नोकरी
१७८५ च्या आक्टोबरात नेपोलियननें येथील परीक्षा देऊन तोफखान्याच्या पलटणींत नौकरी धरली. तेथें त्यानें प्रायव्हेट, कार्पोरल व सार्जंट यांचीं कामें केल्यावर १७८६ सालीं त्याला ज्युनियर लेफ्टनंटची जागा मिळाली. १७८५ सालीं त्याचा बाप वारला, त्यावेळीं त्याच्या आईचें वय तीस वर्षांचे होतें; यावेळीं कुटुंबाचा भार नेपोलियनवर पडला. दुसरें उत्पन्न विशेष नव्हतें, शिवाय एक जुना वतनाचा दावा नेपोलियनच्या बापानें लावाला होता त्यांतहि नेपोलियन हरला तेव्हां सांपत्तिक स्थिति आणखी वाईट झाली. तथापि मॅडम मेरियानें दक्षतेनें व काटकसरीनें दिवस काढलें. आईचें हे काटकसरीचें वळण नेपोलियनला पुढें फार उपयोगी पडलें. त्यानें अनेक लढाया केल्या पण कधी त्याला कर्ज काढावें लागलें नाहीं किंवा कागदाचें नाणें पाडावें लागलें नाहीं. नौकरींत असतां तो रजा घेऊन वारंवार कॉर्सिकांत येई. कॉर्सिकाबेट फ्रेंचांच्या ताब्यांतून सोडवून स्वतंत्र करावें हा विचार त्याच्या डोक्यांत होता. नोकरीवर व रजेवर असतांनाहि त्याचें वाचन व अभ्यास चालूच असे. या वेळच्याहि चोपड्या व टिपणें अद्याप आहेत. विशेषत: पारतंत्र्यांतून स्वातंत्र्य मिळवलेल्या लोकांचा इतिहास तो बारकाईनें अभ्यासी. ग्रीस, रोमन, कार्थेज, इंग्लंड, फ्रान्स, पर्शिया, चीन अरबस्तान, वगैरे देशांचा इतिहास त्यानें लक्षपूर्वक वाचला. फ्लुटार्क, सीझर, कार्नेली, व्होल्टेअर, रूसो यांचे ग्रंथ त्याला फार आवडत. इंग्लंडच्या इतिहासाचा अभ्यास, विशेषेंकरून १६८८ सालच्या राज्यक्रांतीपर्यंत त्यानें स्वत:चीं टिपणें लिहिलीं आहेत. त्यांत क्रॉमवेलबद्दल तो लिहितो: “धीर, हुषार, कपटी, व ढोंगी असून त्याची पूर्व वयांतील लोकशाहीचीं उच्च तत्त्वें पुढें त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या सर्वभक्षक ज्वाळांनां बळी पडलीं; आणि सत्तेचीं मधुर फळें चाखल्यावर एकट्यानें अनियंत्रित राज्यकारभार करण्याच्या सुखाची त्याचती लालसा प्रबळ झाली.” नेपोलियननें राजकारण, समाजव्यवस्था, न्याय, वगैरे वरील अनेक ग्रंथ व शिवाय काव्य व नाटकेंहि वाचलीं. शिवाय द्रव्यार्जनाच्या इच्छेनें निबंध, इतिहास व कादंब-या लिहिल्या.
रजेवरून परत आल्यावर १७८८-८९ सालीं आक्झोन येथील बंडाळी मोडण्याच्या कामावर त्याच्या सैन्याची तुकडी नेमली गेली. त्याच सुमारास फ्रेंच राज्यक्रांतीचा स्फोट झाला (सप्टेंबर १७८९). त्याचा फायदा घेऊन स्वतंत्र व्हावें म्हणून कार्सिकांतल्या लोकांनीं दांडगाईचे प्रकार सुरू केले. तथापि लढाई न करतां कार्सिकाचा पूर्वां हद्दपार केलेला पुढारी पेआली यालाच परत बोलावून त्याच्याकडे कार्सिकाच्या बंदोबस्ताचें काम फ्रेंच सरकारनें दिलें. पण फ्रान्सशीं राजनिष्ठ न राहतां इंग्लंडच्या मदतीनें कार्सिका स्वंतत्र करण्याचीं कारस्थानें पेआलीनें सुरू केली. उलटपक्षीं लहान कार्सिका बेट पूर्ण स्वतंत्र न राहूं शकतां बलाढ्य राष्ट्राच्या भक्ष्यस्थानीं पडेल हें जाणून तें फ्रान्सच्या अमलाखालीं राहणेंच इष्ट आहे असें नेपोलियननें विचारपूर्वक ठरवून पेआलीला उघड विरोध केला. स. १८९१ मध्यें सैन्याची पुनर्रचना झाली, तींत नेपोलियनची व्हलेन्स येथें लेफ्टनंटच्या जागीं नेमणूक झाली. येथेंहि एक राजकीय क्लब होता. तेथील लायब्रेरियन नेपोलियन झाला. तेथेंच “सुखप्राप्तीसाठीं मनुष्यामध्यें कोणतीं अत्यंत महत्वाचीं सत्यें व मनोविकार बिंबविलें पाहिजेत” ह्या, बक्षिसाकरितां नेमलेल्या विषयावर त्यानें निबंध लिहिला. त्यांत त्यानें स्पार्टन लोकांच्या समाजरचनेची स्तुति केली होती. स. १८९१ मध्यें तो रजा घेऊन कार्सिकांत गेला. त्या वेळीं पेआलीबरोबरचें त्याचें भांडण वाढतच गेलें. पुढें फ्रेंच सरकारनें पेआली व त्याचा दोस्त पोझोडीबर्गो या दोघांनां हद्दपार केल्यामुळें ते अनुक्रमें इंग्लंड व रशियांत जाऊन राहिले; व अखेरपर्यंत पोझोडीबर्गोनें झारचें मन नेपोलियनविरूद्ध कलुषित करून वैर वाढविलें. कार्सिकन लोकहि नेपोलियनविरूद्ध विडून त्यांनीं त्याच्या घरावर हल्ला करण्याचें ठरविलें. त्यामुळें १७९३ फेब्रुवारी ता. १ रोजीं नेपोलियन आपल्या सर्व कुटुंबीयांसह पळून फ्रान्समध्यें येऊन राहिला व त्यानें सर्वस्वी फ्रेंच रिपब्लिक सरकारच्या नोकरीला वाहून घेतलें.