Get it on Google Play
Download on the App Store

श्लोक ३१ ते ३३

पातालजङ्घ: मुनिपात्‌ कालाङ्गुष्ठ: त्रयीतनु: ।
ज्योति:-मण्डल-लाङगूल: ह्रदय-आलान-निश्चल: ॥३१॥
१७२) पातालजङ्घ---सप्तपाताल ह्याच ज्याच्या पोटर्‍या आहेत असा. (अतल-वितल-सुतल-महातल-रसातल-तलातल व पाताल व पाताल हे सप्तपाताल)
१७३) मुनिपात्‌---चरणांची सेवा करण्यात तप्तर असे मुनी हेच ज्याचे चरण आहेत असा.
१७४) कालङ्गुष्ठ---महाकालरूपी आंगठे धारण करणारा.
१७५) त्रयीतनु---ऋग्वेद-यजुर्वेद-सामवेद ही वेदत्रयी ज्याचे शरीर आहे.
१७६) ज्योतिर्मण्डललाङ्गुल---तारकामण्डल हे ज्याचे शेपूट किंवा शिश्न आहे किंवा शिशुमारसंज्ञक तारकासमूह हेच ज्याचे शेपूट किंवा शिश्न आहे असा.
१७७) हृदयालाननिश्चल---भक्तांच्या ह्रदयात बांधला गेलेला. आलान म्हणजे हत्ती बांधण्याचा खांब.
हृत्‌-पद्य-कर्णिका-शाली-वियत्‌-केलि-सरोवर: ।
सद्‌भक्तध्याननिगड: पूजावारिनिवारित: ॥३२॥
१७८) हृत्पद्यकर्णिकाशालिवियत्‌केलिसरोवर---ह्रदयकमल पुष्पाने सुशोभित दहराकाश (ह्रदय) हेच ज्याचे क्रीडासरोवर आहे असा किंवा ह्रदयातील कर्णिकांनी शोभणारा आणि आकाश हेच ज्याचे क्रीडा सरोवर आहे असा.
१७९) सद्‌भक्तध्याननिगड---भक्तश्रेष्ठांच्या ध्यानात जो बंदिस्त राहतो तो. (निगड म्हणजे हत्तीचा साखळदंड)
१८०) पूजावारिनिवारित---पूजेने आपलासा करून घेता येणारा. वारी = गजबन्धनशृङखला.
प्रतापी कश्यपसुत: गणप: विष्टपी बली ।
यशस्वी धार्मिक: स्वोजा: प्रथम: प्रथमेश्वर: ॥३३॥
१८१) प्रतापी---अत्यंत पराक्रमी
१८२) कश्यपसुत---देवान्तक आणि नरान्तक राक्षसांच्या संहारासाठी कृतयुगात महर्षी कश्यपांच्या घरी देवी अदितीच्या पोटी महोत्कट किंवा विनायक रूपात ज्याने जन्म घेतला होता असा तो. हिमालय म्हणजे सर्वात मोठा पर्वत. त्याच्या तीरावर वराहमूलम्‌ क्षेत्री कश्यप-अदिती यांचा आश्रम होता. तेथेच त्यांनी ॐ काराची आराधना केली. श्रीगणेश त्यांना प्रसन्न झाले. त्यावर ‘तू आमचा पुत्र म्हणून जन्म घे’ अशी मनात असलेली महाउत्कंठा त्यांच्यापाशी व्यक्त केली. पुढे याच नंदनवनात कश्यप-अदितींचा नंदन म्हणून ॐ कारगणेशाने जन्म घेतला व त्यांना लागलेली महाउत्कंठा पूर्ण केली तोच हा ‘कश्यपसुत’ ‘महोत्कट’ गणेश होय.
त्यांचे (श्रीगणेशांचे) अवतारकार्य संपल्यावर कश्यप-अदितींचा प्रेमळ निरोप घेऊन ते गणेशलोकी परतले. त्यांच्या परत जाण्यामुळे कश्यप-अदिती खिन्न झाले तेव्हा देवर्षी नारदांनी महोत्कट गणेशमूर्तीची स्थापना करावयास सांगितली. त्यानुसार कश्यपांनी गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. श्रीनगरनजीकच्या बारामुला येथे महोत्कटाची मूर्ती आहे ती हीच होय. मूर्ती चतुर्भुज-वामशुण्ड आणि शेंदूरचर्चित आहे.
तारकासुरवधप्रसंगी कुमारसंभवासाठी देवादिकांनी जे प्रयत्न केले त्यामध्ये कामदेव सहभागी होता. त्यामुळे शंकरांच्या क्रोधाला निमित्तमात्र होऊन तो जळून भस्म झाला. त्यावेळी दैवयोगाने योग्य अशा बोधयोगाला प्राप्त होऊन त्याने रतीसहवर्तमान गणेशाचे आराधन केले व तो पूर्ववत्‌ वैभवाने संपन्न झाला. त्याने जेथे गणेशाचे आराधन केले ते ‘महोत्कट’ गणेशक्षेत्र नाशिकक्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे.
१८३) गणप---अध्वर्यु आणि होता आदी गणांचा पालक. यज्ञकर्म करीत असताना ऋग्वेदाच्या ऋचांचा विनियोग करणार्‍याला होता म्हटले जाते. यजुर्वेदाच्या ययुस्‌ चा विनियोग करणारा तो अध्वर्यू. सामवेदाची सामे म्हणणारा तो उद्‌गाता आणि अथर्ववेदाचे मंत्र म्हणणारा तो ब्रह्मा. या प्रत्येकाचे पुन्हा तीन तीन सहकारी असत. ते असे - होत्याचे - मैत्रावरूण - अच्छावाक्‌ - ग्रावस्तुत हे तीन सहकारी. अध्वर्यूचे - प्रतिप्रस्थाता - नेष्टा - उन्नेता हे तीन सहकारी. उद्‌गात्याचे - प्रस्तोता - प्रतिहर्ता - सुब्रह्मण्यम्‌ हे तीन सहकारी तर ब्रहम्याचे - ब्राह्मणाच्छंसी - अग्नीध्र - पोता हे सहकारी. असे १६ ऋत्विज आणि सदस्य नावाचा १ ऋत्विज हे यज्ञावर देखरेख करणारे १७ प्रधान ऋत्विज असत. अशा अध्वर्य़ू आणि होता गणांचा पालक असणारा तो गणप.
१८४) विष्टपी---विष्टप म्हणजे आधार. अनंतकोटी ब्रह्माण्डांचा आधार असलेला.
१८५) बली---बलवान्‌.
१८६) यशस्वी---कीर्तिमान्‌.
१८७) धार्मिक---धर्म आचरणारा. धर्मवृद्धी करणारा.
१८८) स्वोजा---तेजस्वी. अष्ट धातूंच्या (सोने-रूपे-तांबे-कथील-शिसे-पितळ-लोखंड-तिखे पोलाद किंवा पारा हे अष्टधातू देवाने मिर्मिले आहेत असे असे मानले जाते.) तेजाने शोभायमान असा. स्वयंप्रकाशी.
१८९) प्रथम---आद्य. सर्व मंगलकार्यांमध्ये ज्याची पूजा प्रथम केली जाते असा.
१९०) प्रथमेश्वर---ब्रह्म-विष्णू-महेशादिकांपूर्वीही ज्याचे पूजन केले जाते असा. देवांचाही आदिदेव.

श्रीगणेशाची सहस्त्र नामे

भगवान दादा
Chapters
श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५