Android app on Google Play

 

टूलोनचा विजय

 

फ्रेंच राज्यक्रांतिकारकांनीं राजाराणीला पदच्युत केल्यामुळें व पुढें ठार मारल्यामुळें आस्ट्रिया, प्रशिया, इंग्लंड, हॉलंड, स्पेन, वगैरे देश प्रान्सवर चालून आले. खुद्द फ्रान्समध्येंहि राजशाहीचा पुरस्कर्ता असा एक पक्ष होता. या परिस्थितीचें बारकाईनें निरीक्षण करून आपलीं तें प्रश्नोत्तर रूपानें सोप्या भाषेंत लिहिलेलें एक लहानसें पुस्तक नेपोलियननें प्रसिद्ध केलें; त्यांत नव्या सरकारास मान्यता देऊन सर्व फ्रेंचांनीं चालून आलेल्या आस्ट्रियादि शत्रूंनां तोंड देण्याकरितां एकी केली पाहिजे असें प्रतिपादिलें. याच सुमारास टूलोनच्या राजपक्षीयांनीं तें बंदर इंग्रजांच्या ताब्यांत दिल्यामुळें त्यांनां तेथून हांकून लावण्याकरितां कार्टो, डॉपेट, व डुगोमीर या तीन नालायक सरदारांची अनुक्रमें नेमणून झाली व त्यांच्या हाताखालीं नेपोलियनला नेमलें. नेपोलियननें टूलोनची नीट पाहणी करून तोफांच्या मा-याकरितां जागा नक्की केली. प्रथम लएग्युलेट या महत्त्तवाच्या ठिकाणचा किल्ला मोठ्या निकराचा हल्ला करून सर केला. त्यावर लवकरच (ता. १९ डिसेंबर, १७९३) टूलोन हस्तगत झालें. या सर्वाचें श्रेय इतर वरिष्ठ व कनिष्ठ फ्रेंच अधिका-यांनीं मन:पूर्वक नेपोलियनला दिलें; पॉरिसमध्यें त्याचा लौकिक वाढला.