मंदीचे डोळे 1
मंदी मोठी गोड मुलगी ! सर्वांना ती हवी-हवीशी वाटे. खेळकर आणि आनंदी. चपळ आणि उत्साही. खोड्या करील, उपयोगीही पडेल.
“मंदे, तुझे डोळे मला दे,” कुसुम म्हणायची.
“आणि तुझं नाक मला दे.” मंदी हसत म्हणायची.
मंदी शाळेत जाई. अजून लहान होती. तिचे वडील देवाघरी गेले होते. आईची एकुलती एक मुलगी, आणि घरची गरिबी. चार ठिकाणी चार धंदे मंदीची आई करी. कसाबसा निर्वाह चाले.
ऐके दिवशी काटेरी तारेवरुन मंदी उडी मारीत होती. परंतु तार पायांना जोराने लागली. गंजून गेलेल्या तारा, त्या विषारी असतात. मंदीचा पाय बरा होईना. शेवटी आईने तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी औषधोपचार केले. थोडे दिवस गेले नि पाय सुकत चालला.
“हे बघा, आता रोज यायला नको. हे आयोडिन देतो. ते दिवसातून दोन-तीन वेळा लावीत जा.” डॉक्टर म्हणाले.
“डॉक्टर, किति पैसे झाले ?”
“पैसे नकोत. असल्या हसर्या मुलीचे का पैसे घ्यायचे ? मंदे, आता रडू नको. पाय बरा होईल.”
मंदीला घेऊन ती माता घरी गेली. परंतु दोनचार दिवस गेले नि मंदीच्या डोळ्यांना धार लागली. ते सुंदर टपोरे डोळे; काळेभोर निर्मळ डोळे ! काय झाले ? कोणाची दृष्ट पडली?
आईने डॉक्टरांना जाऊन सांगितले. त्यांनी डोळ्यांत घालायला औषध दिले. परंतु एके दिवशी काय झाले, आई होती घाईत. डोळा तर दुखत होता.
“मंदे, औषध डोळ्यांत घालून मी जाते. तू पडून राहा मग. होतील बरे दोन दिशी. रडू नकोस.” आई म्हणाली. तिने पटकन बाटली आणली. मंदी निजली होती. आईने डोळ्यांत बाटलीतले औषध घातले. तो डोळ्यांचा भडका उडाला !