शेतकर्याचा असूड - पान ११
सारांश या सर्व कारणांमुळें शेतकर्यांनीं लागवडीकडे केलेला खर्चसुद्धा उभा राहणेची मारामार पडते. तेव्हां ते मारवाडयांपासून कर्ज काढून सरकारी पट्टी देतात. व याविषयीं बारीक चौकशी करण्याकरितां नेमलेल्या ऐषआरामांत गुंग असणार्या व संध्यासोंवळ यामध्यें निमग्न असणार्या भट सरकारी कामगारांस फुरसत तरी सांपडते काय ? त्यांतून इकडील कित्येक मोठया आडनांबाच्या सभांतील सरकारी चोंबडया नेटिव्ह चाकरांनीं " शेतकरी लोक लग्नकार्यनिमित्त्यानें बेलगामी खर्च करितात म्हणून ते कर्जबाजारी झाले आहेत," अशी लटकीच पदरची कंडी उठविल्याबरून, महासमुद्राचे पलीकडील आमच्या माहाज्ञानी, चार चार घोडयांच्या चारटांत बसून फिरणार्या मेंढपाळ तेथील कसबी लोकांनीं तयार केलेल्या विलायती जिनसांवर अजीबात जकात काढून टाकली. येथें त्यांनीं आपल्या शहाणपणाची कमाल केली ! त्यांनीं आपले बडेधडे सावकारांस सालदरसाल सुमारें पांच कोट रुपये व्याज देण्याविषयीं मनांत काडीमात्न विधिनिषेध न आणतां, येथील कायदे-कौन्सिलचे द्वारें ज्या लोकांस गरीबीचा इंगा बिलकुल ठाऊक नाहीं, अशा ऐषआरामी युरोपियन व सोंवळया नेटिव्ह जज्जांकडून गरीब बापडया तुटपुंज्या सावकाराचें अजीबाद व्याज खुंटविण्याचें सोंग उभें करविलें आहे. अहो, सरकारचे मनांत जर आम्हां कंगाल शेतकर्यांविषय़ीं खरोखर कळवळा आहे, तर ते आपले विलायती सावकारांचें एक अर्व रकमेचें व्याज अजीवाद बंद कां करीत नाहींत ? आणि तसें केल्याबरोबर शेतकर्यांचे पाय कसे थारीं लागत नाहींत, हें पाहूं बरें ? परंतु आमच्या सरकारनें मध्येंच एखादी नवीन मोहीस परदेशांत उपस्थित करून तिकडे ही वांचविलेली रकम खर्ची घालू नये, म्हणजे त्यांच्या न्यायीपणाची चहूंकडे वाहवा होईल व मे. वेडरबर्नंसाहेबासारख्या परोपकारी, उदार पुरुषांनीं प्रथम आपल्या विलायतीं सरकारांचें व्याज अजीबाद कमी करण्याविषयीं सरकारची चांगली कानउघाडणी करण्याचें काम एकीकडे ठेवून, अशा नव्या ब्यांकी उपस्थित करण्याचे नादीं लागून शेतकर्याचे माथ्यावर अपेशाचें खापर फोडूं नये. कारण त्यापासून कोणत्याही पक्षाचें हित होणें नाहीं, इतकेंच नव्हे परंतु याशिवाय आमचे गव्हर्नर जनरलसाहेबांनीं एकंदर सर्व शंकर रुपयांचे पगारवरील कामगारांचे पगार व पेनशनी कमी करण्याविषयीं आपल्या मुख्य विलायती सरकारास शिफारस करून, त्याविषयीं बदोबस्त केल्याविना, शेतकर्यांस पोटभर अन्न व अंगभर वस्त्न मिळून त्यांचे कपळचा कर्जबाजारीपणा सुटणार नाहीं, शेतकर्यांनीं आपल्या बायफांमुलांसह रात्नंदिवस शेतांत खपावें, तरी त्यास शेतसारा व लोकलफंड वारून आपल्या कुटुंबांतील दर माणशीं दरमहा तीन तीन रुपयेही पडत नाहींत; आणि साधारण युरोपियन व नेटीव्ह सरकारी कामगारांस दरमहा पंधरा रुपये नसत्या कितकोळ खर्चास व दारुपाण्याससुद्धां पुरत नाहींत. मग कलेक्टर वगैरे कामगारांसारख्या नबाबांचे येयील बेलगामी किरकोळ खर्चविषयी गोष्ट काढल्यास ओढणारा शूद्र शेतकरी असून त्याचे चारपांच कर्ते मुलगे आहेत व ज्याचें कुटुंबांतील सुनाबाळा एकापेक्षां एक अधिक एकमेकींच्या पायावर पाय देऊन चढाओढीनें, घरीं व शेतीं, रात्नंदिवस खपणार्या आहेत व जो ब्राह्यण, गुजर अथवा मारवाडी सावकाराची फुटकी कवडीसुद्धां कर्ज देणें लागत नाहीं, अशाची स्थिती, येथील एका युरोपियन पलटणीतील साधारण गोर्या सोजराच्या स्थितीशीं सुक्ष्म रीतीनें तुलना करून पाहिली असतां, त्यामध्यें काशीरामेश्वरापेक्षांही जास्ती अंतर दिसून येतें, इकडे शूद्र शेतकरी लंगोटि नेसून करगुटयाला चुनातंबाखूची गंतविलेली वटवी, डोंईवर चिध्यांचें पागोटें, उघडाबंव, अनवाणी, हातांत नागराची मूठ धरून भर कडक उन्हामध्य्रं सर्व दिवसभर, शिंपलेवजा नोकदार धसकटांनीं युक्त अशा खरबरीत ढेकळांतून आठ बैलाशीं झटे धेतां धेतां गीत गाऊन नांगर हांकीत आहे; तिकडे गोरा शिपाई पायांत पाटलोन, अंगांत पैरणीवर लाल बनाती डगलें, डोईवर कलाबूतचा कशीदा काढलेली नखरेदार टोपी, पायांमध्यें सुती पायमोज्यावर विलायती वजविलेल्या मजबूत मऊ कातडयाचा दूट, कंबरेवर कातडयाचें तोस्तान व खांद्यावर चापाची बंदूक घेऊन, दररोज सकाळीं अथवा सायंकाळीं हुवाशीर मैदानांत तास अर्धा तास परेडीची कसरत करीत आहे. इकडेस शूद्र शेतकर्यांचा पिढीजादा दरबारी पोशाख म्हटला म्हणजे, जाडाभरडा खादीचा दुहेरी मांडचोळणा, बंडी, पासोडी, खारवी पागोटें आणि दोरीनें आळपलेला गांवठी जोडा, ज्यांची निहारी व दुपारी संध्याकळयें जेवण जोंधळे, नाचणीची किंवा कोंडयाभोंडयाच्या भाकरीं, वा गाजरेंरताळांची वरू, कालवण आमटी अथवा बोंबलाचें खळगुट, तेंही नसल्यास चटणीच्या गोळयाशिवाय भाकरीवर दुसरें कांहीं मिळावयाचें नाहीं. चटणी भाकर कां होईना, परंतु ती तरी वेळच्या वेळीं व पोटभर त्यास मिळते काय ? राह्तें घर वैलांच्या गोठयाशेजारीं असून ज्याच्या उशापावथ्याशीं तीन्ही वासरें, पारडीं अथवा कर्डे बांधलेली असल्यामुळें घरांत चहूंकडे मुतारीची उवट घाण चालली आहे, फाटके पटकूर व मळकट गोधडीचें अंथरूण पांघरूण, सर्व गांवच्या म्हशी पाण्यांत वसून बसून खराब झालेल्या डोहाचे खालचे बाजूस उकरलेल्या डहुर्यांतील पाणी पिण्याचें गांवांतील खिंडार तेंच त्यांचा शेतखाना, तशांत मोडशी होऊन त्यास जाळताप आल्यास चांगल्या औषधी व त्यांचा माहीतगार डॉक्टराच्या नांवानें आंवळयाएवढें पूज्य, याशिवाय सरकारी शेतसारा वगैरे फंड व पटया कोठून व कशा द्याव्यात, यासंबंधी त्यांच्या उरावर कटार टांगलेली असते. अशा अभागी शेतकर्यांचीं अक्कल गुंग होणार नाहीं, असें एखाद्या वाकबगार गोर्या अथवा काळया डॉक्टराच्यानें छातीस हात लावून म्हणवेल काय ? तिकडे सरकारी विलायतेहून गोर्या शिपायांच्या पोषाकाकरितां उंच कपडे, वनाती, रुमाल, पायमोजे, बूट खरेटी करून आणवितें, सरकारी त्यांच्या खाण्यापिण्याकरितां उत्तम गहूं, तांदूळ, डाळ, निकोपी तरुण गाया, शेळया व मेंढयांचेम मांस, विलायती पोरटर वगैरे अंमली दारू, निर्मळ तेल, तूप, दूध,साखर, चहा, मीठ, मिरच्या,गरम मसाला, सुरी, कांटा वगैरे सामान येथें खरेदी करून, खिस्ती अचार्याकडून तीन वेळां ताजा पाक सिद्ध करवून त्यास वेळचे वेळीं आयतें जेऊं घालितात. त्यास राहण्याकरितां लाखों रुपये खर्चो घालून सरकारनें दोन मजली टोलेजंग बराकी बांधल्या आहेत. जीमध्यें लोखंडी खाट, बिछान्यावर उशी, पलंगपोसासह धाबळीची सोय केली असून वरतीं रोषणाईसाठीं हंडी लोंबत आहे. बराकीचे आंगणांत स्तानाकरितां न्हाणी करून तिजमध्यें " फिल्टर " केलेले पाण्याची तोटी सोडली आहे. त्याचप्रमाणें स्वच्छ सोयीचें शौचकूप केलेंच आहे. तशांत अजीर्णांमुळें किंचित् खोकला किंवा ताप आला कीं, त्यांच्या जिवासाठी दवाखाना तयार केलेला असून त्यामध्यें शेंकडों रुपये किंमतीचीं औषधें, शस्त्नें वगैरे ठेवून त्यावर हजारों रूपये दरमहा पगाराच्या डॉक्टराची नेमणूक करून, त्यांच्या तैनातीत डोलीसुद्धां हुमाल दिलेले आहेत. याशिवाय त्यास देण्यामागण्याची काळजी नसून, घर, शेतखाना, झाडू, पाणी,रस्ता, शेत व लोकलफंड पट्टी वगैरे देण्याची ददात नसून, असमानी व टोळांच्या सुलतानीविषयीं बिलकूल काळजी नाहीं आणि यावरूनच आपण सोंवळयांतील नेटिव्ह कामगारांस धिःकारानें म्हणतों कीं, पहा हा नेटिव्ह कामगार, ऐषआरामीं युरोपियन कामगारांचे पुढें पुढें करून अज्ञानी शेतकर्यांपासून लांच खाऊन कसा सोजरासारखा लाल गाजर पडला आहे. काय हा उधळेपणा ! याला म्हणावें तरी काय ? यास्तव आमचे डोळे झांकून निराकार परमात्म्याची प्रार्थणा करणार्या, विलायती सरकारानें येथील धूर्म ब्राह्यणांनी उपस्थित केलेले समाजांच्या व वर्तमानपत्नांच्या गुलाबी लिहिण्यावर विककुक भरंवसा न ठेवितां, एकंदर सर्व आपल्या सरकारी खात्यांतील गोर्या व काळया कामगारांस वाजवीपेक्षां जास्ती केलेले पगार अजीबाद कमी करून, अज्ञानानें गांजलेल्या दुबळया शूद्र शेतकर्यांस विद्यादान देऊन त्यांच्या बोडक्यावरील शेतसार, टोल वगैरे पटया कमी न केल्यास, थोडयाब काळांत या जुलमाचा परिणाम फार भयंकर होणार आहे, असें आमच्या ऐषआरामी उधळया सरकारचे कानांत सांगून याप्रसंगीं पुरें करितों.