ज्याला ज्ञान, त्याला मान 1
पंढरपूरची कार्तिकी यात्रा जवळ आली होती. व-हाड-खानदेशकडे भोळा भक्तीभाव फार. हजारो यात्रेकरु पंढरीच्या यात्रेला जातात. हजारो वारकरी निघतात.
ते एक लहान स्टेशन होते. ते पाहा शेतकरी. ते वारीला निघाले आहेत. खांद्यावर पताका आहेत. हातात टाळ आहेत. कोणाजवळ वीणा आहे. धुळे-चाळीसगाव रेल्वे लाईनवरचे ते स्टेशन. जामदे त्याचे नाव. गाडीची वेळ होत आली. घंटा वाजली.
“दे रे भाऊ लवकर तिकीट. गाडी येईल, दे.”
“पैसे आहेत का ?”
“आम्ही का फुकट मागू तिकीट ? फुकट नको कुणाचं. आम्ही शेतकरी. आम्ही जगाला पोसू. कोणाचं फुकट नको आम्हाला. दे लवकर तिकीट. चार तिकीटं दे.”
“वीस रुपये मोजा.”
“वीस ?”
“हो, वीस.”
“एका तिकीटाला ५ रुपये ?”
“हो ! हो ! ! हो ! ! !”
“मागं तर कमी होतं !”
“आता वाढले. तुमच्या आजोबांच्या वेळेस आगगीडी तरी होती का ? सारखं बदलतं सारं ! मोजा २० रुपये.”
“घ्या. काय करायचं ? सारीच महागाई ! पोटाला कमी खाऊ पण देवाला बघून घेऊ ! विठ्ठलाच्या पायांवर डोई ठेवून येऊ. द्या तिकीटं. घ्या या चार नोटा पाचा-पाचाच्या.”