भीती पळवणारा मंत्र 2
“याद तुम्हीच राखा. आता लोकांचे राज्य आहे. असं गोर-गरिबांना सतावणं बरं का ?”
“तुझं व्याख्यान मला नको.”
“कुंपणच शेत खायला लागलं तर दादा, शेतानं कोणाकडे जायचं ? तुम्ही प्रजेला सांभाळायचं, तर तुम्हीच लुटायला लागलात ? इतके दिवस चालली मिरास. आता नाही चालायची भाऊ. काळाप्रमाणं वागा. हा नवा जमाना आलाय.”
“गप्प बस. आला शिकवायला !”
त्या माळीदादाने खिशातून डायरी काढली. त्या डायरीला लहानशी पेन्सिल बांधलेली होती. पोलीस बघत होता. माळणीचे इकडेच डोळे होते. इतर लोकही थबकले. सर्वांना आश्चर्य वाटत होते. माळीदादा पोलिसदादाला म्हणाला,
“तुमचं नाव सांगा. मला टिपून घ्यायचं आहे. मी वरती उद्या अर्ज टाकतो, प्रेमानं मागून घेतलीत थोडी भाजी तर निराळी गोष्ट. महागाई असते. तुम्हांला पगार कमी असेल. परंतु अशी अरेरावी ? हे नाही चालायचं. नाव सांगा.”
पोलीस जरा घाबरला. त्याने मुळ्याच्या जुड्या खाली ठेवल्या. त्याने माळणींची भाजीही तेथेच टाकली.
“जातो दादा. धडा शिकवलास. स्वराज्यचा अर्थ शिकवलास. अर्ज नको करु. नाव कळवू नको. पुन्हा मी येणार नाही.” पोलीस नम्रपणे म्हणाला.
“रागावू नको, पोलिसदादा, आपण सारे भाऊ. न्या ही जुडी, खरंच न्या. परंतु अशी कोणाची भाजी उचलू नका.” माळीदादा सौजन्याने म्हणाला. त्याने त्याला मुळे घेऊन जायला प्रेमाने भाग पाडले. पोलीस गेला. बाजार चालू होता. संध्याकाळ झाली. माळणी गेल्या. माळीदादा गेला.
आठवड्याच्या बाजाराला तो माळीदादा नेहमी यायचा. परंतु आता पोलीस कधी फुकट भाजी उचलायला आला नाही. त्या माळणींना नवल वाटे. एकदा माळणींनी माळीदादाला विचारले !