आस्ट्रियाशीं दुसरें युद्ध
ही परिस्थिति पाहून नेपोलियननेंच आस्ट्रियावर चालून जाण्याचें ठरविलें, व मोरेयू या सेनापतीस तिकडे रवाना केलें व स्वत: अत्यंत गुप्तपणानें दुसरे सैन्य तयार करून व अत्यंत बिकट असा आल्प्स पर्वत ओलांडून त्यानें आस्ट्रियन सैन्याला अचानक गाठलें व मारेंगो येथें आस्ट्रियन सरदार डिमेलो याच्या सैन्याचा पूर्ण मोड केला. डिमेलोनें तात्पुरता तह केला. तो नाकारून आस्ट्रियन सरकारनें युद्ध चालविलें, तेव्हां होहेनलिडन येथें पुन्हां पराभव झाल्यामुळे अखेर आस्ट्रियानें तह केला आणि इटलीचा पूर्वी फ्रान्सनें जिंकलेला प्रदेश मध्यंतरी आस्ट्रियानें घेतला होता तो फ्रान्सला पुन्हां परत मिळाला.