भीती पळवणारा मंत्र 3
“का रे भाऊ, आता भाजी उचलालया ते येत नाहीत. तू काय मंत्र म्हटलास ? कोणती जादू केलीस ?”
“माझ्याजवळ एकच मंत्र होता.”
“कोणता मंत्र ?”
“नाव टिपून घेतो म्हटल्याबरोबर अशी माणसं भितात. आता स्वराज्य आहे. त्रास कोणी देईल तर वरती लिहून कळवावं. ज्ञानाचा मंत्र ! तुम्हा बायांना लिहीता-वाचता येत नाही. शिका आता.”
“आम्ही का शिकायचं ?”
“तुम्ही का माणसं नाही आहात ? प्रत्येक माणसानं शिकायला हवं. स्त्रिया स्वराज्याच्या लढ्यात तुरुंगातसुद्धा गेल्या. त्या का मागे राहिल्या ?”
“खरं आहे रे भाऊ. त्या जळगावची अनसूया, तिनं झेंडा लावला चावडीवर ! आम्ही शिकू, पण कोण शिकवणार ?”
“सेवादलाची मुलं शिकवतील. सेवादलातील मुली शिकवतील. आमच्या गावची जमनी वर्ग घेते, तिला मी सांगेन, तुम्ही शिकाल ?”
“शिकू,- आम्ही शिकू.”
“छान. आपण जर शिकू तरच स्वराज्य टिकेल, नि सगळ्यांच्या सुखाचं ते होईल. शिकल्यानं भीती जाते, सारं समजू लागतं. ज्ञान म्हणजे भगवान.”
“किती चांगलं बोलतोस तू दादा.”
“जमनी येईल हं तुमच्या गावाला. तुमचं गाव कोणतं ?”
“आम्ही बिल्दीच्या.”
आणि खरेच, सेवादलाची जमनी बिल्दीस जाऊ लागली. मायबहिणी शिकू लागल्या. त्या सभेत बोलत. व्याख्यानांची त्या टिपणे ठेवीत. बिल्दी गावात कोणी निरक्षर राहायचे नाही, असे गावक-यांनी ठरवले आहे. त्यांच्या संकल्प पुरा होवो !