Android app on Google Play

 

लहानपण व सुरुवातीचे दिवस

 

नेपोलियनचा जन्म भूमध्य समुद्रातील कोर्सिका बेटावरील अयात्सियो येथे १५ ऑगस्ट १७६९ रोजी झाला. त्याचे नाव त्याच्या मोठ्या भावाच्या नावावरुन ठेवण्यात आले. १७७० मध्ये कोर्सिका द्विप फ्रेंचाच्या ताब्यात आले. नेपोलियनचे घराणे कुठल्याही प्रकारे लष्करी परंपरेचे नव्हते व तसेच फ्रेंचही नव्हते. बोनापार्ट घराणे हे कोर्सिकन मानले जायचे ज्याची मुळे इटालियन होती. परंतु कोर्सिकामधील श्रीमंत व मानाचे होते. त्याचाच फायदा नेपोलियनला फ्रांन्स मध्ये आल्यावर लष्करी शाळेत प्रवेश घेताना झाला.१७८४ मध्ये लष्करी शिक्षण पुर्ण झाल्यावर फ्रान्सच्या सर्वोच्च लष्करी अकादमी मध्ये प्रवेश घेतला. नेपोलियनला गणित व भूगोलात खूप गति होती. त्याचे ऍतिहासिक लष्करी मोहिमेंचे ज्ञान सर्वांना अचंबित करणारे होते. त्याने तोफखान्यामध्ये विषेश प्राविण्य मिळवले.

१७८५ मध्ये अभ्यासक्रम पुर्ण झाल्यावर फ्रेंच लष्करामध्ये त्याची सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्ति झाली. सुरुवातिच्या काळात त्याची जवाबदारी लष्करी चौकिवरील अधिकारी म्हणून होती. फ्रेंच राज्यक्रांतिच्या काळात नेपोलियन कोर्सिकामध्ये होता. नेपोलियनने या क्रांति मध्ये कोर्सिकामध्ये जॅकोबियन गटाला साथ दिली. त्याला लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळाली व त्याने क्रांतितील स्वयंसेवकांचे नेतृत्व केले. कोर्सिकामधील परिस्थिती नेपोलियनसाठि बिकट बनली व त्याला मुख्य फ्रांन्समध्ये पळुन यावे लागले. फ्रान्समध्ये परतल्यावर नेपोलियनचे लष्करी कारकीर्द खर्‍या अर्थाने चालु झाली. निकटवर्तीयाकडुन त्याला तुलाँ येथील बंडखोरांविरुद्ध आघाडीची कामगीरी मिळाली. यातील यशामुळे नेपोलियनची ब्रिगेडियर पदावर बढती झाली. या प्रयत्नात तो जखमी पण झाला होता. यानंतर नेपोलियनने आघाडीच्या क्रांतिकारकांबरोबर आपले हितसंबध वाढवले.

१७९५ मध्ये नेपोलियन पॅरिसमध्ये होता जेव्हा राजेशाही समर्थक व क्रांतिकारकामध्ये सशस्त्र उठाव झाला. राजेशाही समर्थकांना राष्ट्रिय ठराव उलथुन टाकायचा होता. ह्या वेळेस नेपोलियन ने बजावलेल्या कामगीरी मुळे बंडखोरांचा कणाच मोडुन काढला व नेपोलियन खर्‍या अर्थाने फ्रान्समधील प्रभावशाली लष्करी अधिकारी म्हणून गणला जाउ लागला. यानंतर नेपोलियनचे जोसेफिन शी लग्न झाले.