Get it on Google Play
Download on the App Store

गांधीबाप्पाची शपथ,- शिकेन ! 3

“काय झालं न शिकायला ? ही होणारी फजिती टळेल. पण आधी इकडे वर बसा, या. आम्ही तुमच्या मुलीसारख्या. तुम्हांला बापूजींच्या गोड गोष्टी वाचून दाखवू ?”

“बापूजींच्या ?”

“म्हणजे महात्माजींच्या.”

“का गं मुलींनो. हरिविजय आहे, रामविजय आहे. तसा महात्माविजय कोणी का नाही लिहीत ? मग तो खेड्यापाड्यांतून वाचतील. त्याचा सप्ताह करतील. आम्ही आयाबाया ऐकू. देवमाणूस होते महात्माजी ! कशा गोळ्या घातल्या ग त्यांच्यावर ? आणि त्यालाही त्यांनी म्हणे हात जोडले ! धन्य धन्य त्यांची !”

“आजी, आमच्या सेवादलाचे साने गुरुजी श्रीगांधीविजय लिहिणार आहेत. अष्टोदरशे म्हणजे १०८ अध्याय करणार आहेत. त्यांची श्यामची आई तुम्ही वाचली आहे का ?”

“मला नाही वाचता येत. परंतु आमच्या शेजारचे एक दादा रोज रात्री त्यातून वाचायचे. मी ऐकायला जात असे. डोळ्यांना पाणी येई ऐकताना. ते का लिहीणार आहेत श्रीगांधीविजय? छान होईल.”

“परंतु तुम्ही वाचायला शिका.”

“तुमच्यासारख्या मुली भेटल्या तर शिकेन हो.”

आजी रमली. विजयाने बापूजींच्या गोड गोष्ट वाचून दाखविल्या. पुणे आले. त्या मुलींनी आजीबाईला घरी नेले. तिची सारी व्यवस्था केली. पुण्याला दौंडाकडून मनमाडकडे   जाणार्‍या गाडीत तिला बसविले. पुण्याचे पेरु बरोबर दिले.

“मुलींनो, तुमचे उपकार.”

“उपकार कसले ?”

“कुणी तुम्हांला असं वागायला शिकवलं ?”

“सेवादलानं. आजी, पण एक कबुल करा. लिहावाचायला शिका.”

“शिकेन हो. तुमच्या गांधीबाप्पाची शपथ.”