Get it on Google Play
Download on the App Store

शेतकर्‍याचा असूड - पान ६

कित्येक कमिंष्ठ ब्राह्यणकामगार आपल्या जातींतील पुराणिकाला व कथेकर्‍याला, कित्येक अज्ञानी सधन शेतकर्‍यांपासून देणग्या देववितात. कित्येक धोरणी धूर्त, अज्ञानी भोळया सधन शेतकर्‍यांस गांठून त्यांजपासून राधाकृष्णाची नवीं देवळें गांवोगावीं बांधवून, कांहीं जुन्या देवळांचा जीर्णोद्धार करवितात व त्यांजकडून उद्यापनाचे निमित्तानें मोठमोठालीं ब्राह्यणभोजनें काढितात. कित्येक धूर्त कामगार युरोपियन कामागारांच्या नजरा चुकवून एकंदर सर्व अज्ञानी शेतकर्‍यांस नानाप्रकारचे त्नास देतात व त्याबद्दल शेतकरी लोक आंतले आंत त्यांचे नांवानें खडे फोडीत असतांही त्यांनीं ( कामगारांनीं ) युरोपियन कामगारांचे पुढें पुढें रात्नंदिवस चोंबडक्या केल्या कीं, ते त्यांचेबद्दल उलटया सरकारांत शिफारशी करून त्यांच्या बढत्या करवितात, त्यांतून बहुतेक युरेपियन कामगारांस दहावीस मिनिटें अस्खलित मराठी भाषण करण्याची केवढी मारामार पडते आणि अशा " टूमी आमी " करणार्‍या युरोपियन कामगारांस सातारकर छत्नपती महाराज, हिम्मतबहादर, सरलष्कर, निबाळकर, घाटगे, मोहिते, दाभाडे, घोरपडे वगैरे शेतकरी जहामर्दांची खासगत सोजरी भाषणांतील सर्व गार्‍हाणी शिस्तवार ममजून घेऊन त्यांचे परिहार ते कसे करीत असतील, तें देव जाणे ! कित्येक धूर्त ब्राह्यणकामगार आपल्या धोरणांनें सदा सर्वकाळ वागूं लागतील, वा इराद्यानें ते जिल्ह्यांतील कित्येक कुटाळ असून वाचाळ भटब्राह्यणांस पुढें करून त्यांचे हातून जागोजाग मोठाले जंगी समाज उपस्थित करवितात अ आंतून आपण अन्य रीतीनें शूद्रांतील शेतकरी, गवतवाले, लाकडवाले, कंट्‍याक्टर, पेनशनर्स व इस्टेटवाले गृद्रांतील आपलें वजन ते भिडा खर्ची घालून त्यास पाहिजेल त्या समाजात
सभासद करवितात. कित्येक युरोपियन कामगारांच्या कांहीं घरगुती नाजूक कामास मदत देण्याचे उपयोगी ब्राह्यण शिरस्तेदार पडले कीं, युरोपियन कामगार त्यांच्याविषयीं सरकारांत शिफारशी करून त्यांस रावसाहेबांच्या पदव्या देववितात आणि सदरचे युरोपियन कामगारांच्या जेव्हां दुसर्‍या जिल्ह्यांत बदल्या होतात, तेव्हां हे तोंडपुजे रावसाहेब मनास येतील तशीं मानपत्नें तयार करून, त्यांवर शहरांतील चार पोकळ प्रतिष्ठा मिरविणार्‍या अज्ञानी, सधन कुणब्या माळयांच्या व तेल्यातांबोळयांच्या मोडक्यातोडक्या सह्या भरतीला घेऊन भलत्या एखाद्या अक्षरशून्य शूद्र केट्‍याक्टरांच्या टोलेजंग दिवाणखान्यांत मोठमोठया सभा करून त्यांचध्यें त्यांस हीं मानपत्ने देतात. सारांश अस्मानीसुलतानीमुळें पडलेल्या दुष्काळापासून; तसेंच टोळांच्या तडाक्यापासून होणारें नुकसान केव्हांतरी भरून येते, परंतु एकंदर सर्व लहानमोठया सरकारी खात्यांत बहुतेक युरोपिअन कामगार ऐषाआरामांत गुंग असल्यामुळें, त्या सर्व खात्यांत भट पडून, ते कोंकणांतील ब्राह्यण खोतासारखे येथील सर्व अक्षरशून्य शेतकर्‍यांचें जें नुकसान करितात, तें कधींही भरून येण्याची आशा नसते. या सर्वांविषयीं कच्च्या हकीकती लिहूं गेल्यास त्यांची " मिस्तरीज ऑफ दि कोर्ट ऑफ लंडन " सारखीं पुस्तकें होतील. व ही अज्ञानी शेतकर्‍यांची झालेली दैन्यवाणी स्थिती जेव्हां खिस्ति लोकांस पहावेनां, तेव्हां त्यांनी युनायटेड ग्रेट ब्रिटनांत येथील विद्याखात्याचे नांवानें शिमग्याचा संस्कार सुरू केला. त्यावरून येथील कांहीं सभ्यसद्‍ग्रहस्थांसहित कित्येक बडे सरदार लोकांनी हिंदुस्थानांतील विद्याखात्याकडील मुख्य अधिकार्‍यांची थोडीशी पट्टाधूळ झाडण्याची सुरुवात केली, कोठें न केली, तोच मायाळू गव्हरनर जनरलसाहेबांनी येथील विद्याखात्याविषयीं पक्की चौकशी करण्याकरितां चारपांच थोर थोर विद्वान गृहस्थांची कमिटी स्थापून त्यामध्यें मे. हंटरसाहेब मुख्य सभानायक स्थापतांच त्यांनी आपल्या साथीदारांस बरोबर पेऊन " निमरॉड " शिकार्‍यासारखे तिन्ही प्रेसिडेन्सींत आगगाडयांतून मोठी पायपिटी केली, परंतु त्यांनी येथील एकंदर सर्व शूद्रादि अतिशूद्र शेतकरी अक्षरशत्नु असल्यामुळे ते कोणकोणत्या प्रकारच्या विपत्तींत संकटे भोगीत आहेत, याविषयीं बारीक शोध काढण्याविषयी शेतकर्‍यांचे घाणेरडया झोपडयात स्वतः जावून तेथे आपल्या नाकाला थोडासा पदर लावून तेथील त्यांचें वास्तविक दैन्य चांगले डोळे पसरून पाहून तेथील भलत्याएखाद्या अक्षरशून्य, लंगोटया शेतकर्‍याची साक्षी न घेतां हिंदु, पारशी, खिस्ति, धर्मांतील बहुतेक सुवाष्ण ब्राह्यणांच्या साक्षी घेण्यामध्ये रंग उडविण्याची बहार करून जागोजागची मानपत्न बगलेत मारून अखेरीस आपली पायधूळ कलकत्त्याकडे झाडली आहे खरी, परंतु त्यांच्या रिपीर्टापासून अज्ञानी शेतकर्‍यांचा योग्य फायदा होईल, असे आम्हांला अनुमान करितां येत नाहीं. तात्पर्य मे. हंटरसाहेब यांनीं, आमचे महाप्रतापी गव्हरनर जनरल साहेबमहाराजांस निरापेक्ष मे. टक्कर ( साव्लेशन आर्मीचे ) साहेबासारख्या धूर्त लोकांशीं टक्कर मारण्याकरितां आपल्या कामाचा राजीनामा देऊन स्वतः दीन-दुबळया अज्ञानी शेतकर्‍यांचे आळोआळीनें खटार्‍यांत बसून त्यांस अज्ञानांधःकारांतून मुक्त करण्याचे खटाटोपीचा प्रसंग आणला नाहीं. म्हणजे त्यांचा ( हंटरसाहेबांच्या ) नौबतीचा डंका वाजेल ; व त्याचा आवाज पाताळच्या प्रजापत्ताक राज्याच्या प्रतिनिधींच्या कानीं पडतांच त्यांचे डोळे उघडून त्यांच्या अंतःकरणांत आमचे दीनबंधु काळे लोक " रेड इंडियन्स " यांजविषयीं दया उदूभवेल.
या प्रकरणांत एकंदर सरकारी ब्राह्यण नोकरांविषयीं लिहिलेल्या मजकुराबद्दल पुरावा पाहिजे असल्यास ठिकठिकाणीं आजपर्यंत लांच खाल्याबद्दल किंवा खोटया लिहिण्याबद्दल वगैरे अशा प्रकारच्या गुन्ह्यांवरून शिक्षा झालेल्या व त्याविषयीं फिर्यादी झालेल्या आहेत, त्या पहाव्या म्हणजे सहज सांपडेल.