Android app on Google Play

 

तहाहयात कॉन्सल, अन्त:सुधारणा, कट, सम्राटपद

 

मारेंगोच्या विजयानंतर लगेच नेपोलियन पॅरिसला परत आला. एके दिवशीं नेपोलियन नाटकाला गेला असता त्याच्या गाडीला राजपक्षाच्या कटवाल्यांनी स्फोटक द्रव्यांनी अपघात करण्याचें टरविलें. पण नेपोलियनच्या गाडीला इजा न होतां इतर इसम मरण पावले. या कटाचा शोध लावून त्यानें अनेकांना फाशीच्या व हद्दपारीच्या शिक्षा दिल्या. या राजपक्षाच्या कटामुळें व आस्ट्रियावरील विजयामुळें लोकमत नेपोलियनला फार अनुकूल बनलें आणि कॉन्सलच्या जागेची तीन वर्षांची मुदत संपल्यानंतर त्याला कायदेमंडळांनीं व सर्व फ्रेंच नागरिकांपैकीं ३५६८८८५ अनुकूल व ८३७४ प्रतिकूल मतांनीं तहाहयातचा फर्स्ट कॉन्सल नेमलें. आस्ट्रियाचा पराभव झाल्यामुळें व झार नेपोलियनमला मिळाल्यामुळें इंग्लंडनेंहि नमतें घेऊन नेपोलियनशीं अमीन्सचा तह २७ मार्च १८०२ साली केला. नेपोलियननें फर्स्ट कॉन्सल झाल्यापासून फ्रन्सच्या अन्तर्गत सुधारणेकडे फार बारकाईनें लक्ष दिलें. फ्रेंच राज्यक्रांतीकारकांनी जुने कॅलेंडर बदलून, धर्म नाहींसा करून, पिढीजाद अमीरउमरावांचीं घराणीं उध्वस्त केली होतीं. नेपोलियननें पुन्हां जुनें कॅलेंडर, धर्मखातें, पोपची सत्ता वगैरे प्रस्थापित करून परदेशीं पळालेल्या राजपक्षाच्या अनेक श्रीमंत सरदारांनां देशांत परत येऊं दिलें. पूर्वी डायरेक्टरांनीं कैदेंत टाकलेल्या अनेक राजकीय पुढार्‍यांनां सोडून देऊन त्यांनां मोठाल्या नोकर्‍याहि दिल्या.

कायद्याचीं कोडें नवीन तयार केलीं तीं इतकीं चांगली आहेत कीं, हल्लीं बर्‍याच यूरोपीय देशांतील कायदे त्या नमुन्याचे आहेत. त्यानें शिक्षण, शेती, कालवे, व्यापार, वगैरे सर्व खातीं सुधारलीं. पदव्या देण्याची पद्धत पुन्हां सुरू करून ' लीजन ऑफ ऑनर ' नांवाचें पदक देण्याची नवीन योजना केली. कोणत्याहि धंद्यांत किंवा पेषांत उत्कृष्ट ठरेल त्याला हें पदक व त्याबरोबर जमीन किंवा देणगीहि मिळे. याप्रमाणें समानतेचीं तत्वें राखून सर्व लोक व सर्व राजकीय पक्षांनां त्यानें खुष केलें; बोरबोन राजघराणयाचा वारस अठरावा लुई यानेंहि नेपोलियनला ' मला तुम्ही फ्रन्सच्या गादीवर बसवावें ' वगैरे मजकुराचें पत्र लिहिलें! त्याला मात्र ' तुम्ही या भानगडींत पडूं नये ' असें उत्तर नेपोलियननें निक्षून लिहिलें. या निराशेमुळें बोरबोन घराण्याच्या वतीनें एक मोठा कट, नेपोलियनला ठार मारण्याकरितां १८०४ सालीं झाला. त्याचा पुढारी जॉर्ज काडोडल असून त्याला इंग्लंडांतून पैशाची मदत होती.

या मोठ्या कटाचा सुगावा दुसर्‍या एका बारक्या कटातील आरोपीकडून नेपोलियनला कळला. मोरेयू, पिशेग्रू, बोरबोन घराण्यांतला ड्यूक-डी-एन-गार्डन, कौंट आर्टाय वगैरे बडे इसम कटांत सामील असल्याचें शाबीत झालें. पुष्कळांनां देहांतशासन झालें. या कटामुळें फ्रान्सच्या जनतेला बोरबोन घराण्याची पुन्हां भीति वाटूं लागून नेपोलियनलाच राजपद देण्याकडे लोकमत वळलें. १८ मे १८०४ रोजी फ्रेंच साम्राज्याचा नेपोलियनला हादशहा करण्याची सूचना सीनेटनें मान्य केली. पुढें सर्व फ्रेंच नागरिकांचीहि मतें घेतलीं तेव्हां ३५७२३२९ अनुकूल मतें पडलीं तदनुसार नेपोलियनला जोसेफाईन राणीसह राज्याभिषेक नॉटरडॅम येथें खुद्द पोपच्या हस्तें होऊन त्यांनां राजमुकूट अर्पण करण्यांत आले. नंतर २० मे १८०५ रोजी  ' इटलीचा राजा ' हें पद व राजमुकूट धारण केला. शिवाय तहाहयात कॉन्सल झाल्यापासून नेपोलियननें सर्व सत्ता आपल्या एकट्याच्या हातीं ठेवण्यासाठी राज्यघटनेंत हळू हळू अनेक फरक केले होते.