Get it on Google Play
Download on the App Store

शेतकर्‍याचा असूड - पान १०

नंतर मूसलमानी बादशहा दिवसा तानसेनी गाणीं ऐकून रात्नीं जनानखान्यात लंपट झाले आहेत, इतक्यांत महाकुशल इंग्रजांनीं मुसलमानांच्या पगडयावर घण मारून हा देश सहज आपल्या बगलेंत मारला, यामध्यें त्यांनीं मोठा पुरुषार्थ केला, असे मी म्हणत नाहीं. कारण येथील एकंदर सर्व प्रजेपैकीं एक दशांशा ब्राह्यणांनीं आपल्या कृत्निमी धर्माच्या आडून लेखणीच्या जोरानें, धर्म व राजकीय प्रकरणीं बाकीच्या नऊ दशांश लोकांस विद्या, ज्ञान, शौर्य, चातुर्य व बल याहीकरून हीन करून ठेविलें होतें, परंतु यापुढें जेव्हां इंग्रज लोकांस नऊ दशांस शूद्रादि अतिशूद्र लोकांचा स्बभाव सर्व कामांत रानटी व आडमूठपणाचा असून ते सवैस्वी ब्राह्यणांचे धोरणानें चालणारे, असें त्यांच्या प्रचितीस आलें; तेव्हां त्यांनीं महाधूर्त ब्राह्यणांस नानाप्रकारच्या लालची दाखवून एकंदर सर्व कारभार त्यांजकडे सोपवून, आपण सर्व काळ मौल्यवान वस्त्ने, पात्नें, घोडे, गाडया व खाण्यापिण्याच्या पदार्थांत लंपट होऊन, त्यांमध्यें मन मानेल तसे पैसे उधळून, एकंदर सर्व युरोपियन व ब्राह्यण कामगारांस मोठमोठया पगारांच्या जागा व पेनशनें देण्यापुरतें महासूर द्र्व्य असावें या हेतूनें, कोरडया ओल्या कोंडयाभोंडयांच्या भाकरी खाणार्‍या, रात्नंदिवस शेतीत खपणार्‍य कष्टाळू शेतकर्‍याच्या शेतावर दर तीस वर्षांनीं, पाहिजेल तसे शेतसारे वाढवून, त्यांच्या अज्ञानी मुलांबाळांस विद्या देण्याची हूल दाखवून, त्या सर्वांच्या बोडक्यावर लोकलफंडा या नांवाचा दुस्ररा एक कराचा बोजा लाद्ला. आणि त्यांनीं ( शेतकर्‍यांनीं ) आपल्या मुलांबाळांसह रात्नंदिवस शेतांत खपून धान्य, कापूस, अफू. जवस वगैरे काला कित्ता मोठया कष्टानें कमावून शेतसार्‍यासुद्धां लोकल-फंडाचे हप्ते अदा करण्याकरितां त्या सर्व जिनसांस बाजारांत नेऊन दान करावयास जाण्याचे राजमार्गात, दर सहा मैलांवर जागोजागीं जकाती बसवून त्यांजपासून लाखों रुपये गोळा करूं लागले. जे आपल्या विपत्तींत आसपासच्या जंगलांतील गवत लांकूडफांटा व पानफूलांवर गुराढोरांचीं व आपली जतणुक करीत असत, तीं सर्व जंगलें सरकारनें आपल्या घशांत सोडलीं, त्यांच्या कोंडया-भोंडयाच्या भाकरीबरोबर तोंडी लावण्याच्या मिठावरसुद्धां भली मोठी जकात बसविली आहे. तसेंच शेतकर्‍याचे शेतांत भरपूर पाणी असल्यानें त्यांच्या जितरावाचा बचाव होऊन त्यास पोटभर भाकर व अंगभर वस्त्न मिळावें. असा वरकांति भाव दाखवून, आंतून आपल्या देशबांधव युरोपियन इंजिनीयर काम-गारांस मोठमोठे पगार देण्याचे इराद्यानें, युरोपांतील सावकारांस महामूर व्याज देण्याचा हेतु मनीं धरून त्यांचें कर्ज हिंदुस्थानच्या बोडक्यावर वाढवून, त्या कालब्यांतील पाण्याची किंमत अज्ञानी शेतकर्‍यांपासून मन मानेल तशी घेऊन,त्यांच्या शेतांत वेळच्या वेळीं तरी पाणी देण्याविषयीं सरकारी कामगारांकडून बरोबर तजवीज ठेवली जाते काय ? करण या इरिगेशनखात्यावरील बेपर्वा युरोपियन इंजिनीयर आपलीं सर्व कामें ब्राह्यण कामगारांवर सोंपवून आपण वाळयाचे पडद्याचे आंत बेगमसाहेबासारखे ऐषआरामांत मर्जीप्रमाणें कामें करीत बसतात. इकडे धूर्त ब्राह्यण कामगार आपली हुशारी दाखविण्याकरितां इंजिनीयर साहेबांचे कान फुंकून त्यांजकडून,पाहिजेल तेव्हां, पाहिजेल तसे जुलमी ठराव सरकारांतून पास करून घेतात. त्यांपैकीं नमुन्याकरितां येथें एक घेतों. तो असा कीं:-- वक्तशीर कालब्यांतील पाणी सरल्यामुळें शेतकर्‍यांची एकंदर सर्व जितराबांची होरपळून राखरांगोळी जरी झाली, तरी त्याची जोखीम इरिगेशन खात्याचे शिरावर नाहीं. अहो, जेथें हजारों रुपये दरमहा पगार घशांत सोडणार्‍या गोर्‍या व काळया इंजिनीयर कामगारांस, धरणांत हल्लीं किती ग्यालन पाणी आहे, याची मोजदाद करून तें पाणी पुढें अखेरपावेतों जेवढया जमिनींस पुरेल. तितक्याच जमिनीच्या मालकांस पाण्याचे फमें द्यावे, असा तर्क नसावा काय ? अहो, या खात्यांतील कित्येक पाणी सोडणार्‍या कामगारांचे पाण्यासाठीं अर्जव करितां करितां शेतकर्‍यांचे नाकास नळ येतात. अखेर, जेव्हां शेतकर्‍यांस त्याजकडून पाणी मिळेनासें होतें, तेव्हां शेतकरी त्यांचेवरील धूर्त अधिकार्‍यांकडे दाद मागण्यास गेले कीं, पाण्याचे ऐवजीं शेतकर्‍यांवर मगरुरीच्या भाषणांचा हल्ला मात्न होतो. अशा या न्यायीपणाचा डौल मिरविणार्‍या सरकारी चाकरांनीं,कर्जबाजारी दुबळया शेतकर्‍यांपासून पाण्याचे भरपूर दाम घेऊन, त्यांच्या पैशापुरतें भरपूर पाणी देण्याचे ऐवजीं, आपल्या उंच जातीच्या तोर्‍यांत शेतकर्‍यांशीं मगरुरीचीं भाषणें करणें, या न्यायाला म्हणावें तरी काय ? सारांश, आमचे न्यायशील सरकार आपले हाताखालच्या ऐषआरामी व दुसरे धूर्त कामगरांवर भरोसा न न ठेवितां शेतकर्‍यांचे शेतास वेळीं पाणी देण्याचा बंदोबस्त करून, पाण्यावरचा दर कमी करीत नाहींत, म्हणून सांप्रत काळीं शेतकर्‍यांचीं दिवाळीं निघून सरकारांस त्यांच्या घरादारांचे लिलांव करून, ते सर्व पैसेया निर्दय कामागाराचे पदरी आंवळावे लागतात. यास्तव आमचे दयाळू सरकारांनीं दर एक शेतकर्‍याच्या शेताच्या पाण्याच्या मानाप्रमाणें प्रत्येकास एकेक तोटी करून द्यावीं, जिजपासून शेतकर्‍यांस जास्त पाणी वाजवी-पेक्षां घेतां न यावें. आणि तसें केलें म्हणजे पाणी सोडणारे कामगारांची सरकारास जरूर न लागतां, त्यांच्या खर्चाच्या पैशाची जी बच्यतं राहील, ती पाणी घेणार्‍या शेतकर्‍यांस पाणी घेण्याचे दर कमी करण्याचे कामीं चांगली उपयोगी पडेल. व हल्लीं जो आमचे विचारी सरकारांनीं पाण्यावरचे दर कमी करण्याचा ठराव केला आहे, तो " इरीगेशन " खात्यास एकीकडे ठेवण्याचा प्रसंग टाळता ) येईल. तसेंच अज्ञानीं शेतकर्‍यांचे मागें आताशीं लोकलफंडासारखा नवीन एक दुसरा म्युनिसिपालिटीचा जबरदस्त बुरदंडा योजून काढिला आहे. तो असा कीं, शेतकर्‍यांनीं शेतांत तयार करून आणिलेला एकंदर सर्व भाजीपाला वगैरे माल शहरांत आणितवेळीं त्या सर्व मालावर मुनिसिपालिटी जकात घेऊन शेतकर्‍यांस सर्वोपरी नाडिते.कधीं कधीं शेतकर्‍यानें गाडीभर माळवें शहरांत विकण्याकरितां आणितेवेळीं त्या सर्व मालाची किंमत बाजारांत जास्तीकम्ती वजनानें घेणारे देणारे दगेबाज दलालाचें व म्युनिसिपालिटीचे जकातीचे भरीस घालून गाडीभाडें अंगावर भरून, त्यास घरीं जाऊन मुलाबाळांपुढें शिमगा करावा लागतो. अहो, एकटया पुणें शहरांतील म्युनिसिपालटीचें आतांच वार्षिक उत्पन्न सांगली संस्थानचे उत्पन्नाची बरोबरी करूं लागलें. त्याचप्रमाणें मुंबईतल टोलेजंग म्युअनिसिपालिटीच्या उत्पन्नाचे भरीस पंतसचिवासारखीं दहाबारा संस्थानें घातलीं, तरी तो खड्‌डा भरून येणें नाहीं. यावरून " उपरकी तो खूप बनी और अंदरकी तो राम जणी " या प्रसिद्ध म्हणीप्रमाणं प्रसंग गुजरला आहे. जिकडे पहावेम तिकडे दुतर्फा चिरेबंदी गटारें बांधलेले विस्तीर्ण रस्ते, चहुंकडे विलायती खांबांवर कंदिलांची रोषणाई, जागोजाग विलायती खापरी व लोखंडी नळांसहित पाण्याच्या तोटया, मुत्न्या, कचर्‍याच्या गाडया वगैरे सामानांचा थाट जमला आहे. परंतु पूर्वीचे राजेरजवाडे जरी मूर्तिपूजक असून इंग्रज लोकांसारखे विद्वान नव्हते,तरी त्यांनीं आपल्या रयतेच्या सुखसंरक्षणाकरितां मोठमोठया राजमार्गाचे दोन्ही  बाजूंनीं झाडें, जागोजाग गांवकुसू पूल. बहुतेक ठिकाणीं, भुईकोट, किल्ले व गढया, कित्येक ठिकाणीं धरणें, कालवे, विहिरी, तलाव व अहमदनगर औरंगाबाद, विजापूर, दिल्ली, पुणें वगैरे शहरांतून मजबूत पाण्याचे नळ. हौद देवालयें, मशिदी व धर्मशाळा, मोर्‍या, पाणपोई वगैरे सरकारी खजिन्यांतील द्रव्या खर्ची घालून तयार केल्या होत्या. हल्लींचे आमचे महातत्वत्तनी खर्‍या एका देवास भजणारे इंग्रज सरकार बहादर, म्युनिसिपालिटीचे द्वारें अन्य मार्गानें रयतेचें द्र्व्य हरण करून, त्या द्रव्यापासून सदरचीं कामें पुरीं करूं लागल्यापासून, आंतून रयतेस दिवसें-दिवस प्रामाणिकपणानें चरितार्थ चालविण्याचें सामर्ध्य कमी कमी होत चालल्यामुळें त्यांस दुर्गणावलंबन करण्याचें हें एक प्रकारचें शिक्षणच देत आहे. तशांत हल्लीं अशा सुधत्तेचे काळांत चार कोट रयतेस दिवसांतून दोन वेळां पोटभर अन्न मिळत नाहीं व ज्यांस भुकेची व्यथा अनुभवल्यावांचुन एक दिवससुद्धां सुना जात नाहीं, असें उघडकीस आलें आहे. यास्तब आमच्या न्यायशील सरकारनें अक्षरशत्नु शेतकर्‍यांचे शेतांवर बाजवी शेतसारा स्थायिक करून, त्यांस विद्वान करून शेतकीसंबंधी ज्ञान दिलें म्हणजे ते पेशवे टोपे खाजगीवाले, पटवर्धन, फडके वगैरे निमकहरामी बंडखोर ब्राह्यणांचे नादीं लागून, आपल्या प्राणास मुकणार नाहींत शिवाय या देशांत इंग्रजाचें राज्य झाल्यादिवसापासून इंग्लंडांतील विद्वान कसबी लोका आपल्या अक्लेच्या जोरानें यंत्नद्वारें तेथें तयार केलेला माल, येथील सर्व अक्षरशून्य ढोरामांगांपासून तो लोहार व विणकरांचे पोटावर पाय देऊन,त्यांजपेक्षा स्वस्त विकूं लागले, यास्तव येथील तांदूळ, कापूस, अळशी, कातडी वगैरे मालाचा खूप इकडे न जाहल्यानें तो माल इंग्लडांतील व्यापारी पाहिजे त्या दरानें स्वस्त खरेदी करून, बिलायतेंतील कसबी लोकांस विकून त्याच्या नपयावर कोटयाधीश बनले आहेत.