Android app on Google Play

 

नेपोलियनविरुद्ध रशिया, प्रशिया, इंग्लंड, आस्ट्रिया व फितुर फ्रेंच सरदार

 

नेपोलियनच्या मागोमाग रशियाचा अलेक्झांडर झार युद्धाच्या बेतानें आला व प्रशियन राजा फ्रेडरिक, आस्ट्रियाचा राजा व इंग्लंड या सर्वांच्या मदतीनें फ्रान्सवर चाल करण्याच्या उद्योगास लागला. नेपोलियननें या संकटास तोंड देण्याची तयारी लगेच सुरू केली. प्रथम कैदेंतील पोपला सोडून त्याच्याशी सलोखा केला. सेनेट सभेला सर्व परिस्थिति कळवून साडेतीन लाख सैन्यभरतीचा कायदा करून घेतला; व घरंदाज लोकांकडून स्वयंसैनिकांची पथकें उभारली. थोडक्या दिवसांत सर्व तयारी करून संयुक्तांच्या फौजा एकत्र होण्यापूर्वी त्यांचा पृथक्-पृथक् पराभव करण्याच्या योजनेनें तो निघाला. आस्ट्रिया स्वत:ला मिळावा निदान तटस्थ रहावा म्हणून त्यानें खटपट केली, पण आस्ट्रियन प्रधान मेटरनिक यानें नेपोलियनची अखेर लावण्याच्या दूरवर धोरणानें वरून तहाचीं बोलणीं लावून आंतून संयुक्तांनां पूर्ण मदत केली, व अखेर उघडपणें संयुक्तांस मिळाला. शिवाय या वेळीं नेपोलियनविरुद्ध संयुक्तांनीं " सर्व राजांनीं व संस्थानिकांनीं आपापलीं सैन्यें घेऊन नेपोलियनच्या जाचांतून यूरोप मोकळें करण्यास मदत करावी " असा जाहीरनामा ता. १९ मार्च १८१३ रोजीं काढला आणि झारनें प्रत्यक्ष पत्रें पाठवून व लालूच दाखवून नेपोलियनच्या अनेक मांडलिकांनां नेपोलियनविरुद्ध उठविलें: इतकेंच नव्हे तर खुद्द नेपोलियनचे जुने सरदार व सैन्य यांनां फितुर करण्याचे यत्‍न केले.

उभय सैन्यांची पहिली लढाई लटझेन येथें, दुसरी ड्रेसडेन व तिसरी बटझेन येथें होऊन  तिन्हींत नेपोलियनला जय मिळाला. तेव्हां मेटरनिकनें तहाचीं बोलणीं सुरू केली. अद्याप आस्ट्रिया तटस्थ होता. तह करण्याचा संयुक्तांचा विचार नसून केवळ तयारीस फुरसत मिळण्याकरितां तहाचीं बोलणीं चालू ठेवलीं होतीं नेपोलियनलाहि तयारीला अवसर मिळाला; तथापि त्याला तह मनापासून पाहिजे होता.पण मेटरनिकनें अशक्य अटी हळूहळू पुढें करून संयुक्तांची पुन्हां तयारी होतांच तह होत नाहीं असें जाहीर केलें, व आस्ट्रिया उघडपणें संयुक्तांस मिळाला. या वेळेच्या संयुक्तांच्या तयारींत अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बरनेडो, मोरेऊ व जोमिनी या नेपोलियनकडील कसलेल्या सरदारांची प्राप्ति. या फितूर सरदारांनीं संयुक्तांनां असा सल्ला दिला कीं, "संयुक्तांचें सैन्य केवढेंहि असलें तरी प्रत्यक्ष नेपोलियन जेथें जातीनें हजर असेल तेथें त्याच्या सामन्यास उभे राहूं नये व लढाई देण्याचें धाडस करूं नये. तेथून पळ काढावा आणि तो नसेल तेथें त्याच्या सरदारांशीं लढाई देऊन फ्रेंच सैन्याचा नाश करावा".  ही युक्ति लिजनिटस, ड्रेसडेन, गोरलिझ वगैरे ठिकाणीं अवलंबिल्यामुळें नेपोलियनला विनाकारण धांवपळ करावी लागून सैन्यांत अव्यवस्था फार झाली. शिवाय सैन्याच्या तुकड्याच्या तुकड्या फितूर होऊन संयुक्तांनां मिळूं लागल्या अशा स्थितींत संयुक्तांनी मोठ्या सैन्यानिशीं खुद्द नेपोलियनशीं लिप्झिक येथें मोठी लढाई दिली तींत नेपोलियनचा पराभव झाला.

तेव्हां माघार घेत नेपोलियन ९ नोव्हेंबर १८१३ रोजीं पॅरिसला परत आला. कारण पॅरिसमध्येंहि फितुरी माजून सर्व अव्यवस्था झाली होती. येथें फितुरांचा अग्रणी खुद्द टालेरांड होता.नेपोलियन  'लेजिस्लेटिव्ह बॉडी',  या सभेपुढें नवें सैन्य मागूं लागला पण तें नाकारण्यांत आलें. तथापि संयुक्तांची फौज फ्रेंच सरहद्दीवर जमल्यामुळें खुद्द फ्रान्सच्या संरक्षणाचा प्रश्न आहे, हें निरनिराळ्या लष्करी व मुलकी शिष्टांच्या सभेंत समजून सांगितल्यावर नेपोलियन म्हणाला " जगाची सत्ता फ्रान्सला मिळवून द्यावी अशी मी हिंमत बांधली होती. पण फ्रान्सच्या लोकवस्तीच्या मानानें पाहतां माझे बेत अफाट होते. या बाबींतल्या चुकीमुळें माझे अंदाज फसले. त्याकरितां कांही भोगावें लागल्यास मी स्वत: भोगीन प्रसंग पाहून वेळ पडेल त्याप्रमाणें मी तहहिं करीन ". या भाषणानें देशसंरक्षणाकरितां सैन्यांत दाखल झालेले लोक घेऊन नेपोलियननें संयुक्तांविरुद्ध मार्मंड, मांटेरू, मेरी, सोइसन्स, क्रेओन, र्‍हीम्स वगैरे ठिकाणीं जय मिळविले. पण त्यांत त्याचें बरेच सैन्य नाश पावलें, आणि सर्व तर्‍हेची सामुग्री पॅरिसमधून घेऊन येणारे खटारे शत्रूंनी हस्तगत केले. तेव्हां संयुक्तांनां अडविण्याचें काम अशक्य होऊन त्यांच्या दोन लाख सैन्यानें चाल करून पॅरिस शहर हस्तगत केलें.