Get it on Google Play
Download on the App Store

शेतकर्‍याचा असूड - पान १७

आर्यब्राह्यणांतील कित्येक, खोटे कागद, वनावट नोटी व लांच खाल्याबद्दल सक्तमजुरीच्या शिक्षा भोगितात व कित्येक जरी शाक्तमिषें अशौच मांगिणीबरोबर मद्यमांसादि निंद्य पदार्थ भक्षण करितात, तरी ते भोंसले, शिंदे, होळकर वगैरे शूद्र राजेरजवाडयांस नीच मानून त्यांजबरोबर रोटीव्यवहार करीत नाहींत. बहुतेक भटब्राह्यण गावांतील ओवळया कसबिणींच्या घरीं सर्व प्रकारचा नीच व्यवहार करितात, तरी ते आर्य भट सालस शूद्र शेतकर्‍यांबरोबर बेटीव्यावहार करण्यांत पाप मानितात,यावरून " ढ " च्या पुढल्या " क्ष " नें म्हटल्याप्रमाणें शेतकर्‍यांबरोबर ब्राह्यणांची एकी कशी होऊं शकेल ?
एकंदर सर्व भटब्राह्यण आपल्या देवळांतील दगड, धातूच्या मूर्तीस शूद्र शेतकर्‍यांस स्पर्शसुद्धां करूं देत नसून, दुरून का होईना, त्यांस आपल्या पंक्ति-शेजारी बसवून जेऊं न घालतां त्यास न कळवितां, आपल्या पात्नांवरील उरलेलें उष्टें तूप त्यांस घालून त्यांच्या पंक्ति उठवतात. यावरून शेतकर्‍यांबरोबर अशा ब्राह्यणांची एकी कशी होऊं शकेत ?
हजरत महमद पैगंबराच्या निस्पृह शिष्यमडळींचें जेव्हां याया देशांत पाऊल पडलें, तेव्हां ते आपल्या पवित्न एकेश्वरी धर्माच्या सामर्थांनें आर्यभटांच्या मतलबी धर्माचा फट्टा उडवूं लागले. यावरून कांहीं शूद्र मोठया उत्साहानें महमदी धर्मांचा स्वीकार करू लागले,  तेव्हां बाकी उरलेल्या अक्षरशून्य शुद्रांस नादीं लावण्याकरितां महा धूर्त मुकुंदराज भटांनीं जे संस्कृतच्या उतार्‍यावर थोडी नास्तिक मताची कल्हई करून त्याचा विवेकसिंधु नामक एक प्राकृत ग्रंथ करून त्यांच्यापुढें मांडला व पुढे इंग्रज बहादराच अम्मल होईतोपावेतों आर्यभटांनीं आपल्या भाकड भारत-रामायणांतील शेतकर्‍यांस गोष्टी सांगून, त्यांना उलटे मुसलमान लोकांबरोबर लढण्याचे नादीं लाविलें ; परंतु अक्षरशून्य शेतकर्‍यांस मुसलमानांच्या संगतीनें आपल्या मुलांस विद्या शिकविण्याचें सुचूं दिलें नाही.  यामुळें इंग्लिश अम्मल होतांच सहजच एकंदर सर्व सरकारी खात्यांनीं मोठमोठया महत्त्वाच्या जागा आर्यब्राह्यणांस मिळून ते सर्वोपरी शेतकर्‍यास लबाडून खाऊं लागले व आर्यभट, इंग्रज वगैरे एकंदर सर्व युरोपियत लोकांस जरी मांगामहारासारखे नीच मानीत आहेत, तथापि त्यांच्या महाधुर्त पूर्वजांनीं महापवित्न मानलेले वेद, ज्यांचीं शेपटेंसुद्धां शूद्र शेतकर्‍यांच्या दृष्टीस पडूं देत नाहींत, ते सोंवळे बुरख्यांतील वेद, हल्लीं त्यांच्यांतील मोठमोठाले जाडे विद्वान काखेंत मारून गोर्‍या म्लेंछ लोकांच्या दारोदार जाऊन त्यांस शिकवित फिरतात. परंतु हे भटब्राह्यण खेडयापाडयांनी सरकारी शाळांत शूद्र शेतकर्‍यांच्या अज्ञानी मुलांस साधारण विद्या शिकवितांना थोडी का आवडनिवड करतात ? यावरून शेतकर्‍यांबरोबर अशा ब्राह्यणांची एकी कशी होऊं शकेल ?
एकंदर सर्व धार्मिक मिशनरी वगैरे युरोपियन लोकांच्या योगानें परागंदा झालेल्या शेतकर्‍यांच्या मुलास मोठमोठाल्या शह्रीं थोडीशी विद्या प्राप्त झाल्याबरोबर त्यांस गोर्‍या कामगारांच्या दयाळूपणामुळें चुकून आपल्या कचेर्‍यांनीं जागा दिल्या कीं, एकंदर सर्व कचेर्‍यांतील भटकामगार त्यांच्याविषयीं नानाप्रकारच्या नालस्त्या गोर्‍या कामगारांस सांगून त्यांना अखरे कमगारांच्या मेहेरबान्या होण्याकरिता, अज्ञानी शेतकर्‍यांचे पिकपाण्याविषयीं भलत्यासलत्या लांडयालबाडया त्यांस सांगून शेतकर्‍यांची योग्य दाद लागण्याचे मार्गात आडफाटे घालून त्यांस चळाचळा कांपावयास लावितात. यावरून शेतकर्‍यांबरोबर अशा ब्राह्यणांची एकी कशी होऊं शकेल ?
आर्यब्राह्यणांपैकीं एकंदर सर्व वैदिक, शास्त्री,  कथाडे, पुराणिक वगैरे भटभिक्षूक नानाप्रकारची संधानें लढवून अज्ञानी शूद्र शेतकर्‍यांपैकी भोसले, शिन्दे, होळकर वगैरे राजेरजवाडयांस पोंकळ धर्माच्या बहुरूपी हुलथापा देऊन त्याम्स यजमान म्हणतां म्हणतां त्यांजपासून शेकडों ब्राह्यण-भोजनें, प्रतिदिवशीं गोप्रदानें व दानधर्म उपटीत असून भटभब्राह्यणांच्या जातींतील पंतप्रतिनिधी, सचीव, सांगलीकर वगैरे ब्राह्यणसंस्थानिकांनीं दुष्काळांतसुद्धां आपल्या यजमान शूद्र शेतकर्‍यांच्या मंडळास, सांधीं कां होईनात, भोजनें देऊन त्यांचें वंदन करून आशिर्वाद घेत नाहीत. व त्यांच्यापैकीं बहुतेक विद्वान ब्राह्यण, गायकवाड वगैरे शूद्र संस्थानिकांकडून हल्ली हजारों रुपयांचीं वर्षासनें व नित्यशः खिचडया उपटीत असल्याबद्दल उपकार मनीं स्मरून ब्राह्यण संस्थानिकांपैकी एकानेंही एखाद्या शेतकर्‍यांच्या मुलास अन्नवस्त्न पुरवून त्यास विद्वान करवलें नाहीं. यावरून शेतकर्‍यांबरोबर आर्य ब्राह्यणांची एकी कशी होऊंशकेल ?