Get it on Google Play
Download on the App Store

शेतकर्‍याचा असूड - पान १२

शेतकर्‍यांसहित शेतकीची हल्लींची स्थिती
या प्रकरणाचे आरंभीं रात्नंदिवस शेत खपणार्‍या कष्टाळू, अज्ञानी शेतकर्‍यांच्या कंगाल व दीनवाण्या स्थितीविषयीं वाटाघात तूर्त न करितां, ज्यांच्या आईच्या आज्याची मावशी अथवा बापाल्या पंज्याची मुलगी, शिद्याचे अथवा गाइकवाडाचे घराण्यांतील खाशा अथवा खर्ची मुलास दिली होती, येवढया कारणावरून माळी, कुणबी, धनगर वगैरे शेतकर्‍यांत मराठयांचा डील घालून शेखी मिरविणार्‍या कर्जबाजारी, अज्ञानी कुणब्यांच्या हल्लींच्या वास्तविक स्थितीचा मासला तुम्हास याप्रसंगीं कळवितों. एक कुळवाडी एके दिवशीं नदीच्या किनार्‍याजवळच्या हवशीर दाट आंबराईतील कलेक्टर-साहोबांच्या कचेरीच्या तंबूकडून, मोठया रागाच्या स्वेषांत हातपाय आपटून दांतओठ खात आपल्या गांवाकडे चालला आहे. ज्याचें वय सुमारें चाळीशीच्या भरावर असून हिम्मतींत थोडासा खचल्यासारखा दिसत होता. डोईवर पीळदार पेंचाचें पांढरें पागोटें असून त्यावर फाटक्या पंचानें टापशी बांधलेली होती. अंगांत खादीचि दुहेरी बंडी व गुढघेचोळणा असून पायांत सातारी नकटा जुना जोडा होता. खांद्यावर जोट, त्यावर खारवी बटवा टाकला असून, एकंदर सर्व कपडयांवर शिमग्यांतील रंगाचे पिवळे तांबूस शिंतोडे पडलेले होते. पायांच्या टांचा जाड व मजबूत होत्या खर्‍या, परंतु कांहीं कांहीं ठिकाणीं उकलून भेगा पडल्यामुळें थोडासा कुलपत चालत होता. हाताच्या कांबी रुंद असून, छाता पसरट होता. चोटीशिवाय भवूक दाढीमिशा ठेवल्यामुळें वरील दोन दोन फाळया दातांचा आयब झांकून गेला होता. डोळे व कपाळ विशाळ असून आंतील बुबूळ गारोळें भोर्‍या रंगाचें होतें. शरीराचा रंग गोरा असून एकंदर सर्व चेहरामोहरा ठीक बेताचा होता. परंतु थोडासा वाटोळा होता. सुमारें बारावर दोन वाजल्यावर घरीं पोंहोचल्यावर जेवण झाल्यानंतर थोडासा आराम करण्याचे इराद्यानें माजधराचे खोलींत जाऊन तेथें वलणीवरील बुरणूस घेऊन त्यानें जमिनीवर अंथरला आणि त्यावर उशाखालीं घोंगडीची वळकटी घेऊन तोंडावर अंगवस्त्र टाकून निजला. परंतु सकाळीं उठून कलेक्टरसाहेबांची गांठ घेतली व ते आपल्या चहापाण्याच्या व खाण्यापिण्याच्या नादांत गुंग असल्यामुळें. त्यांच्यानें माझी खरी हकीकत ऐकून घेऊन, त्याजपासून मला हप्ता पुढें देण्याविषयीं मुदत मिळाली नाहीं. या काळजींने त्यास झोंप येईना. तेव्हां त्यानें उताणें पडून आपले दोन्ही हात उरावर ठेवून आपण आपल्याच अनाशीं बाबचळल्यासारखें बोलूं लागला--
" इतर गांवकर्‍यांसारखा मी पैमाष करणार्‍या भटकामगारांची मूठ गार केली नाहीं यास्तव त्यांनीं टोपीवाल्यास सांगून मजवर शेतसारा दुपटीचे वर वाढविला व त्याच वर्षी पाऊस अळम टळस पडल्यामुळें एकंदर सर्व माझ्या शेत व बागाइती पिकास धक्का बसला, इतक्यांत बाप वारला. व याच्या दिवसमासाल बराच खर्च झाला, यामुळें पहिले वर्षी शेतसारा बारण्यापुरतें कर्ज ब्राह्यण सावकारापासून काढून त्यास मळा गहाण देऊन रजिस्टर करून माझा बारवेचा मळा आपल्या घशांत सोडला. त्या सावकाराच्य आईचा भाऊ रेव्हेन्यूसाहेबांचा दफ्तरदार, चुलता कलेक्टरसाहेबांचा चिटणीस, थोरल्या बहिणीचा नवरा मुनसफ आणि बायकोचा बाप या तालुक्याचा फौजदार, जाशिवाय एकंदर सर्व सरकारी कचेर्‍यांत त्यांचे जातवाले ब्राह्यणकामगार अशा साबकाराबरोबर बाद घातला असता, तर त्याच्या सर्व ब्राह्यण आप्तकामगारांनी हस्तेंपरह्स्तें भलत्या एखाद्या क्षुल्लक कारणावरून माझा सर्व उन्हाळा केलां असता. त्याचप्रमाणें दुसरे वर्षी घरांतील बायकामुलांच्या अंगावरील किडूकमिडूक शेतसार्‍याचे भरीस घालून नंतर पुढें दरवर्षी शेतसारा अदा करण्याकरितां गांवातील गुजर-मारवाडी साबकारांपासून कर्जाऊ रकमा काढिल्या आहेत. त्यांतून कित्येकांनीं हल्लीं मजवर फिर्यादी ठोकल्या आहेत व ते कज्जे कित्येक वर्षापासून कोडतांत लोळत पडले आहेत. त्याबद्दल म्यां कधीं कधीं कामगार व वकिलांचे पदरीं आवळण्याकरितां मोठमोठाल्या रकमा देऊन, कारकून, चपराणी, लेखक व साक्षीदार यांस भत्ते भरून चिर्‍यामिर्‍या देतां देतां माझ्या नाकास नळ आले आहेत. त्यांतून लांच न खाणारे सरकारी कामगार कोठें कोठें सांपडतात. परंतु लांच खाणार्‍या कामगारांपेक्षा, न लांच खाणारे कामगार फारच निकामी असतात. कारण ते बेपर्वा असल्यामुळें त्यांजवळ गरीब शेतकर्‍यांची दादच लागत नाहीं व त्यांच्या पुढें पुढें करून जिवळग गडयाचा भाव दाखविणारे हुयार मतलबी वकील. त्यांच्या नावानें आम्हां दुधळया शेतकर्‍यां-जवळून कुत्न्यासरखे, लांचांचे मागें लांचांचे लचके तोडून खानात. आणि तसे न करावें तर सावकार सांगतील त्याप्रमाणें आपल्या बोडक्यांवर त्यांचे हुकुमनाचे करून घ्यावेत. यावरून कोणी सावकार आत मला आपल्या दांरापाशीं उभे करीत नाहींत ! तेव्हां गतवर्षी लग्न झालेल्या माझ्या थोरल्या मुलीच्या अंगावरील सर्व दागिने व पितांवर मारवाडयाचे घरीं गहाण टाकून पट्टीचे हप्ते बारले. त्यामुळें तिचा सासरा त्या बिचारीस आपल्या घरीं नेऊन नांदवीत नाहीं. अरे, मी या अभागी दुष्टानें माझ्यावरील अरिष्ट टाळण्याकरितां माझ्या सगुणाचा गळा कापून तिच्या नांदण्याचें चांदणें केलें ! आतां मी हल्लीं सालचा शेतसारा द्यावा तरी कोठून ? वागाइतांत नवीन मोटा विकत घेण्या-करितां जवळ पैसा नाहीं, जुन्या तर अगदीं फाटून त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळें उंसाचें बाळगें मोडून हूंडीचीहि तोच अवस्था झाली आहे. मकाही खुरपणीवांचून वायां गेली. भूस सरून बरेच दिवस झाले. आणि सरभड गवत, कडव्याच्या गंजी संपत आल्या आहेत. जनावरांना पोटभर चारा मिळत नसल्यामुळें कित्येक धट्टेकट्टे बैल उठवणीस आले आहेत. सुनाबाळांचीं नेसण्याचीं लुगडीं फाटून चिंध्या झाल्यामुळें लग्नांत घेतलेलीं मौल्यवास जुनीं पांघरूणें वापरून त्या दिवस काढीत आहेत, शेती खपणारीं मुलें वस्त्रावांचून इतकीं उघडींबंब झालीं आहेत कीं, त्यांना चारचौघांत येण्यास शरम वाटते. घरांतील धान्य सरत आल्यामुळें राताळयाच्या वरूवर निर्वाद चालू आहे. घरांत माझ्या जन्म देणार्‍या आईच्या मरतेवेळीं तिला चांगलें चुंगलें गोड धोड करून घालण्यापुरता मजजवळ पैस नाहीं, याला उपाय तरी मीं काय करावा ? बैल विकून जर शेतसारा द्यादा, तर पुढें शेतकी कोणाच्या जीवावर ओढावी ? व्यापारधंदा करावा, तर मला लिहितां वाचतां मुळींच येत नाहीं. आपला देश त्याग करून जर परदेशांत जावें, तर मला पोट भरण्यापुरता कांहीं हुन्नर ठाऊक नाहीं. कण्हेरीच्या मुळया मीं वाटून प्याल्यास कर्तीधर्तो मुलें आपलीं कशोतरी पोटें भरतील. परंतु माझ्या जन्म देणार्‍या वृद्ध बयेस व बायकोसह माझ्या लहानसहान चिटकुल्या लेकरांस अशा वेळीं कोण सांभाळील ? त्यांनी कोणाच्या दारांत उभें रहावें ? त्यांनीं कोणापाशीं आपलें तोंड पसरावें ?