ नामा म्हणे ॥३॥

४.
उभें वृंदावन जयाचिये द्वारीं । होय तो श्रीहरि प्रसन्न त्या ॥१॥
तुळसीचें रोप लावील जो आणोनि । तया चक्र-पाणी न विसंबे ॥२॥
तुळसीचें काष्ठ जपमाळ करी । तयासि श्रीहरि प्रसन्न तो ॥३॥
तुळसीची कीर्ति अगाध पैं आहे । पंध-रीसि पाहे ह्मणे नामा ॥४॥

५.
तुळसीची सेवा घडे । रंगमाळा घालूं सडे ॥१॥
दूत्त न येती तयाकडे । हरिनामाची घरटी पडे ॥२॥
नामा ह्मणे हरि-एवढें । ब्रह्म वृंदावनीं सांपडे ॥३॥

६.
फुकाचिया तुळसी वहारे । ध्रुवासारिखें पद मागारे ॥१॥
एका विठ्ठला शरण जारे । जन्म वांयां कां दवडारे ॥२॥
नामा ह्मणे हा देवो पहा रे । विठ्ठ भक्तांचा ऋणियारे ॥३॥

७.
तुळसीचें हत्यार । वृंदावन दुर्ग थोर ॥१॥
तुळसीच्या दळीं । यम जिंकिला महाबळी ॥२॥
नामा ह्मणे बळिरे बळी । विठ्ठल आमचा भुजबळी ॥३॥

८.
उठोनियां प्रात:काळीं । तुळस वंदावी माउली । तुळस संतांची साउली । मुगुटीं वाहिली विष्णूनें ॥१॥
तुळस असे ज्याचे द्वारीं । लक्ष्मी वसे त्याचे घरीं । येवोनी श्रीहरि । क्रिडा करी स्वानंदें ॥२॥
तुळसीसी मंजुरा येतां । पळ सुटे यमदूतां । अद्वैत तुळस कृष्ण स्मरतां । नासे दुरित चित्ताचें ॥३॥
जे जे तुळसी घालिती उदक । ते नर पावती ब्रह्मसुख । नामा म्हणे पंढरीनायक । तुळसी जवळी उभा असे ॥४॥

 

संत नामदेवांचे अभंग

सुनीता
Chapters
श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद
शिवस्तुति
तुळसीमाहात्म्य
चोवीस नामांचा महिमा
गंगामाहात्म्य
कलि प्रभाव
प्रारब्धगती
समाधियोगनिषेध
हरिश्चंद्रराजाचें चरित्र
श्रीयाळ चरित्र
उपमन्यूचें चरित्र
भीष्मप्रतिज्ञा
रावण मंदोदरी संवाद
नक्र उद्धार
चोखोबाचे स्त्रीचें बाळंतपण
चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग
विरहिणी
भूपाळ्या
संत नामदेवांचे अभंग - भेट
संत नामदेवांचे अभंग - मागणें
संत नामदेवांचे अभंग - संतस्तुति
संत नामदेवांचे अभंग - जनाबाईचा निश्चय
संत नामदेवांचे अभंग - भाट
संत नामदेवांचे अभंग - आऊबाईचे अभंग
संत नामदेवांचे अभंग - लाडाईचा अभंग