Get it on Google Play
Download on the App Store

भीती पळवणारा मंत्र 1

त्या गावच्या माळणी भाजीपाला घेऊन जेथे जेथे आठवड्याचा बाजार भरे तेथे तेथे जायच्या. मोठ्या उद्योगी नि मेहनती. जड टोपल्या घेऊन त्या चार चार कोस जायच्या. दिवे लागायला घरी परत यायच्या. मग चूल पेटवून भाकरी-तुकडा करीत. मुलांना जरा जवळ घेत.

पाचोर्‍याचा आठवडे-बाजार म्हणजे यात्राच असे. जिकडे तिकडे दुकानेच दुकाने ! एका बाजूला आपापल्या पाट्या घेऊन माळणी बसायच्या. आज त्या माळणींच्या रांगेत एक माळीदादाही भाजी घेऊन बसला होता. माळणी कुजबूजत होत्या. परंतु आता बोलायला सवड नाही. गि-हाईकांची ही पाहा गर्दी ! भाजी खपत आहे. पैसे जमत आहेत. वांगी, रताळी, घेवडा, गवार, कोबी, फुलवर, मेथी, चुका-नाना प्रकार येथे आहेत. कोथिंबिरीचा घमघमाट सुटला आहे.

इतक्यात, तो पाहा, एक मोठी पिशवी घेऊन आलेला मनुष्य भराभर हवी ती भाजी उचलीत आहे. चार वांगे घे, चार रताळी घे. कोथिंबिरीची जुडी उचल, लिंबे उचल, असे त्याने चालवले आहे. कोण आहे तो ? माळणी त्याला ‘घे बाबा नि जा’ असे म्हणत. काय करतील बिचार्‍या ? त्या माणसाचा काय हक्क या भाजीवर ? जणू त्याची ती कायमची वतनदारीच दिसत होती. त्या माळणी जणू त्याच्या साता जन्माच्या देणेकरी !

तो मनुष्य त्या माळीदादाजवळ आला. त्याच्याजवळ कोवळे लुसलुशीत मुळे होते. त्या माणसाच्या तोंडाला पाणी सुटले ! त्याने एक जुडी उचलली.

“खाली ठेवा ती जुडी. फुकट घ्यायचा काय अधिकार ? घेऊ नका जूडी. ठेवा खाली.” माळीदादा म्हणाला. माळणी बघत होत्या. त्यांना आश्चर्य़ वाटले. आता काय होते, म्हणून त्या बघत होत्या. त्या बायांदेखत झालेला हा अपमान त्या माणसाला सहन झाला नाही. आजपर्य़ंत कोणी त्याला असे बोलले नव्हते. तो ऐटीने म्हणालाः

“खाली ठेव म्हणतोस ? ही दुसरी घेतो बघ. तू मला कोण समजतोस ?”

“तुम्ही पोलीसदादा आहात.”

“याद राख.”