Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १४: वडीलांचा आधार

शरद, "कहते है, अगर किसी चिज को सच्चे दिलसे चाहों तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने की कोशीश में लग जाती है। आज मुझे यकीन हो गया है दोस्तों, हमारी जिंदगी भी हमारे हिंदी फिल्मो के जैसी ही है। जहॉं एन्ड मे सब कुछ ठिक हो जाता है। 'हॅप्पी एन्डिंग्स' लेकीन अगर एन्डमें सब कुछ ठिक ना हो तो वो 'दी एन्ड' नही है दोस्तो, पिक्चर अभी बाकी है।"

प्रसाद, "डायलॉग का मारतोस?"

शरद, "अरे मुव्ही बघायला गेलो होतो."

अशोक, "मस्त मुव्ही होता."

प्रसाद, "तुम्ही दोघंच गेले होते का?"

अशोक, "आमचं नशिब कुठे एवढं मोठं, की आमच्यासोबत मुली येतील."

प्रसाद, "बरं हे घ्या. आणि पूर्ण फॉर्म भरुन द्या मला."

अशोक, "कसला फॉर्म आहे?"

प्रसाद, "पासपोर्टचा."

शरद, "म्हणजे आपण ऑस्ट्रेलियाला जाणार का?"

प्रसाद, "सद्यातरी फॉर्म भरा. ऑस्ट्रेलियाचं नंतर बघू."

अशोक, "अरे त्या स्टिफनने परत फोन केला का?"

प्रसाद, "बरं झालं आठवण करुन दिलीस. त्यालाच फोन करणार होतो."

प्रसाद स्टिफनला फोन करतो. स्टिफनला मात्र संपूर्ण बदमाश ग्रुपचा राग आलेला असतो. स्टिफन त्याचा फोन उचलत नाही. नंतर थोड्या वेळाने प्रसादला स्टिफनचा मेसेज येतो. 'आम्ही सर्वच ऑस्ट्रेलियामध्ये खूश आहोत. या पुढेदेखील आम्ही सर्वजण खूश रहावं असं तुम्हा सर्वांना वाटत असेल तर कृपया आमच्यापैकी कुणालाही फोन करु नका.'

शरद, "हा घे. झाला फॉर्म भरुन."

अशोक, "काय झालं रे?"

प्रसाद त्या दोघांच्या हातात मोबाईल देतो.

शरद, "आता त्याला काय झालं. त्या दिवशी तर व्यवस्थित बोलत होता."

अशोक, "परत ट्राय करुन बघ."

प्रसाद, "नको. तो बोलला ना, कॉन्टॅक्ट नको करु. मग कशाला त्यांना फोन करुन त्रास द्यायचा?"

अशोक लगेचच अजयला फोन करतो. अजय प्रसादच्या निर्णयाशी सहमत असतो, "आपण फोन केल्याने जर त्या लोकांना त्रास होत असेल तर आपणच प्रत्येक वेळी का म्हणून ऐकून घ्यायचं? मागच्या वेळी आला तेव्हा तर खूप गोड बोलत होता. मी असं करेन, तसं करेन, हे बाहेरचे लोकं सगळे असेच असतात."

अजयचे शब्द प्रसादला योग्य वाटतात. तोसुध्दा अभिजीत आणि गौरीचा विषय सोडून देतो. पण आता जेवढे आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी करायचं असं ठरतं. मग अजय आणि प्रसादच्या बोलण्यावरुन 'बदमाश फ्रेंडस् एज्युकेशनल ट्रस्ट' पुन्हा एकदा सुरु केली जाते. अजयच्या बिझनेसमधली नफ्यातील काही रक्कम तो गरीब विद्यार्थ्यांसाठी बाजूला ठेवतो. प्रसाद, अशोक आणि शरद ट्रस्टच्या जुन्या ऑफिसचं टाळं उघडतात. हळूहळू काही विद्यार्थी मदतीसाठी तिथे येतात. या वेळी मिनाक्षी आणि काजल दोघी कार्यालयीन कामकाज सांभाळतात. महिना-दोन महिने निघून जातात. पण ऑस्ट्रेलियामधून कुणाचाही फोन येत नाही. भारतातून देखील कोणीही त्यांना फोन करत नाही.

जो तो आता आपापलं आयुष्य जगत होता. ट्रस्टच्या माध्यमातून ग्रुपने आपलं काम पुन्हा एकदा सुरु केलं ही गोष्ट पत्रकारांपर्यंत पोहोचते. मग त्या ट्रस्टचं ऑफिस पुन्हा एकदा गजबजू लागतं, अर्थातच पत्रकारांनी. सर्व पत्रकारांचा एकच प्रश्न असतो, अभिजीत कुठे आहे? ट्रस्टमधील कोणीही अभिजीतबद्दल काही बोलत नाही. पत्रकारच ते, प्रसाद आणि त्याच्या मित्रांनी काही सांगितलं नाही तरी ते स्वस्थ बसणारे नव्हते. ते सर्वजण अभिजीतचा शोध घेऊ लागतात. अरुणाचल प्रदेश पासून गुजरातपर्यंत, मनालीपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांना अभिजीत कुठेही सापडत नाही. पत्रकार शांत बसणारे नव्हते, शेवटी ते अभिजीतच्या वडीलांना शोधण्यात यशस्वी होतात. सतत टी.व्ही.वर त्याच्या वडीलांची बातमी येऊ लागते. त्याचे आईवडील मुंबईमधील घर विकून सर्वांपासून लांब नाशिक येथे एका खेडेगावात राहत होते. त्यांचा अभिजीतच्या आयुष्याशी काही संबंध नसतो. गावात विजेची व्यवस्था नसते, रस्ते कच्चे असतात, तातडीने उपचार करण्याची व्यवस्था त्या खेडेगावात नसते, शिक्षण नावाचा प्रकार त्या गावात फारसा परिचयाचा नसतो. तरीही निसर्गाच्या शांत वातावरणात ते गावीच सुखी असतात. शेती करणे, पशूपालन करणे, गावातील समवयस्करांशी इकडच्या-तिकडच्या गप्पागोष्टी करणे यातच त्यांचे दिवस पुढे जात होते.

अचानकपणे पत्रकारांनी धाडी टाकल्याने आणि त्यात अभिजीतबद्दल विचारपूस केल्याने त्याच्या वडीलांना संताप येतो. ते सर्व पत्रकारांना गावातून बाहेर निघून जायला सांगतात. तरीही अभिजीतच्या वडीलांनीच अभिजीतला गावी कुठेतरी लपवून ठेवलं असेल अशी अफवा संपूर्ण महाराष्ट्रात पसरते. ती अफवा पार दिल्ली येथे अजयच्या घरापर्यंत पोहोचते. तो प्रसाद, अशोक, शरदयांना घेऊन लगेचच अभिजीतचे वडील राहत असलेल्या गावी रवाना होतात. काही पत्रकारांनी मुद्दाम तिथे तळ ठोकलेला असतो.

जवळजवळ अर्धा बदमाश ग्रुप गावी आलेला असतो. अभिजीतच्या लहानपणापासूनचे मित्र असलेले प्रसाद आणि अजय त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेले असतात. त्या दोघांना पाहून अभिजीतच्या वडीलांना आनंद होतो. अभिजीतचे वडील त्या सर्वांशी व्यवस्थित बोलतात. हीच बातमी सलग दोन दिवस महाराष्ट्राच्या काही वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरची बातमी असते. अजय अभिजीतच्या वडीलांना अभिजीतच्या सुखी आयुष्याबद्दल आणि मोठ्या पदावर काम करत असलेल्या कंपनीबद्दल भरभरुन सांगतो. मुलाबद्दल इतकं चांगलं ऐकल्यानंतर त्याच्या वडीलांना आपल्या मुलाला भेटण्याची इच्छा होते. चौघेही त्यांना अभिजीतच्या आणि त्यांच्या भेटीबाबत वचन देतात. प्रसाद अभिजीतच्या आईवडीलांचे फोटो ई-मेलद्वारे रुपालीला मेल करतो. आठवडा होऊन जातो, ऑस्ट्रेलियामधून काही सकारात्मक निरोप येत नाही. अभिजीतच्या आईवडीलांना बघून पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झाल्याने रुपाली त्यांना ओळखत नाही आणि तो मेल न पाहताच डिलीट (रद्द) करते.

चौघेही त्या खेडेगावातून ठाण्याला जायला निघतात. खेडेगावातून बाहेर निघून शहरात आल्यानंतर प्रवासातच,

शरद, "ऑस्ट्रेलियाला फोन सुध्दा करता येणार नाही."

अशोक, "आपले पासपोर्ट येतीलच काही दिवसांत."

अजय, "पासपोर्ट घेऊन तू काय करशील? ऑस्ट्रेलियाला जायला पैसे आहेत का तुझ्याकडे?"

प्रसाद, "अभीच्या वडीलांना वचन दिलंय आपण. त्याला भारतात परत आणायचं."

अजय, "माझं डोकं फिरायची वेळ आली."

अशोक, "आता काय झालं?"

अजय, "त्या दोघांना लग्न करायचं होतं ते त्यांनी केलं, आपल्यापासून लांब जायचं होतं ते गेले, देश सोडायचा होता तो सोडला, आपल्या देशाशी त्या दोघांना काही संबंध ठेवायचा नाहीये तर नाही. मग आपणच कशाला प्रत्येक वेळी पुढे पुढे करतोय?"

प्रसाद, "तुझ्या मनात काय चाललंय काहीच कळत नाही."

अजय, "म्युझिक कॉम्पिटिशन झाली तेव्हा ते दोघे आले नाहीत. रुपालीला माहित होतं, मग त्यांना सुध्दा कळलं असेलच. तरीही त्या दोघांना आपल्याला भेटावंस वाटलं नाही. नंतर त्याचा तो मित्र आला, म्हणत होता अभिजीत तुम्हा सर्वांची आठवण काढतो, नंतर त्याने काय उत्तर दिलं? आम्हाला कॉन्टॅक्ट करु नका. डोकं फिरणार नाही तर काय होणार?"

प्रसाद, "त्यांना भेटायचंच नसेल तर प्रत्येक वेळी अशी वेळ का येते की आपल्याला त्या दोघांचा विषय काढावा लागतो. आपण दहावेळा दरवाजा वाजवून पाहतो, असंही असेल, अकराव्यांदा वाजवल्यावर तो दरवाजा उघडत असेल आणि आपण दहाव्यांदाच हार मानून मागे फिरत असू."

शरद, "गाडी थांबव."

अशोक, "काय झालं?"

शरद, "अशोक... गाडी थांबव."

अशोक अर्जंट ब्रेक मारतो.

प्रसाद-अशोक, "काय झालं?"

शरद, "गाडी मागे घे."

अशोक, "कां? काय झालं?"

शरद, "गाडी मागे घे लवकर."

अशोकला काहीच कळत नाही. गाडी जागेवरच थांबलेली असल्याने शरद ताबडतोब गाडीबाहेर येतो. एका झाडाशेजारी असलेल्या बॅनरच्या दिशेने तो धावतो आणि तिथे जाऊन थांबतो. मग प्रसाद, अजय आणि अशोक देखील येतात.

प्रसाद, "काय झालं इथे?"

शरद, "बोर्ड वाच जरा."

अशोक, "जगाच्या पाठीवर फिरत असताना सर्वांत मोठं संकट असतं ते तिथली भाषा आत्मसात करण्याचं. त्यासाठीच आपल्या सर्वांसाठी परदेशी भाषा विशेष सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. ठिकाण, रामनाथ हॉल, हनुमान नगर, शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता. प्रमुख वक्ते, सागर भोसले. हं... सागर भोसले...?"

शरद, "हा साला इथे प्रवचन देतोय आता."

प्रसाद, "काय करुया?"

अशोक, "खूप दिवस झालेत. कुणाची खेचलीच नाही. आज दिवस चांगला आहे. जाऊया का?"

प्रसाद, "अरे हो, आजच शनिवार आहे. हॉलवर चल लवकर. सेमिनार वीस मिनिटांत सुरु होईल."

चौघेही गाडीमध्ये बसतात. हॉल तसा जवळच असतो. सागरचा सेमिनार सुरु झालेला असतो. गेटपासून जवळच गाडी उभी करुन चौघे आतमध्ये शिरतात.

आतमध्ये,

सागर, "सध्या शिक्षणाने नेहमीचे सरधोपट मार्ग बदलले आहेत. डिग्री मिळवतानाच आपल्याकडे नेहमीपेक्षा काही वेगळं शिक्षण असायला हवं ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये वाढली आहे. बरोबर बोलतोय ना मी..! तर त्यातलाच एक ट्रेन्ड म्हणजे एखादी परकीय भाषा शिकणं. परकीय भाषा शिकण्याचे अनेक फायदे आहेत. इंटरनेटचा वाढता वापर, अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांनी भारतामध्ये केलेला व्यावसायिक विस्तार, पर्यटन क्षेत्रामध्ये सतत होणारी वाढ यामुळे परकीय भाषा येणं फायदेशीर ठरतंय. फ्रेंच, जर्मन, जॅपनीज या भाषा शिकणारा वर्ग मोठ्याा प्रमाणात आहे. या भाषांच्या जोडीने आता स्पॅनिश भाषा शिकण्याचा ट्रेन्ड येतोय. माझ्या लाडक्या मित्रांनो, जगातल्या एकूण ६० देशांमध्ये स्पॅनिश भाषा बोलली जाते. ही भाषा अमेरिकेतल्या दुसऱ्या क्रमांकाची बोलीभाषा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर समजणारी, उपयोगात पडणारी भाषा म्हणून स्पॅनिश भाषा शिकणं फायदेशीर ठरतं. ब्राझील वगळता दक्षिण अमेरिकेतल्या बहुसंख्य भागांमध्ये स्थानिक व्यवहारासाठी स्पॅनिश वापरली जाते. दक्षिण अमेरिकेमध्ये वेगाने सुधारणा होत आहेत. भारतामधून अनेक विद्यार्थी अमेरिकेमध्ये जातात, तसेच अनेकांना कामानिमित्त अनेक देशांमधून फिरावं लागतं. अशा वेळी स्पॅनिश येणं फायदेशीर ठरतं. जागतिकीकरणाच्या काळात अनेक परदेशी कंपन्यांमध्येही नोकरीच्या संधी उपलब्ध होतायेत. माझ्यामते तरी, औद्योगिक क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय संदर्भात विचार करता स्पॅनिश महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरसमजणारी, उपयोगात पडणारी भाषा म्हणून स्पॅनिश भाषा शिकणं कधीही उत्तम. माझ्या मित्रांनो, भविष्य आपल्या हातात आहे. जर तुम्हाला खरंच वाटत असेल, मी अॅब्रॉडला गेलो पाहीजे, तर तुम्ही नक्कीच हा पर्याय स्विकारा. आमच्या संस्थेमध्ये आपल्याला अल्प दरांमध्ये स्पॅनिश भाषा शिकवली जाईल. ज्यामुळे तुम्हाला शिक्षण कमी असताना देखील भाषेच्या बळावर चांगल्या पदावर काम करता येईल."

शरद, "मला एक शंका आहे."

सागर, "कोण?"

शरद, "Sharad, Sharad make in Badmash Group."

गोंधळून सागर आपल्या डोक्याला हात लावतो. अचानक चौघांना एकत्र पाहून वृषालीला देखील धक्का बसतो.

सागर, "बोला."

शरद, "स्पॅनिश भाषाच का? मराठी भाषा जगातली मोठी भाषा का नाही होऊ शकत?"

सागर, "असं नसतं, जगाच्या पाठीवर ज्या कोणत्या प्रदेशात आपण जातो, त्या प्रदेशाच्या भाषेचे ज्ञान आणि माहिती आपल्याला असायला हवी."

शरद, "Why dusri Country Lok come in Maharashtra & not talk Marathi barobar? That's very very sad. We add other's Bhasha in our memory & lose our Mom Language."

शरदच्या पाठीमागे बसलेले अशोक, अजय आणि प्रसाद मनसोक्त हसत असतात. शरदची इंग्रजी ऐकल्यानंतर शिबिराला आलेले इतर विद्यार्थी देखील हसू लागतात.

सागर, "तुमच्यासारखे काही हुशार आहेत म्हणून तर मराठी भाषा मागे राहिली."

शरद, "Take care your mouth when speaking. If Marathi Manus talking, you look me continuously."

सागर, "असं का? ठिक आहे. इथे स्टेजवर या आणि तुमचे विचार जरा स्पष्टपणे मांडा."

शरद तिघांकडे बघतो, "याच्या प्रवचनाची वाट लावू का?"

तिघेही हसतच होकारार्थी मान हलवतात. शरद स्टेजच्या दिशेने जातो. सगळे विद्यार्थी त्याच्याकडे बघत हसत असतात. शरद आपला त्यांच्याकडे दुर्लक्ष करत स्टेजवर जातो. सागर तुच्छतेने बघत त्याच्या हातात माईक देतो.

शरद, "नमस्कार मित्रांनो."

उपस्थित सर्वजण शरदची टिंगल उडवत 'नमस्कार' म्हणतात.

शरद, "मित्रांनो, मी तुम्हाला भाषेविषयी ज्ञान शिकवायला आलेलो नाहीये. मी फक्त तुम्हा सर्वांचा सल्ला घेण्यासाठी इथे स्टेजवर आलोय. तुम्ही सगळे मला ओळखता का?"

विद्यार्थ्यांपैकी एक उठून म्हणतो, "हो. तुम्ही म्युझिक डायरेक्टर होते आणि बदमाश ग्रुपमध्ये गिटार वाजवायचे."

शरद, "बरोबर ओळखलंत. मी तोच शरद आहे. माझ्यासोबत आलेले माझे मित्रदेखील तेच आहेत. आमचा ग्रुपदेखील बदमाशच आहे. तुम्हाला काय वाटतं? आम्ही सर्वांनी एकत्र यावं का?"

समोरुन 'हो...' असा सुर येतो.

शरद वृषालीकडे बघतो. ती तोंड वाकडं करुन दुर्लक्ष करते.

शरद, "कशासाठी 'हो' म्हणताय तुम्ही?"

प्रश्न एकच, आणि समोरुन धडाधड उत्तरं यायला सुरुवात होते.

"आम्ही मैत्री जगायला शिकलो."

"मित्र एकत्र येऊन काय करु शकतात हे तुमच्या ग्रुपने दाखवलं."

"आमच्या गावच्या तीन मुलांना तुमच्याकडून पैशांची मदत मिळाली म्हणूनच त्यांना शिक्षण घेता आलं."

"तुमची गाणी आजसुध्दा बहुतेकांच्या मोबाईलमध्ये आहेत."

"तुमची सगळी गाणी मैत्रीवर आधारीत होती."

"तुमच्या ग्रुपने महाराष्ट्राचं नाव मोठं केलं होतं."

शरद, "हे सगळं तर पाच-सहा वर्षांपूर्वी झालं होतं. माझा प्रश्न हा आहे की, आम्ही सर्वांनी एकत्र यावं असं तुम्हाला का वाटतं?" सगळे गप्प बसतात. सागर स्टेजवर जातो.

सागर, "तुला ज्या कारणासाठी स्टेजवर बोलावलं होतं ते बोल ना! फालतूचे विषय का काढत बसतोस."

शरद, "का? होतो ना त्रास?"

वृषाली सुध्दा स्टेजवर येते. आता मात्र वाद होणार हे बघून प्रसाद, अशोक अजयसुध्दा स्टेजजवळ येतात.

वृषाली, "चालता हो इथून. कशाला तमाशा करायला आलास इथे?"

प्रसाद, "आम्हाला तमाशा नाही करायचा. तुम्हा दोघांना भेटायला आलोय आम्ही."

वृषाली, "अरे पण मला तुमच्यापैकी कुणालाही भेटायचं नाहीये"

वाद वाढत होता आणि उपस्थित सर्वजण स्टेजकडे बघत होते. सागरला अपमान झाल्यासारखं वाटत होतं. उगाच जूने विषय निघतील आणि वाद आणखी वाढेल म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणत तो सेमिनार संपल्यानंतर व्यवस्थित बोलू असं सांगतो. शरद, त्याचे मित्र स्टेजवरुन खाली उतरतात आणि बाहेर त्यांच्या गाडीमध्ये जाऊन बसतात.

अजय, "मला वाटलं तू त्याच्या प्रवचनावर काहीतरी बोलशील."

अशोक, "हो. मलासुध्दा असंच वाटलं."

अजय, "काय भाई, मध्येच काय झालं?"

शरद, "मला सुध्दा काही माहित नाही. स्टेजवर गेलो आणि जे मनात आलं ते बोलत गेलो."

अर्ध्या तासानंतर सगळे बाहेर येतात. विद्यार्थी निघून गेल्यानंतर वृषाली आणि सागर बाहेर येतात. चौघेही गाडीमधून बाहेर निघतात. वृषाली त्यांच्याकडे जाते.

वृषाली, "इथे कशाला आलात?"

अजय, "तुला भेटायला आलो नव्हतो. याच रस्त्याने पुढे एका खेडेगावात अभिजीतचे वडील राहतात. त्यांना भेटायला गेलो होतो. शरदला एका बॅनरवर सागरचं नाव आणि फोटो दिसला म्हणून सहजच भेटायला आलो."

वृषाली, "झाली ना भेट. आता तुम्ही सगळे निघू शकता."

प्रसाद, "तू इतकी कशी बदलू शकतेस?"

वृषाली, "तुला मागच्या गोष्टी काढायच्या आहेत का?"

प्रसाद, "मागच्या गोष्टींवर बोलत बसलो तर..."

सागर त्याला अडवत म्हणतो, "हे बघा, आम्ही आमच्या आयुष्यात खूश आहोत. उगाच इथे येऊन ढवळाढवळ करु नका. तिची इच्छा नाहीये तुम्हा सर्वांना भेटण्याची, तर कशाला जबरदस्तीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करताय? तुम्ही तुमच्या पध्दतीने खूश रहा, आम्हाला आमच्या पध्दतीने खूश राहू द्या."

चौघेही गप्प होतात. वृषाली आणि सागर तेथून निघतात. जुन्या मैत्रिणीशी भेट होत असताना पुन्हा निराशाच त्यांच्या पदरी पडलेली असते. चौघे गाडीच्या दिशेने जात असतात. अजयच्या मनात मात्र विचार चालू असतात. काहीही करुन त्या दोघांनाही अडवायचं असतं. त्यांच्यात आणि वृषालीदरम्यान जवळजवळ वीस-पंचवीस फूटांचं अंतर असतं तेव्हा अचानक अजय ओरडतो,

अजय, "ए वृषाली, माझे २६ रुपये परत कर."

वृषाली मागे वळून बघते, "कसले २६ रुपये?"

अजय, "आपण कोल्हापूरी खायला गेलो होतो तेव्हा तुझ्याकडे २६ रुपये कमी पडत होते. काढ चल."

सागर आपलं तोंड वाकडं करतो.

वृषाली, "त्या २६ रुपयांचं काय घेऊन बसलास? माझे १,५०० रुपये तू अजूनसुध्दा दिले नाहीस."

अजय, "१,५०० रुपये कसले?"

वृषाली, "मला कसा बोलत होता, वृषाली माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना! मला नम्रतासोबत फोनवर बोलायचंय. प्लीज माझं बॅलेंस भर. ते १,५०० रुपये दे अगोदर."

प्रसाद, "असं असेल तर माझे २,००० रुपये दे. माझ्या मोबाईलवरुन सागरसोबत किती वेळ बोलायचीस तेव्हा."

वृषाली, "जा चल. २,००० कसले? इतकं कुठे बोलली होती मी?"

प्रसाद, "मग माझं मोबाईलचं बील चेक कर."

शरद, "माझे पण ८८ रुपये दिले नाहीत तिने. जबरदस्तीने मला टॅक्सीने नेलं आणि मलाच पैसे भरायला सांगितले. बोलली नंतर देईल. अजून दिले नाही."

वृषाली, "नानाची टांग तुमच्या. तुम्हाला आताच बरं सूचलं पैसे मागायला."

अजय, "इतके दिवस सापडत नव्हतीस ना! आता भेटली तर पहिले आमचे सर्वांचे पैसे परत कर."

वृषाली, "अच्छा तर पैसे पाहिजे म्हणून मला शोधत होता का?"

अजय, "म्हणजे आमचे पैसे द्यायचे नव्हते म्हणून कायमची लांब गेली होतीस?"

अशोक, "शी... या कारणासाठी ग्रुप सोडलास? पैसे काय? असंच लहान मुलांना कितीतरी पैसे देत असतो आम्ही. तुझे पैसे देखील त्यातच मोजले असते."

वृषाली, "म्हणजे मी या कारणामुळे ग्रुप सोडला असं तुम्हाला वाटतंय?"

अजय, "मग अजून कोणतं कारण होतं?"

वृषाली, "सागरला..." वृषाली एकदम गप्प होते. सागर तिला लगेचच निघायला सांगतो. न राहवून वृषाली सागरसोबत निघते. अजयला पूर्णपणे खात्री पटते, सागरच्या बोलण्यावरुनच वृषालीने ग्रुप सोडलेला असतो. पण ते कसं समोर आणावं हे त्याला कळत नाही. समोरुन एक रिक्षा येते आणि वृषाली सागरसोबत त्या रिक्षामध्ये बसून निघून जाते. तरीही तिचे डोळे त्या चौघांकडे न सांगता काहीतरी बोलत होते. तिच्या डोळ्यांमधून जाणवत होतं, आज देखील मला तुमच्या मैत्रीची गरज आहे. पण संसार सांभाळण्यासाठी मला तुम्हा सर्वांपासून लांब जावं लागतंय.

प्रसाद, "हॅलो, अज्या. कुठे हरवलास?"

अजय, "तिला काहीतरी सांगायचं होतं."

प्रसाद, "काय सांगायचं होतं? ती बोलली, आपल्यासोबत रहायचंच नाहीये."

अजय, "नाही रे पॅडी, तू बघीतलं नाहीस का? ती आपल्यासोबत नॉर्मल बोलू लागली होती. मला पूर्णपणे खात्री आहे, सागरच तिला काहीतरी बोलला असेल."

प्रसाद, "मग तो त्या दोघांना पर्सनल प्रॉब्लेम आहे. आपल्यासोबत बोलून तिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम होत असेल तर ठिक आहेना, आपण तिला कॉन्टॅक्ट करायचा नाही."

अजय, "मला तिच्या डोळ्यात मैत्रीची भूक दिसली."

प्रसाद, "तुला काय करायचंय आता?"

अजय, "तिच्या घरी जाऊ आणि सागरसोबत काय ते स्पष्टपणे बोलू."

प्रसाद, "नाही. वृषालीचा विषय सोडलेलाच बरा."

अजय, "अरे पण..."

शरद, "राहू दे अजय. सोड तो विषय. आपल्याला अभीचं पण बघायचंय."

अजय अशोककडे बघतो. अशोकसुध्दा नजरेने सहानुभूतीपूर्वक नकार दर्शवतो. एकटाच अजय काय करणार? तो त्या सर्वांसोबत गाडीमध्ये बसून ठाण्याला निघतो. घरं, झाडं रस्ता सर्वकाही वाऱ्याच्या झुळूकेबरोबर मागे चाललं होतं, मात्र अजयच्या डोळ्यासमोरुन वृषाली जात नव्हती. इतरांनी तिचा विषय सोडलेला असतो. त्याप्रमाणे अजयला देखील तिचा विषय सोडावा लागतो. ठाण्याला प्रसादच्या घरी पोहोचल्यानंतर प्रसाद स्टिफनला अभिजीतच्या आईवडीलांचे फोटो मेल करतो.

समोरच्या हॉलमध्ये सुस्तपणे पडून अजय म्हणतो, "तुला वाटतं? तो उत्तर देईल."

प्रसाद, "प्रयत्न करायला काय जातंय?"

अजय, "कर."

घरी सगळे झोपल्यानंतर प्रसादला दुपारी स्टिफनचा फोन येतो. स्टिफन, "हे खरंच अभिजीतचे वडील आहेत?"

प्रसाद, "हो. आणि त्यांना अभिजीतला भेटायचं आहे."

स्टिफन, "मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू?"

प्रसाद, "मी त्याच्या वडीलांचं आणि तुमचं व्हिडियो कॉलद्वारे बोलणं करुन देतो."

स्टिफन, "ठिक आहे. संध्याकाळी जेव्हा मी अभिजीतच्या घरी जाईन तेव्हा मी तुला व्हिडियो कॉलवर कनेक्ट होतो. तेव्हा अभिजीतसोबत त्यांचं बोलणं कर. फक्त तू त्याच्यासमोर येऊ नकोस. त्याच्या वडीलांनाच समोर येऊ दे."

प्रसाद, "चालेल सर, तुमच्याकडे संध्याकाळ म्हणजे आमच्याकडे तेव्हा दुपार असेल. ठिक आहे. मी त्याच्या वडीलांकडे जातो."

ठरल्याप्रमाणे प्रसाद आणि अशोक गाडी घेऊन त्या खेडेगावात जातात. अभिजीतचे वडील त्याला बघण्यासाठी उत्सूक असतात. स्टिफन व्हिडियो कॉलने प्रसादसोबत कनेक्ट होतो.

स्टिफन, "अभिजतच्या वडीलांच्या घरी आहेस?"

प्रसाद, "हो. आणि ठरल्याप्रमाणे मी कॅमेऱ्यासमोर नाही आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता."

अभिजीतच्या वडीलांनी त्यांच्या मुलाला पाच वर्ष पाहिलं नसतं. इतक्या वर्षांनंतर त्याच्यासमोर जायचं म्हणजे थोडंफार व्यवस्थित दिसावं असं त्यांना वाटतं. त्यासाठी त्यांनी पांढरा सदरा घातलेला असतो. घरात वीज नसल्याने सौरउर्जेवरील दिवा पेटत असतो. घरात पुरेसा प्रकाश असतो. प्रसाद आणि अशोक लॅपटॉपपासून जरा दूर, पण संभाषण स्पष्ट ऐकू येईल एवढं अंतर ठेवून बसलेले असतात. अभिजीतला बघण्याची इच्छा त्या दोघांची देखील असते. पण स्टिफन आणि त्यांच्यामध्ये समोर न येण्याचं ठरलेलं असतं. अभिजीतचे वडील लॅपटॉपसमोर बसतात. चॅटींगची विंडो उघडली जाते. त्यांचे डोळे लॅपटॉपवरील पटलावरुन जरादेखील हलत नाही. कधी कॉल कनेक्ट होईल आणि मी माझ्या मुलासोबत बोलेन अशी त्यांची अवस्था होते. थ्रीजीने टास्मानियामधून स्क्रिन जोडली जाते. त्यांच्यासमोर अभिजीतच्या टास्मानियामधील घरातून गौरी समोर येते.

अभिजीतचे वडील, "गौरी तू?"

गौरीने लग्नानंतर पहिल्यांदाच ती तिच्या सासरमधील मोठ्या व्यक्तीसमोर येते. स्टिफनने प्रसादची गोष्ट अभिजीतला सांगितली नसते. त्याने घडलेला सर्व प्रकार गौरीला सांगितला असतो. छातीत धडधड चालू असताना ती अभिजीतच्या वडीलांसमोर येते.

गौरी, "नमस्कार करते बाबा."

अभिजीतचे वडील, "सुखी राह. कशी आहेस?"

गौरी, "ठिक आहे."

अभिजीतचे वडील, "अभी कुठे आहे?"

गौरी, "ते रुपालीसोबत बाहेर गेलेत."

अभिजीतचे वडील, "बाहेर गेला? मला त्याला बघायचं होतं, फक्त एकदा." गौरीचे डोळे भरतात.

गौरी, "बाबा, त्यांना आपल्या देशाबद्दल कधी काही सांगितलं तर त्यांना जुन्या गोष्टी आठवतात. मग ते स्वतःला त्रास करुन घेतात. स्टिफन भाऊजींनी तुमच्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांना सांगावसं वाटलं, मग तुम्ही त्यांना बोलावणार आणि भारतात आल्यावर त्यांना पुन्हा जुन्या गोष्टींना सामोरं जावं लागेल. हे सर्व मला नको होतं म्हणून तुमच्याशी अगोदर मीच बोलले. मी काही चुकीचं केलं का बाबा?"

अभिजीतच्या वडीलांचे डोळे भरुन येतात.

ते म्हणतात, "अभी खूश ठेवतो ना तुला?"

गौरी, "हो. ते कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देत नाही."

अभिजीतचे वडील, "तुम्ही दोघं खूश आहात ना!"

गौरी तिचे डोळे पूसत, "हो बाबा, खूप खूश आहोत आम्ही इथे."

अभिजीतचे वडीलदेखील डोळ्यातलं पाणी थांबवतात, "अभी नक्कीच खूश असेल. त्याच्याकडे तुझ्यासारखी समजूतदार पत्नी आहे."

गौरी, "आणखी? आई कशी आहे?"

अभिजीतचे वडील, "मुलगा लांब गेल्याचं दुःख एका आईशिवाय कोणी समजू शकत नाही."

हातातल्या रुमालाने गौरी डोळ्यातलं पाणी पुसते. थोडा वेळ कुणी काही बोलत नाही. प्रसाद त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. अभिजीतचे वडील आणि गौरी दोघेही फिरुन बोलत असतात. कोणीही मुळ विषयावर यायला तयार होत नसतं. न रहावून प्रसाद अभिजीतच्या वडीलांच्या बाजूला येतो.

प्रसाद, "गौरी, इकडे बघ. मी प्रसाद बोलतोय. तुला वाटत नाही का भारतात यावंसं?"

स्टिफन, "प्रसाद, आपल्यात काय ठरलं होतं? तुमच्यापैकी कोणीही मध्ये येणार नाही."

प्रसाद, "स्टिफन साहेब प्लीज थोडं थांबा. प्रश्न आमच्या मैत्रीचा नाही, यांच्या कुटूंबाचा आहे. पाच वर्ष एक मुलगा त्याच्या वडीलांपासून दूर राहिला आहे. एक सून तीच्या सासू-सासऱ्यांना भेटली नाहीये. एका आईने तिच्या मुलाच्या डोक्यावरुन हात फिरवला नाहीये."

गौरी स्टिफनला थांबवते. स्टिफन बाजूला होतो.

गौरी, "बोल तू."

प्रसाद, "हे बघ. आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्या तुम्ही दोघंही कधीही माफ करणार नाही. आईवडीलांना कशाला त्रास देता?"

गौरी, "मग मी काय करु शकते? जेवढं भारतापासून लांब ठेवता येईल तेवढं मी त्यांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रसाद, तू तरी समजून घे. माझी सुध्दा इच्छा असते बाबांना, आईला, माझ्या मम्मीला भेटण्याची."

प्रसाद, "तुला असं वाटत असेल. तुम्हा दोघांना भारतात आणण्यासाठी आम्ही मोठ्यांची मदत घेत असू. तर ते चुकीचं आहे. तू त्या सर्वांना घेऊन ऑस्ट्रेलियाला जा. म्हणजे तिथे तुम्ही सगळे खूश रहाल."

गौरी, "ते नाही ऐकणार."

प्रसाद अभिजीतच्या वडीलांच्या खांद्यावर हात ठेवतो आणि गौरीला म्हणतो, "फक्त एकदा. फक्त एकदाच त्याला भारतात आण. मी तुला शब्द देतो. आमच्यापैकी कोणीही त्याच्यासमोर येणार नाही. तुम्ही दोघं तुमच्या आईवडीलांना भेटा आणि वाटलंच तर त्यांना घेऊन परत ऑस्ट्रेलियाला निघून जा."

गौरी त्या दोघांकडे बघते. नंतर अशोकसुध्दा कॅमेऱ्यासमोर येतो. गौरीला पाहून अभिजीतला भारतात परत आणण्यासाठी त्याने हात जोडलेले असतात. डोळ्यात आलेलं पाणी पूसत ती होकारार्थी मान हलवते. स्टिफन प्रसादला धीर देतो. तेव्हा चॅट करत असताना प्रसाद एक योजना तयार करतो.

रुपाली आणि अभिजीत घरी येतात. तेव्हा गौरी स्टिफनसोबत समोरच्या हॉलमध्ये बसून बोलत असते.

अभिजीत, "काय झालं स्टि? असा अचानक आलास?"

स्टिफन, "हो. कुठे गेला होतास?"

अभिजीत, "रुपालीने जबरदस्तीने फिरायला नेलं होतं. बोल काय म्हणतोस? (गौरीकडे बघून) डीयर, जरा पाणी आणतेस का?"

गौरी स्वयंपाकघरात जाते.

स्टिफन, "आज माझ्या वडीलांचा वाढदिवस होता."

अभिजीत, "नाही रे. तुझ्या वडीलांचा वाढदिवस डिसेंबरमध्ये असतो."

स्टिफन, "हो. डिसेंबरमध्येच असतो. तरीही आजच्या दिवशी देखील मी त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो."

अभिजीत, "ग्रेट. मग? आजचा काय प्लॅनिंग आहे?"

स्टिफन किचनमध्ये डोकावून बघतो. गौरी त्याच्याकडेच बघत असते. ती पाणी घेऊन येते.

अभिजीत, "काय झालं तुम्हा दोघांना? आल्यापासून बघतोय, दोघांचाही चेहरा पडलेला दिसतोय."

स्टिफन, "माझ्या वडीलांचा विषय निघाला म्हणून मी सहजच गौरीला तुझ्या वडीलांबद्दल विचारलं. ती काही सांगणार इतक्यात तू आलास."

अभिजीत, "माझ्या वडीलांबद्दल?"

स्टिफन, "म्हणजे सहजच. काही प्रॉब्लेम असेल तर नको सांगू."

अभिजीत, "नाही रे. तुझ्यापासून काय लपवायचं? माझे बाबा भारतात राहतात."

स्टिफन, "भारतात का?"

अभिजीत, "माझा जन्म भारतातलाच."

स्टिफन, "मी चार महिन्यांपूर्वी गेलो होतो तेव्हा सांगितलं नाहीस. तेवढंच तुझ्या आईवडीलांना भेटलो असतो."

अभिजीत, "हं... सांगायचं होतं, राहून गेलं."

स्टिफन, "त्यांच्यासोबत कधी संपर्क होतो का?"

अभिजीत, "नाही."

स्टिफन, "का?"

अभिजीत, "माफ कर. जरा पर्सनल आहे."

स्टिफन, "सॉरी."

गौरी स्टिफनच्या मोबाईलवर फोन करते.

स्टिफन, "हे बघ. घरुन फोन आला. चल मला निघायला हवं. खूप उशीर झालाय."

स्टिफन निघून जातो. रुपाली प्रेस्तिकाला फोन करते आणि बाहेर जाते. घरात गौरी आणि अभिजीत दोघेच असतात.

गौरी, "तुम्हाला आई आणि बाबांची आठवण येते का?"

अभिजीत ही गोष्ट सहा वर्षांपासून मनातच ठेवून होता. त्याला ही गोष्ट कुणाला तरी बोलून दाखवायची होती. आज गौरीने स्वतः त्याला विचारलं म्हणून तो तिच्याजवळ मन हलकं करतो.

अभिजीत, "आई आणि बाबा, दोघांची खूप आठवण येते."

गौरी, "मग आपण त्यांना भेटायचं का?"

अभिजीत, "खूप वाटतं, एकदा तरी त्यांना भेटावं. जोरात त्यांच्या हातून स्वतःच्या कानाखाली वाजवून घ्यावी. आईच्या हातचं खावं, गौरी, तुला माहितीये? बाबांना माझ्या लहानपणापासून वाटत होतं, मी खूप मोठ्या पदावर काम करेन. माझं स्वतःचं देखील एखादं कॅबीन असेल. ऑफिसमध्ये सगळे मला 'सर' म्हणतील आणि हे सगळं पाहून त्यांची छाती अभिमानाने फुगावी अशी माझी इच्छा होती. आणि आता..."

गौरी, "आता तुम्ही मोठ्या पोस्टवर आहात. चला ना, एकदा आईबाबांना भेटू."

अभिजीत, "ते शक्य नाही."

गौरी, "का शक्य नाही?"

अभिजीत, "ते स्वतः म्हणाले, आजपासून आमचा कोणीही मुलगा नाही. मग सुवर्णाचं काय झालं हे तुलादेखील माहित आहे. तेव्हाच तो अभिजीत मेला होता. तू आलीस आणि एका नवीन अभिजीत या जगासमोर आला."

अभिजीतचं  लक्ष  समोर  ठेवलेल्या  लॅपटॉपकडे  जातं.  गौरीने  तो  व्यवस्थित  बंद  नव्हता.  नेहमीच्या सवयीप्रमाणे रडून झाल्यानंतर गौरीने रुमाल तिच्या शेजारी ठेवला होता. अभिजीत समजून जातो. ती रडली असेल म्हणूनच तिने रुमाल तिच्या बाजूला ठेवला आहे. स्टिफनच्या वडीलांचा वाढदिवस डिसेंबरमध्ये असतो तर त्याने आता त्याच्या वडीलांचा विषय का काढला? असा प्रश्न त्याच्या मनात येतो. काही वेळेपूर्वी झालेल्या सर्व गोष्टींवर तो थोडा वेळ विचार करतो आणि त्याला संशय येतो.

अभिजीत, "गौरी, खरं सांग, काय झालंय?"

गौरी, "काही नाही, भारतात जायचं ना बाबांना भेटायला?"

अभिजीत, "भारतात जायचा विचार तुझ्या मनात कसा आला?"

गौरी, "आताच आपण त्या विषयावर बोललो ना!"

अभिजीत, "आणि स्टि काय म्हणाला?"

गौरी आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे आपली जीभ चावते.

अभिजीत, "मला सगळं खरं खरं सांग. अगदी पहिल्यापासून. जर मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि मला काही वेगळं आढळलं तर... बोल आता."

गौरी आणि अभिजीत एकमेकांवर प्रेम करु लागले होते. त्याच्यापासून काही लपवून तिला त्याला पुन्हा एकदा गमवायचं नव्हतं. ती दोन्ही हाताच्या मुठी घट्ट बांधते. मग रुपाली आणि स्टिफनने माहिती दिल्याप्रमाणे ती सगळं सांगते. हिंदमाता मैदानावरील बदमाश ग्रुपचा खोटा सहभाग, रुपाली-प्रसाद यांचं फोनवर बोलणं, पिकनीकला गेल्यानंतर स्टिफनला बदमाश ग्रुपबद्दल माहिती मिळणं, मग भारतात जाऊन एक-एक रात्र वृषाली आणि प्रसादच्या घरी थांबणं, प्रसादची मुलगी अनामिका, ग्रुप बंद झाल्यानंतर सर्वांच्या आयुष्यात कोणते बदल घडले? पाच वर्षांनंतर अजय, प्रसाद, शरद, अशोक एकत्र आले, स्टिफन आणि रुपाली दोघांनी नव्याने सुरु झालेल्या बदमाश ग्रुपसोबत वाढवलेले संबंध, नंतर गौरीकडूनच भुतकाळातील सत्य ऐकून दोघांनी विषय सोडून देणं, पत्रकारांकडून अभिजीतच्या वडीलांना झालेला त्रास या सर्व गोष्टींपासून ते तासाभरापूर्वी झालेल्या व्हिडीओ चॅटींगपर्यंत सर्वकाही ती स्पष्टपणे सांगते. आपल्या पाठीमागे इतकं सगळं झालं हे ऐकून अभिजीतला चांगलाच धक्का बसला होता.

थोडा वेळ दोघेही एकमेकांशी बोलत नाही. अभिजीत शांतपणे आपल्या बेडरुममध्ये जातो. गौरीला ते सहन होत नाही, ती स्टिफन आणि रुपाली, दोघांनाही फोन करुन सर्वकाही सांगते. दोघेही विचारतात, 'घरी येऊ का?' गौरी दोघांनाही नकार देते.

अभिजीतने बेडरुमचा दरवाजा उघडाच ठेवला असतो तरीही तिला आतमध्ये जायला भिती वाटत होती. रात्र संपते, दिवस सूरु होत असतो. गौरी झोपत नाही. पहाटे कशीतरी हिंमत करुन ती बेडरुममध्ये जाते. अभिजीत खुर्चीवर डोळे बंद करुन बसला होता. तो जागाच होता.

अभिजीत, "माझ्या अंदाजापेक्षा लवकरच आलीस आतमध्ये." गौरी काहीच बोलत नाही. "ये. बस ना!"

गौरी त्याच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसते. थोडा वेळ दोघे गप्प राहतात. मग गौरी बोलते, गौरी, "झोप नाही येत का?"

अभिजीत, "मी जागा आहे की झोपलोय हेच कळत नाही मला."

गौरी, "मी कधीही तुमच्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न केला नाही. रुपाली आणि स्टिफन भाऊजींनी मला भारतात राहणाऱ्या त्या सर्वांबद्दल सांगितलं तेव्हा मलादेखील ते सर्व आवडलं नव्हतं. पण आज मी माझ्या जवळच्या, घरातल्या मोठ्या व्यक्तीसोबत बोलली होती. म्हणून तुमच्याकडे हट्ट करते."

अभिजीत, "तुला काय वाटतं? तो जुना अभिजीत पुन्हा येऊ शकेल का?"

गौरी, "हो."

अभिजीत, "का?"

गौरी, "कारण भारतात कोणी एकच नाही, मैत्री करणारा प्रत्येकजण, आणि ज्या व्यक्तींना आपण मागे सोडून आलो ते सगळे त्या अभिजीतची वाट पाहत आहे. गेली सहा वर्ष ते सगळे न चुकता त्या अभिजीतची वाट पाहत आहेत."

अभिजीत, "का म्हणून ते त्या अभिजीतची वाट पाहताय जो पुन्हा कधी येऊ शकत नाही."

गौरी, "कारण ते फक्त त्याची वाट पाहत नाही, तर खऱ्या अर्थाने त्याला एक आदर्श मानतात. सध्याच्या जगात खूप कमी मित्र आहे जे मित्रांसाठी आयुष्यातील खूप मोठ्या गोष्टींचा त्याग करतात. आपल्या आयुष्याचा, करियरचा त्याग करतात. परमेश्वराला कल्पना आहे, भारतात राहणाऱ्या स्टिफनसारख्या चांगल्या व्यक्तींना अशा मित्राची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात त्याच्यासारखं होण्याचं स्वप्न पाहत असते. भर पावसात तासन्तास लोक रांग लावून उभे होते, त्या अभिजीतची एक झलक पाहण्यासाठी, ज्याने मनापासून मैत्री जपली होती, लोकांना चांगूलपणाचा संदेश दिला होता, त्यांच्या मनात ज्याने घर केलं होतं. तुम्हाला सांगू, आपल्या प्रत्येकामध्ये तो अभिजीत आहे, जो आपल्याला हिंमत देतो, इमानदारीने जगायला शिकवतो, या औपचारिक जगामध्ये तो आपल्याला मैत्री जपायला शिकवतो, प्रेम करायला शिकवतो, मैत्रीसाठी त्याग करायला शिकवतो, आयुष्याचा आनंद घेत जगायला आणि मृत्यूच्या दारात उभं असताना देखील हसायला शिकवतो. त्याला लोकांचा विश्वास जिंकायचा होता. त्यांच्या मनात घर करायचं होतं आणि त्याने ते केलंही होतं त्यासाठी त्याला आपल्या हृदयाजवळ असलेल्या व्यक्तीपासून दूर जावं लागलं, दुःख मनातल्या मनात दाबून ठेवून इतरांसाठी हसायला ज्याने शिकवलं अशा मित्राची आणि बदमाश ग्रुपची गरज स्टिफनसारख्या अनेक मित्रांना आहे. भारतातल्या काही चुकीच्या लोकांकडे लक्ष देऊ नका, त्यांना मैत्रीचं महत्व कधी कळलंच नाही. त्या लोकांचा विचार करा ज्यांना त्या अभिजीतच्या पुनरागमनाची उत्सुकता आहे. स्टिफन आणि सर्वांना त्या जुन्या अभिजीतची उत्सूकता असेल, पण मला त्या अभिजीतची खूप गरज आहे..."

पुढे शब्द सुचत नसल्याने गौरी तशीच निघून जाते. खुर्चीवर बसलेला अभिजीत तिच्याकडे नुसता पाहतच असतो. त्या दिवशी तो तिच्यासोबत बोलत नाही. घरातून काही न खाता तो ऑफिसला निघतो. गाडीमध्ये टॉमसोबत थोडंफार बोलतो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर लिझा, स्टिफन यांच्याशी काही न बोलता तो आपल्या कॅबीनमध्ये जातो. स्टिफनची देखील त्याच्यासमोर जाण्याची हिंमत होत नाही. तो लिझाला पुढे करुन अभिजीतच्या हालचालींबाबत माहिती घेत होता. दुसरीकडे गौरीचं मन कुठेही लागत नव्हतं. ती प्रत्येक पाच मिनिटांनंतर अभिजीतला फोन करत होती. मात्र अभिजीत कुणाचाही फोन घेत नव्हता. गोष्ट भारतामध्ये असलेल्या अजय आणि शरदपर्यंत देखील पोहोचते. त्या दिवशी अभिजीत टॉमला गाडी घरी घेऊन निघून जायला सांगतो.

त्या रात्री अभिजीत ऑफिसमध्येच थांबतो. मोबाईल बंद ठेवून त्याने स्वतःला कॅबीनमध्ये कोंडून घेतलेलं असतं. रात्री उशीरा गौरी आणि रुपाली स्टिफनसोबत ऑफिसमध्ये जातात तेव्हा त्यांना कळतं, अभिजीत अर्ध्या तासापूर्वीच ऑफिसमधून निघून गेला आहे. मग त्याचा शोध घेणं सुरु होतं. ऑफिसपासून काही अंतरावर असलेल्या ग्रामीण भागातील एका उद्यानात बाकावर तो झोपला होता. पहाट झालेली असते. रात्रभर शोध घेऊन गौरी आणि रुपाली दुःखी मन घेऊन घरी जातात.

मैत्र जीवांचे

अभिषेक ठमके
Chapters
अर्पण पत्रिका मनोगत मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’ प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात प्रकरण २ : विरहातील पहिला भाग प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग प्रकरण ५: एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने प्रकरण ७: अंधूक आशा प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी प्रकरण १०: थरारक पार्श्वभूमी प्रकरण ११: पुन्हा एकत्र येण्याचं वचन प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात प्रकरण १३: विवाहाचं रहस्य प्रकरण १४: वडीलांचा आधार प्रकरण १५: देशप्रेम प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात