Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात

मुंबई: डोळ्यात भरणार नाही इतक्या दूरपर्यंत प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या, सगळीकडे मोठमोठाले पोस्टर्स लागले होते, डी. वाय. पाटील स्टेडियमवर सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची आणि प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. एका म्युझिक कॉम्पिटीशनसाठी ही गर्दी असते. त्या दिवशी तिथे मोठ्या प्रमाणात तरुणाई उपस्थित होती. स्टेडियमच्या आसनक्षमतेपेक्षाही जास्त प्रमाणात गर्दी तिथे असते. एखाद्या क्रिकेट मॅचपेक्षाही जास्त, हे विशेष. प्रत्येकाच्या तोंडून निघालेला एक एक छोटा 'ऊ...' म्हणजे मोठ्ठा 'ओ...' होता. हे झालं प्रेक्षकांचं...  स्पर्धकांची आणि आयोजकांची स्टेजच्या पाठीमागे धावपळ सुरु होती. ज्याच्या छातीचे ठोके वाढले नसतील असा एकही स्पर्धक तेव्हा शोधून सापडणार नव्हता. थोड्याच वेळात परिक्षकांचं स्टेजवर आगमन होतं. हिंदी सिनेमातील युथ आयकॉन लायन श्रॉफ, तरुणांची आवडती नायिका अनुष्का कपूर, संगीतकार अरजित महादेवन प्रेक्षकांना हात दाखवून अभिवादन करतात. आपापल्या ठिकाणी विराजमान होऊन परिक्षक नियोजित कार्यक्रमाची सुरुवात करावयास सांगतात. टी.व्ही. चॅनेलवरील प्रसिध्द कलाकार मोहित श्रॉफ स्पर्धेचं सूत्रसंचालन करतो आणि प्रेक्षकांच्या गर्दीने, मिडीयाच्या साक्षीने स्पर्धेला सुरुवात होते.

मुंबईतील बॉम्बे रास्कल्स बँड स्पर्धेची सुरुवात करतो. सगळे प्रेक्षक त्या स्पर्धेचा आनंद घेत होते. फक्त एक व्यक्ती आपल्या रुममध्ये हातात रुद्राक्षाची माळ घेऊन डोळे बंद करुन बसलेली असते. रूमबाहेर त्यांची संपूर्ण टीम त्याला आवाज देत असते. आठव्या क्रमांकावर त्यांना सादरीकरण करावयाचं असतं. सातव्या क्रमांकावर आलेल्या किडा बॅण्डची गायिका सर्व प्रेक्षकांना घायाळ करते.

आतापर्यंत आलेल्या प्रत्येक बॅंण्डने परिक्षकांकडून भरभरुन कौतूक मिळवलेलं असतं. तरुणाईचा जोश वाढतच चाललेला असतो, मात्र ते वाट पाहत असतात पाच वर्षांपुर्वी बंद झालेल्या बदमाश बॅण्डच्या सादरीकरणाची.

पाच वर्षांपुर्वी त्या ग्रुपने संपुर्ण महाराष्ट्रावर राज्य केलं होतं. त्यांचे शो अगदी दिल्ली ते चेन्नई, अहमदाबाद ते कोलकाता, सगळीकडे सुपरहिट ठरले होते. शरद-अशोक यांचं संगीत, अभिजीतचा आवाज आणि मंचावरील त्या सर्व क्षणांना कैद करण्याची अजयची फोटोग्राफी हे सगळं प्रेक्षकांना पुन्हा हवं असतं. परिक्षक आणि मिडीयासुध्दा खास त्या ग्रुपचं सादरीकरण पाहण्यासाठीच आलेले असतात.

स्टेजवर मोहित श्रॉफ, "Yo boys & girls... I know… all of you are waiting for this moment. I request to…"

दरवाज्यावर सतत थाप मारुनदेखील आतून काहीच उत्तर न आल्याने बाहेर बरीच गर्दी जमा होते.

टेन्शन घेण्याइतकं काही घडलंच नाही, असे भाव चेहऱ्यावर असलेला अशोक समोर येतो आणि म्हणतो, "स्टेजवर अनाऊंसमेंट होईल आता. चल लवकर."

तेव्हा तिथे उपस्थित एक अधिकारी म्हणतो, "आप का सिंगर तो अंदर है। उसे बाहर तो आने दो।"

 "चांगला ओळखतो मी त्याला, नाव घेतलं की तो बरोबर स्टेजवर येईल. चला...." सगळे गोंधळलेल्या अवस्थेत एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहतात. काहीच पर्याय नसल्याने आपापली वाद्ये घेऊन  स्टेजवर जायला निघतात.

स्टेजवर, मोहित श्रॉफ, "please welcome on the stage… जोरदार तालियोंसे स्वागत किजीये फिर से उभरते सितारोंका। आ रहे हैं... सबके चहेते... सबसे अलग... दुनिया हिलाने... इतिहास रचाने... बदमाश... बॅंण्ड..."

आता सगळ्याच प्रेक्षकांच्या तोंडात आता "ओ..." ऐवजी "यो..." असतो. "We want Abhijeet… We Want Abhijeeet…" असा नारा सुरु होतो. उपस्थित मान्यवर आणि सर्व परिक्षक उभे राहून टाळ्या वाजवत त्या ग्रुपचं उत्स्फूर्तपणे स्वागत करतात. स्टेजवर अशोक आणि शरद गिटार, बोर्ड, ड्रम्स घेऊन येतात. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर प्रेक्षक प्रोत्साहन देत टाळ्या वाजवत होते. सगळी वाद्ये व्यवस्थित लावून झाल्यानंतर चेंजींग रुमच्या आत बसलेला तो डोळे उघडतो, त्याचे डोळे लाल झालेले असतात. तो रुद्राक्षाची माळ हातात बांधतो. आपल्या चेहऱ्यावर तो मुखवटा परिधान करतो. टेबलावर गीत लिहून ठेवलेला कागद उचलून फाडून फेकतो. रुमचा दरवाजा उघडून तो बाहेर येतो आणि न थांबता स्टेजच्या दिशेने चाल करु लागतो.

स्टेजवर त्याचं आगमन होताच, काही मुली आनंदाने बेधूंद होतात, काही मुलं स्वतःच्या टी-शर्टस् फाडून आपल्या शरीरावरील त्यांच्या बॅंण्डचं कोरलेलं नाव दाखवतात. स्टेजवर तो माईकच्या अगदी जवळ जातो, त्याच्या तोंडावर असलेला मुखवटा तो काढतो आणि प्रेक्षकांमध्ये फेकतो, तो प्रसाद असतो.

 "बदमाशऽऽ... बदमाशऽऽ... बदमाशऽऽ..." सगळ्यांच्या आरोळ्या सुरु होतात. तब्येतीने सडपातळ असलेला, सावळासा प्रसाद एका वेगळ्याच नजरेने सगळ्यांकडे पाहतो. नक्की त्याच्या मनात काय चाललंय हे कुणालाही समजणार नाही, असा काही भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. शांत नजरेने तो संपूर्ण स्टेडियमकडे बघतो, त्याची ती अदा पाहून स्वतः परिक्षक पुन्हा उभे राहतात. लाल, निळा आणि पांढऱ्या चेक्सचा फॅशनेबल शर्ट, त्यावर काळ्या ठिपक्यांचा सफेद स्कार्फ, मळकट निळ्या रंगाची जिन्स, त्यावर डाव्या खिशापासून ते पाठीमागच्या खिशापर्यंत लावलेली चेन, एक हात संपूर्ण गोंदलेला, एका हाताला काळा रुमाल आणि रुद्राक्षाची माळ, डोळ्यावरचा गॉगल डोक्यावर ठेवलेला आणि त्यातच तो रोमॅन्टिक हिरोसारखा उभा. कोण त्याला पाहून शिट्टी वाजवणार नाही? बदमाश बॅंण्ड आपल्या पोझिशनला स्टेजवर असतो. सगळे फक्त वाट पाहतात, प्रसाद आता काय बोलतोय किंवा काय गातोय याची. शरद थोड्या स्लो मोशनमध्ये ड्रम वाजवायला सुरुवात करतो. त्यावर अशोक मध्येच गिटारचे तार छेडतो. दोघांमध्ये जुगलबंदी सुरु होते. तरुणांच्या शिट्या-आरोळ्या, सगळं स्टेडियम धुंद होऊन जातं. प्रसाद माईक हातात पकडतो आणि दिर्घ श्वास घेत…

उडत्या पाखरांनो... हरवलात कुठे ....। पंखांचं बळ... गेलं कुठे ...।

नयनी हे तुमच्या... काही नाही...। मग का हे सोंग... कुठे आहे मी ....।
सुर्य हा हरवला अंधाऱ्या काळोखी...। चंद्रही म्हणे मजला भिती ही तरी...।

पण तुम्ही समजू नका... के बाजी मार ली...।
ऐसे कुछ कुछ सी... चिंगारी मार ली...।

क्युकी हम शोले... थे अकेलेऽऽ...। अब एक है... याद है...।
हम मसले... हम जला दे...। हम अब तो... एक चिराग है....।

जो ना बुझेगा... जल उठेगा...। तुफान को चिरकर...।

उडत्या पाखरांनो... बिचाऱ्यांनो...। हे कसलं जगणं हे...।
सोचा अलग है... आम्ही सारे...। सारे अजीब आहे...।


आम्ही परत एकत्र आलो आहोत आणि आता आम्हाला कोणीही अडवू शकत नाही हेच बदमाश ग्रुपला सांगायचं होतं. पण गाण्यामध्ये आणि सादरीकरणामध्ये काहीच दम नव्हता. हवी तशी मजा कुणालाही येत नाही. तरीही ग्रुप परत आला म्हणून सगळे त्यांचं स्वागत करतात. हाच परिणाम स्पर्धेच्या निकालावर सुध्दा दिसतो. चांगल्या सादरीकरणामुळे किडा बॅण्डचा पहिला क्रमांक येतो. वन्स अगेन इन मुंबई गल्ली दुसरा तर, बदमाश बॅण्डच्या चाहत्यांकडून वाद न व्हावा म्हणून चाहत्यांच्या समाधानासाठी बदमाश बॅण्डला तिसरा क्रमांक देण्यात येतो.


ऑस्ट्रेलिया: वर्तमानपत्रामधील बातमी, Badmaash Group failed to prove themselves in the Music Competition at D. Y. Patil Stedium, Mumbai. 'मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडीयमवर झालेल्या म्युझिक किंग स्पर्धेच्या निमित्ताने पुनरागमन करणारा बदमाश बॅंण्ड जास्त काही प्रभाव दाखवू शकला नाही. पाच वर्षांपूर्वी वादग्रस्त कारणांमुळे बंद झालेल्या बॅंण्डच्या अभिजीत आणि अजयची कमतरता सतत जाणवत होती. तरुणांनी आपल्या अभिप्रायात नव्याने आलेल्या बदमाश बॅंण्डला स्पष्टपणे नकार दिला आहे. पण त्यांचा गतकाळ पाहता त्यांना अजून एक संधी देण्यात काही हरकत नाही असे काही दिग्गजांचे म्हणणे आहे.' रुपाली आपल्या हातातील वर्तमानपत्र बाजूला फेकून देते आणि गौरीला म्हणते, "पेपरवाले पण ना काही पण छापतात."

गौरी, "सोड ना...! तूला काय करायचंय. तू पास्ता खा."

"अगं पण प्रसाद मस्तच गात होता ना! सगळेच तर टाळ्या वाजवत होते."

"त्या थडग्याचं नाव परत घेऊ नकोस आणि मला अशा फालतू गोष्टी ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये. आण तो पेपर इथे, ख्रिस हम्स्वर्थची नवीन मुव्ही आलीये."

"मागच्या गोष्टी सोड ना! आपलेच मित्र आहेत ते. त्यांच कौतूक करायचं सोडून..." वाक्य पूर्ण होत नाही तोच गौरी तेथून रागाने निघून जाते. रुपाली तिला परत आवाज देते, पण ती काही ऐकत नाही. रुपालीला राहवत नाही. ती लगेच बेडरुममध्ये जाऊन इंटरनेटवर प्रसादचा कॉन्टॅक्ट नंबर शोधण्याचा प्रयत्न करते. नंबर मिळत नाही म्हणून ती प्रसादच्या फेसबूकवर मेसेज पाठवते. सोबत स्वतःचा मोबाईल नंबर सुध्दा देते. तिला याचं थोडं समाधान वाटतं. मग ती फेसबूकवरचे त्यांचे जूने फोटो पाहते. अजयने तेव्हाचे टिपलेले फोटो रुपालीला पुन्हा भुतकाळात नेऊन सोडतात, तिला ते सर्व आठवू लागतं.

नऊ वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरुन दोन स्पोर्ट्स बाईक्सवर रेस लागलेली असते. एक बाईक अशोकची आणि दुसरी अजयची, फक्त नावापूरतीच. खरं म्हणजे रेस लागली होती ती प्रसाद आणि शरद यांच्यामध्ये. दोन्ही बाईक्स सुसाट वेगाने चालल्या होत्या. पुढे फोर व्हिलरच्या टपावर बसून अजय फोटोशुटींग, खिडकीतून अर्धा बाहेर डोकावून अभिजीत व्हिडीयो शुटींग करत होते. गाडी अशोक चालवत असतो. सगळे भयान वेगाने गाड्या चालवत त्यांच्या भेटण्याच्या ठिकाणी पोहोचतात. त्या जागेला सर्वांनी 'गरीबाचा वाडा' असं नाव दिलेलं असतं. काजल आणि गौरी तेथे उभ्याच असतात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, अभिजीतसाठी गौरीकडे एक आनंदाची बातमी असते.

काजल, "इतका का वेळ लावला?"

गौरी, "गद्दार आहेत सगळे, मला दोनचा टायमिंग सांगतात आणि सगळे तीन वाजता येतात"

अभिजीत गाडीतून बाहेर येत, "बाकीच्या मुलींशी गद्दारी करुन तुझ्याशी मैत्री केली, याचं टोमनं काय मारतेस? अजयची तब्येत बरी नव्हती म्हणून उशीर झाला."

काजल, "काय झालं अजयला?"

गौरी तिच्या खांद्याला धक्का देत, "तू पण काय त्याचं ऐकतेस? बहाने बनवतोय तो." शरद कुणालातरी शोधत, "वृषाली नाही आली अजून?"

प्रसाद, "अभी, गधड्या वृषालीला दोनचा टायमिंग सांगायला सांगितला होता. गौरीला का सांगितला?"

अभिजीत, "ती बघ, आली वेळेवर. बरोबर तीन वाजता."

अजय हातातील पेप्सीचं झाकन उघडत, "व्रु, आज तू लवकर कशी?"

काजल, "गाईज, मागे बघा, सागर आला होता तिला ड्रॉप करायला."

गौरी, अभिजीत, अजय "ओऽऽ ह...."

वृषाली, "अरे इथे का बोलावलंय?"

गौरी, "अरे हा...! अभी, एक गुड न्युज आहे तुझ्यासाठी."

प्रसाद, "गुड न्युज? अभी...? तुझ्यासाठी...? ती पण गौरीकडून...? बोल.... बोल...." अशोक गाडीतून बाहेर येतो आणि, "गाडीचं डिझेल संपायला आलंय."

प्रसाद, "जाऊ दे रे ते. तु बोल."

गौरी तिच्या पर्समधून एक पाकीट काढते आणि अभिजीतच्या हातात देत म्हणते, "उघडून बघ, काय आहे त्यात?"

अभिजीत विचार करत ते पाकीट उघडून त्यातील लेटर वाचतो. सगळे गंभीरपणे आणि आता पार्टी मिळेल या आशेने त्याच्याकडे पाहतात. पण ते लेटर वाचल्यावर अभिजीतच्या चेहऱ्यावरचा आनंद शून्यात बदलतो. राग त्याच्या डोळ्यांत दिसतो आणि तो ते लेटर फाडतो.

प्रसाद, "काय होतं त्यात?"

अभिजीत अजयच्या हातातली पेप्सीची बाटली घेतो आणि तोंडाला लावण्याच्या आधी म्हणतो, "काही नाही." अजय ते फाडलेले कागद उचलून गोळा करायला लागतो.

शरद गौरीकडे वळून, "काय होतं गौरी त्यात?"

गौरी, "लेटर का फाडलंस? काय प्रॉब्लेम आहे त्यात?"

अजय आणि अशोक तोपर्यंत ते तुकडे जोडून ते लेटर वाचतात, "वेड्या, चांगला जॉब आहे ना!" अभिजीत, "विचार तिला, किती पैसे मागतायेत ते?"

प्रसाद, "तुला काय करायचंय, सेटल होशील ना कायमचा."

अभिजीत, "पैसे भरुनच जॉब करायचा होता तर कशाला शाळेत शिकलो? कॉलेज केलं? डिग्री मिळवण्यासाठी कशाला तीन वर्ष वाया घालवली असती? रात्रभर जागून मी अभ्यास करुन टॉपर्समध्ये यायचो ते मला इतरांसारखं सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत तेच ते काम करावं यासाठी नाही, मला स्वतःच्या शिक्षणाच्या बळावर काहीतरी वेगळं करायचंय."

"बाहेर प्रयत्न करतोच आहेस ना! शिकून सुध्दा काहीच करत नाहीस हेच खुप वेगळं करत आहेस तू. सोड, कर तुला काय करायचंय ते. कधी जॉब करशील? शिक्षण संपून एक वर्ष झालं, करतोयस का कुठे जॉब? मेरीटमध्ये पहिला आला तरी कोण विचारतंय तुला? सॉफ्टवेअर डेव्हलपरची पोस्ट द्यायला सुध्दा डिपॉझिट म्हणून दोन लाख मागितलेत ना त्यांनी तुला! म्हणूनच जॉबला नाही म्हणालास. सगळीकडे पैसा लागतोच रे अभी, भलाईचा जमानाच नाही राहिलाय."

शरद, "त्याचे बाबासुध्दा बोलले होते त्याला आणि मी माझ्या ऑफिसमध्ये सुध्दा बोललो होतो त्याला."

अभिजीत, "काय करु मग मी? नाही भरायचे मला कुठे पैसे. पैसे भरुन जॉब करायचा होता तर शिकवलं तरी कशाला मला?"

रुपालीचा फोन वाजतो. भुतकाळातल्या त्या सोनेरी क्षणांमधून ती शुध्दीवर येते. कंप्युटर स्टॅंण्ड बाय मोडवर गेलेला असतो. ती मोबाईल शोधू लागते. सी.पी.यु.च्या बाजूला ठेवलेला फोन ती उचलून बघते तर तिला एका अज्ञात क्रमांकावरुन फोन आलेला असतो. ती फोन रिसिव्ह करते.

"हॅलोऽऽ...?"

"रुपाली...?"

"प्रसाद...? तुला माझा मेसेज मिळाला?"

"नाही, मेसेज सेंड केला की नाही, ते विचारायला फोन केलाय."

"शट् अप. काय सांगत होती.... हा.... मस्त परफॉर्मन्स केलास. मी लाईव्ह बघत होती टी.व्ही.वर."

"यायचं ना मग. व्ही.आय.पी. पासेस होते माझ्याकडे."

"प्रसाद.... सॉरी. तुला न सांगता तुझ्यापासून एकदम लांब गेलो आम्ही सगळे."

"असू दे. काय त्या जुन्या गोष्टी काढतेस? कुठे असतेस आता?"

"टास्मानिया."

"टास्मानिया? कुठे आलं हे?"

"ताईने लग्न केलं आणि आम्ही ऑस्ट्रेलियाला येऊन सेटल झालो."

"ऑस्ट्रेलियाला जायला पैसे होते का त्याच्याकडे?"

"ऑस्ट्रेलियाची आयडिया ताईची होती. तिला राग आलेला तेव्हा जे काही चाललं होतं त्याचं. म्हणून ती त्याच्याकडे गेली आणि त्याला लग्नाची मागणी घातली. तो खूप रडत होता तेव्हा. ताई म्हणाली, जेव्हा ती त्याला भेटायला गेली, तेव्हा तो त्याच्या रुममध्ये दारु पिऊन पडलेला होता. संपूर्ण घरात बियरचा वास येत होता. सिगारेटचे अॅशेस पडले होते सगळीकडे. बाटल्यापण खूप जमा झाल्या होत्या."

"हे सगळं तर गौरीला आवडत नाही."

"हो. पण तेव्हा घरी सुध्दा या गोष्टीवरुन खूप प्रॉब्लम्स झाले होते म्हणून तो तसा असताना सुध्दा ताईने त्याच्याशी लग्न केलं. तो सुध्दा तयार झाला. लग्नानंतर त्यानेच सगळं सोडून दिलं. एकदमच बदलला तो. दोन-तीन महिने तर तो घरीच होता. मग ऑस्ट्रेलियावरुन कॉल आला, ताईने सगळा खर्च उचलला आणि मला घेऊन ते दोघेही ऑस्ट्रेलियाला आले. इथे आल्यावर ते दोघेही इथलेच झाले. जसं की, भारताचा आणि त्या दोघांचा काही संबंधच नाही. पण मला इथे आवडत नाही."

"कां...?"

"तुमच्यापैकी कोणीही नाहीये ना इथे."

"एकदा तरी सांगायचंस ना, तुम्ही तिघे ऑस्ट्रेलियाला निघालात म्हणून..."

"प्रसाद, तेव्हा माहितीये ना! व्रु दीदीने काय स्टेटमेंट केलेलं."

"सोड त्यांना. त्यांचं काय बोलत बसलोय आपण? तु कशी आहेस बोल."

"मस्त. इथे खूप क्युट क्युट कांगारु आहेत. आणि ताई मला विकएन्डला हॉलिवूडची मुव्ही सुध्दा दाखवते. आमच्या कॉलेजच्या फ्रेंड्सबरोबर मी घरी न सांगता इंडियन मुव्ही सुध्दा पाहते. सलमानची मुव्ही लागली की ताईसुध्दा माझ्यासोबत येते."

"आणि अभिजीत...?"

रुपाली, "जीजू पूर्णपणे चेंज झाले आहेत."

मैत्र जीवांचे

अभिषेक ठमके
Chapters
अर्पण पत्रिका मनोगत मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’ प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात प्रकरण २ : विरहातील पहिला भाग प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग प्रकरण ५: एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने प्रकरण ७: अंधूक आशा प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी प्रकरण १०: थरारक पार्श्वभूमी प्रकरण ११: पुन्हा एकत्र येण्याचं वचन प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात प्रकरण १३: विवाहाचं रहस्य प्रकरण १४: वडीलांचा आधार प्रकरण १५: देशप्रेम प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात