Android app on Google Play

 

कैद

 

वरील विजयानंतर दक्षिण फ्रान्सच्या किना-याची लष्करी दृष्ट्या मजबुती करण्याच्या कामावर नेपोलियनची नेमणूक होऊन तो तिकडे गेला. इकडे पॅरीसमध्यें कन्व्हेन्शन म्हणून तात्पुरी राज्यकारभार पहाणारी सभा होती तिचा मुख्य राबिसपिअर व बारस यांच्याशींहि नेपोलियनचें विशेष सख्य झालें. पण राबिसपिअर मोठा क्रूर असून त्यानें केवळ संशयावरून अनेक फ्रेंच स्त्रीपुरूषांनां वघाची शिक्षा ‘कमिटी ऑफ पब्लिक सेफ्टी’ नांवाच्या लष्कीर न्यायसभेमार्फत देवविली. या जुलुमामुळें चिडून कांहीं कटवाल्यांनीं राबिसपिअर व तत्पक्षीय आणखी एकवीस जणांस ठार मारलें. त्यावेळीं नेपोलियनविरूद्ध देशद्रोहाचा आरोप करून त्याला कैदेंत टाकलें; पण पुढें न्यायाधीशांनीं त्याचा जबाब ऐकून त्याला पूर्ण निर्दोषी ठरवून सोडून दिले. तथापि नेपोलियनची नोकरी गेली व त्याच्या सर्व कुटुंबाला कांहीं दिवस मोठ्या दारिद्यांत व संकटांत काढावे लागले. त्यावेळीं द्रव्याकरितां त्यानें पुस्तकें लिहिलीं, नोकरीकरितां अर्ज केले व मॅडम परमान नांवाच्या संपत्तिमान पण वयानें ब-याच अधिक असलेल्या विधवेशीं विवाह करण्याचाहि प्रयत्न केला. पण कांहींच जमलें नाहीं.