ज्याला ज्ञान, त्याला मान 2
चार तिकीटे घेऊन शेतकरी फलाटवर उभे होते. भगभग करीत गाडी आली. गाडीत ही गर्दी! परंतु कोणी तरी त्यांना आत घेतले. कोण होता तो ?
“दादा, तू होतास म्हणून ही तंबोरी फुटली नाही. नाही तर ती खाली पडती. वाडवडिलांची ही तंबोरी !” शेतकरी म्हणाला.
“तुम्ही एखादा अभंग म्हणा.”
“म्हणू ? तुम्हांला गो़डी आहे अभंगाची ?”
“मला फार आवडतात.”
त्या शेतकर्याने फारच सुंदर अभंग म्हटला. रघुनाथ डोळे मिटून ऐकत होता. अभंग थांबला. त्याने डोळे उघडले.
“तुम्ही काय करता ?” शेतकर्याने विचारले.
“मी सेवादलाचे काम करतो. रस्ते झाडतो. लोकांना शिकवतो. भेदभाव माजवू नका म्हणून सांगतो.”
“साधुसंतांनी हेच सांगितलं.”
इतक्यात एकाने हळूच तिकीट काढले व विचारलेः
“हे तिकीट बघा कोठलं आहे ते ?”
“पंढरपूरचं.”
“ठीक. आणि काय किंमत ?”
“साडेचार रुपये.”