Android app on Google Play

 

प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात

 

कॅरिबियन बेटांवर पोहोचल्यानंतर स्टिफन पहिला फोन अभिजीला करतो.

स्टिफन, "हॅलो माय फ्रेंड. आय एम कम बॅक टू माय अर्थ."

अभिजीत, "वेलकम स्टि वेलकम."

स्टिफन, "व्हेअर आर यू?"

अभिजीत, "रुपालीसोबत कांगारु बघायला आलोय."

स्टिफन, "ग्रेट. तू? आणि ऑफिस टाईममध्ये बाहेर?"

अभिजीत, "कधीतरी चालतंच. थांबतोस का एयरपोर्टवर? रिसिव्ह करायला येऊ का?"

स्टिफन, "नको, एन्जॉय कर. मी ड्रायव्हरला बोलावलंय."

अभिजीत, "ओ.के. बाय."

स्टिफन, "बाय."

स्टिफन आपल्या घरी जातो. थोडा वेळ त्याच्या पत्नीसोबत बोलतो. भारतातून त्याने तिच्यासाठी बांगड्या आणलेल्या असतात. तीदेखील त्या बांगड्या पाहून खूश होते. मग तो त्याचे प्रसाद, शरद, मिनाक्षी, अशोक, काजल, अनामिकासोबत काढलेले फोटो तिला दाखवतो. भारतात राहून दोन दिवसांत त्याने अभिजीतबद्दल बरीच माहिती मिळविली होती. आता त्याला प्रश्न पडला होता, अभिजीतची त्याच्या मित्रांसोबत पुन्हा भेट कशी घडवावी. विचार करता करता तो झोपी जातो. दुसऱ्या दिवशी तो आणि अभिजीत ऑफिसमध्ये भेटतात.

अभिजीत, "वेलकम टू कॅरेबियन लॅंड्स."

स्टिफन, "सॉरी, तुला न सांगताच गेलो होतो."

अभिजीत, "ठिक आहे. हे बघ यु-ट्याूबची शॉर्ट अॅड केली आहे." त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती.

स्टिफन, "बरं वाटलं."

अभिजीत, "का?"

स्टिफन, "पहिल्यांदाच तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहिला."

अभिजीत, "बरं झालं, ये चल आतमध्ये (तो स्टिफनला कॅबिनमध्ये घेऊन जातो.) आम्ही जर्मन ट्रीम मस्तच एन्जॉय केली. लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही दोघे कुठेतरी लांब गेलो होतो. ते सात दिवस आम्ही दोघांनी पूर्ण वेळ एकमेकांना दिला. तुला नाही माहित स्टि. खूप वर्षांनी मी तिला मनापासून हसताना पाहिलं, जेव्हा आम्ही दोघं रस्ता चुकलो तेव्हा मला जाणिव झाली, आयुष्यात मला तिची खूप गरज आहे. ती पण ना! मी तिला म्हणालो, 'शॉपिंग करायला जात आहेस तर डावीकडे जा.' ती जाताना पण डावीकडे गेली आणि येताना सुध्दा डावीकडूनच आली. खरंतर ती रस्ता चुकली होती. तिने येताना उजवीकडून यायचं होतं. हरवल्याचं लक्षात आल्यावर तिने मला फोन केला. मी पेंटिंग्स बघत होतो. तुला काय सांगू स्टि, ती भेटेपर्यंतचा क्षण मी कसा जगत होतो हे खरंच शब्दांत सांगता येणार नाही. यू नो समथिंग?"

स्टिफन, "व्हॉट?"

अभिजीत, "आय एम इन लव."

स्टिफन दचकतो, तो भुवया उंचावून प्रश्नार्थक चेहरा करतो, 'कोण ती?'

अभिजीत, "माझी पत्नी."

स्टिफन स्वतःशीच हसतो.

अभिजीत, "नाही रे स्टि. तुला नाही माहित माझ्या आयुष्यात काय काय घडलं होतं ते. तेव्हा माझं कोणीही सोबत नव्हतं.पण तीच शेवटपर्यंत माझ्या पाठीशी राहिली. तिने जर माझ्याशी लग्न केलं नसतं तर आज मी इथेच काय? या जगातच नसतो, सोड. मी पण काहीही सांगत बसलोय तुला. चल काम करुया. संध्याकाळी घरी ये, तेव्हा मस्त बोलूया."

एवढं बोलून अभिजीत निघून जातो. अभिजीतच्या वागणूकीकडे पाहून स्टिफनला समाधान वाटतं. कॅबिनच्या उघड्या दरवाज्यातून अभिजीतला इतरांशी सहजपणे बोलताना त्याने पहिल्यांदा पाहिलेलं असतं. मित्राला हसताना पाहण्यासाठी महासागर पार करुन दुसऱ्या देशात जाणारा तो, त्या व्यक्तीला आनंदी, प्रसन्न पाहून जग जिंकल्याचं समाधान त्याला वाटतं.

संध्याकाळी तो अभिजीतच्या घरी जातो. गौरी स्वयंपाकघरात जेवण बनवत असते आणि अभिजीत त्याच्या बेडरुममध्ये बसून काम करत असतो. रुपाली समोरच्या रुममध्ये पुस्तक वाचत असते. तो घरी आलेला पाहून रुपाली त्याला सहजच विचारते,

"खूप दिवसांनी दिसलात सर."

स्टिफन, "हो. तुझंच काम करायला गेलो होतो."

रुपाली, "म्हणजे?"

स्टिफन, "इथे नाही, बेडरुममध्ये चल." एवढं बोलून तो मोबाईलमधला त्याचा आणि प्रसादचा फोटो तिला दाखवतो. रुपालीचा चेहरा ४४० व्होल्टचा शॉक बसल्यासारखा होतो. ती लगेचच स्टिफनला घेऊन तिच्या बेडरुममध्ये जाते आणि दरवाजा बंद करते.

त्यांना बघून गौरी किचनमधून अभिजीतच्या बेडरुममध्ये जाते, "अहो, तुमचा मित्र स्टिफन आणि रुपा, दोघे तिच्या बेडरुममध्ये गेलेत आणि दरवाजा बंद केलाय"

अभिजीत, "डोक्यात नको ते विचार आणू नकोस. स्टि तसा नाही."

गौरी, "मग का माझी बहिण तशी आहे?"

अभिजीत, "अगं तिला काहीतरी काम असेल म्हणून बेडरुममध्ये घेऊन गेली त्याला."

गौरी, "मग तिने दरवाजा बंद कशाला करायला हवा?"

अभिजीत, "बहिण कुणाची?"

गौरी, "असं का? थांबा आता मी पण दरवाजा बंद करते."

अभिजीत लगेचच काम करणं बंद करतो आणि म्हणतो, "मी कधीही तयार आहे."

गौरी, "पण मी तयार नाही."

अभिजीत, "का?"

गौरी, "दरवाजा बंद केला म्हणजे असं नसतं की दोघे आतमध्ये काहीतरी करतच असतील."

अभिजीत तोंड बारीक करतो, "ठिक आहे, जातो रुपालीच्या रुममध्ये."

रुपालीच्या बेडरुममध्ये,

रुपाली, "तुम्ही खरंच त्या सर्वांना भेटलात? मला विश्वासच बसत नाही."

स्टिफन, "हो. म्हणजे अजय आणि नम्रता यांना फक्त भेटता आलं नाही"

रुपाली, "मग? काय म्हणाले ते?"

स्टिफन, "त्यांची इच्छा आहे, या दोघांनी त्या सर्वांना एकदा तरी भेटावं."

रुपाली, "खरंच..."

स्टिफन, "आपण नक्कीच त्यांची भेट घडवू. मला मदत करशील ना!"

रुपाली, "१०१ पर्सेंट."

अभिजीत, "रुपाली? स्टि? आतमध्ये आहात का?"

रुपाली, "हो जिजू. काय झालं?"

अभिजीत, "नाही म्हणजे काय करताय?"

रुपाली, "काही नाही. बोलतोय आम्ही."

अभिजीत, "बरं, मग ठिक आहे." तो मागे वळतो तर गौरी रागाने त्याच्याकडे बघत असते. पुन्हा रुपालीचा दरवाजा वाजवून,

"अगं मला जरा काम होतं स्टिफनसोबत."

रुपाली, "हो. पाठवते त्यांना."

स्टिफन तिच्या बेडरुममधून बाहेर निघतो तेव्हा गौरीच्या मनाचं समाधान होतं. ती रुपालीच्या बेडरुममध्ये जाऊन तिच्या बाजूला थोडा वेळ बसते.

रुपाली, "ताई, आज मी खूप खूश आहे."

गौरी, "का? काय झालं?"

रुपाली, "ज्या गोष्टीची मी गेली पाच वर्ष वाट पाहत होती ती गोष्ट पूर्ण होत आहे."

गौरी, "कुठली गोष्ट?"

रुपाली, "ते असं नाही सांगणार, तू फक्त गॉडकडे प्रार्थना कर, ती गोष्ट पूर्ण झाली पाहिजे म्हणून."

गौरीच्या डोक्यात भलतेच विचार येऊ लागतात. तर दुसरीकडे अभिजीतच्या,

स्टिफन, "अभी, आज मी रुपालीला एक गोष्ट दाखवली आहे. तिला ती खूप आवडली. तिची इच्छा आहे ती गोष्ट प्रत्यक्षात घडावी. त्यासाठी मला तिची गरज आहे. ईश्वराकडे प्रार्थना कर, ती गोष्ट लवकरात लवकर घडू दे."

अभिजीत फक्त 'हो' म्हणतो, स्टिफनची गाडी गेल्यानंतर अभिजीत घरात शिरतो. गौरीचा चेहराच सांगतो तिच्या मनात काय चाललंय ते. थोड्या वेळाने तिघेही जेवायला बसतात. रुपालीला एवढं खूश बघून त्या दोघांच्याही तोंडातून साधा घासही उतरत नाही. दोघं एक वेळ रुपालीकडे बघतात आणि मग एकमेकांकडे बघतात. आपल्याच धुंदीत हरवलेली रुपाली जेवून झाल्यावर हसतच तिच्या खोलीमध्ये निघून जाते. जेवणं आटपून दोघं त्यांच्या खोलीत जातात,

गौरी, "मला रुपालीचं काही खरं दिसत नाहीये."

अभिजीत, "हं... मला स्टिच्या बाबतीत देखील असंच वाटतंय. रुपाली काय म्हणाली?"

गौरी, "हेच की ज्या गोष्टीची ती पाच वर्षांपासून वाट पाहत होती ती गोष्ट काही दिवसांत पूर्ण होणार. अहो, स्टिफनसोबत ओळख होऊन पाच वर्ष झालीत ना!"

अभिजीत, "हो."

गौरी, "बघा. तरी मी म्हटलं होतं आतमध्ये काय चाललंय ते बघा."

अभिजीत, "आता ते दोघं आतमध्ये काय करताय ते मी कसं बघू? आपल्याला कोणी बघीतलं तर तुला कसं वाटेल?"

गौरी, "मस्करी करु नका. तो काय म्हणाला?"

अभिजीत, "त्याने तिला काहीतरी दाखवलं. त्या दोघांचं म्हणनं आहे की ती गोष्ट लवकरात लवकर व्हावी."

गौरी, "लग्न झालं तरी त्याचं समाधान नाही झालं का? बेडरुमचा दरवाजा बंद करुन तिला काहीपण दाखवतो."

अभिजीत, "तुझी बहिण पण काही कमी नाही. तिला कळत नाही का? त्याचं लग्न झालंय ते. वरुन ती बोलते 'पाच वर्षांपासून वाट पाहत होती.' तुच बघ कुणाच्या मनात पाप आहे ते."

गौरी, "माझ्या बहिणीला काही बोलू नका, तुमचा मित्र दिसतो तसा नाही."

अभिजीत, "झोप तू. मी उद्या ऑफिसमध्ये बघतो."

गौरी, "आता लगेचच त्याला काही बोलू नका. त्या दोघांना रंगेहात पकडू तेव्हा बोलू. शी बाबा, उगीचच ऑस्ट्रेलियामध्ये आले."

अभिजीत, "दुसऱ्या देशात गेलो असतो तरी तुझ्या बहिणीने असेच दिवे लावले असते. आता उद्यापासून लक्ष ठेव तिच्यावर."

दोघे भांडू लागतात. लग्नानंतरचं पहिलंच भांडण असावं. हे भांडण म्हणजे त्या दोघांचा एकमेकांवर काहीतरी अधिकार आहे आणि आपल्या जवळच्यांची त्या दोघांना काळजी आहे असंच काही सुचवत होतं.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये,

अभिजीत, Where is Stee.? "स्टी. कुठे आहे?"

लिझा, No Sir, he has not come today. "नाही सर, आज ते आलेच नाहीत."

अभिजीत, Ok. "बरं, ठिक आहे."

तो लगेचच गौरीला फोन करतो,

"रुपा कुठे आहे?"

गौरी, "कॉलेजमध्ये असेल."

अभिजीत, "फोन करुन विचार."

थोड्या वेळाने गौरी त्याला फोन करते.

गौरी, "ती फोन उचलत नाहीये. सेरेनाला विचारलं तर ती आली नाही असं म्हणाली."

अभिजीत, "तुझी बहिण चांगलेच दिवे लावू लागली. इथे स्टिसुध्दा नाहिये."

गौरी, "देवा. काय कमी पडू दिलं होतं मी तिला? का असं करतेय ती?"

अभिजीत, "हा सगळा तुझ्या लाडाचा परिणाम आहे. ठेव फोन, मी स्टिला फोन करतो." स्टिफनला फोन करून, "स्टी कुठे आहेस?"

स्टिफन, "बाहेर आहे. का? काय झालं?"

अभिजीत, "रुपाली आहे का?"

स्टिफन, "हो. सोबतच आहे."

अभिजीत फोन स्वतःच्या डोक्यावर मारुन घेतो.

अभिजीत, "काय करतेय ती?"

स्टिफन, "काही नाही. सहज भेटली मला."

अभिजीत, "कुठे आहात तुम्ही?"

स्टिफन, "आपल्या वॉल स्ट्रीट मॉलजवळच्या चर्चमध्ये."

अभिजीत, "चर्चमध्ये? का?"

स्टिफन, "जरा काम होतं आमचं. चल मी नंतर बोलतो." आणि स्टिफन फोन ठेवतो.

अभिजीत लगेचच गौरीला फोन करतो, "ती स्टिफनसोबत चर्चमध्ये आहे."

गौरी, "चर्चमध्ये का?"

अभिजीत, "काहीतरी काम आहे असं म्हणाला."

गौरी, "बाप रे! पळून लग्न-बिग्न करते की काय? थांबा, मी जाते तिथे."

अभिजीत, "लवकर जा, आणि काय झालं ते मला सांग."

गौरी लगबगीन घरातून निघते, "जरा घरात लक्ष नसतं तुमचं. सारखं आपलं काम काम काम. मित्रावर सुध्दा लक्ष ठेवत नाही. सारखा घरी का येतो हे पण नाही बघत. घरात एक तरुण मुलगी आहे आणि तुमचं आपलं लक्षच नाही. आणि वरून बोलताय 'लवकर जा, काय झालं ते मला सांग.' त्यांचं लग्न झाल्यानंतर आशिर्वाद द्यायला या फक्त."

अभिजीत, "तू बडबड कमी कर आणि जा लवकर. मी टॉमला पाठवतो इथून. तो सुध्दा येईल."

गौरी टॅक्सी करुन चर्चजवळ जाते. स्टिफन आणि रुपाली चर्चबाहेर बाकावर बसलेले असतात. ते काय बोलताय हे ऐकण्यासाठी ती हळूच जवळ जाते तोच टॉम समोरुन येतो आणि सगळं पकडलं जातं.

गौरी म्हणते, 'मी चर्चमध्ये आले होते. म्हणून टॉमला बोलावलं.'

स्टिफन, "ओ.के. चल मग रुपाली. आपण नंतर भेटू. बाय. लव यू."

रुपाली, "लव यू टू डियर."

गौरीच्या डोक्यात पुन्हा प्रश्न येतो. 'आता या दोघांची मजल इथपर्यंत पोहोचली की माझ्यासमोर एकमेकांना लव यू लव यू म्हणू लागलेत. घरी जाऊन हिला चांगलंच सरळ करते.' पण गौरी काही करत नाही. असं सलग चार दिवस सुरु असतं. स्टिफन आणि रुपालीचं भेटणं हळूहळू वाढू लागलं होतं. तब्येतीने तंदुरुस्त असूनसुद्धा अभिजीतला रात्री झोपताना ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाव्या लागत होत्या. गौरी आता रुपालीच्या बाजूला झोपत होती. अभिजीतने स्टिफनच्या अंगावर भरपूर काम वाढवून ठेवलं होतं. तरीही ते दोघे भेटतच होते. भेटता आलं नाही तर फोनवर एकमेकांशी बोलत. गौरीला नंतर कळतं, रात्री सगळे झोपी गेल्यानंतर रुपाली स्टिफनसोबत फोनवर बोलत असते.

एके रात्री गौरी झोपेचं सोंग घेते. रुपालीला वाटतं ती झोपी गेली. हळूच अंथरुणावरुन उठून ती बाल्कनीमध्ये जाते. पुन्हा मागे बघते तर गौरी झोपलेली दिसते. मग ती स्टिफनला फोन करते. रुपाली फोनवर बोलत आहे हे लक्षात आल्यावर गौरी चोरपावलांनी बाल्कनीमध्ये जाते आणि रुपालीपासून काही अंतर ठेवून लपून तिचं बोलणं ऐकते.

रुपाली, "फक्त एकदा करुन बघा. मी आहे ना तुमच्यासोबत.... नाही... तुम्हीच हे करु शकता... आता मागे तुम्ही हे केलं तर जीजू आणि ताईला जरासुध्दा संशय आला नाही. मग आता कशाला घाबरता? मी काहीतरी बहाना करुन सांगेन त्यांना..."

गौरी पूर्णपणे गडबडून जाते. 'यांचं हे प्रकरण इथपर्यंत पोहोचलं? मला संशय न येता या दोघांनी केलं? काय केलं असेल यांनी?'

 रुपाली, "प्रसाद बोलला ना तुम्हाला..."

प्रसादचं नाव ऐकून गौरीला धक्का बासतो, ती तिथेच ओरडते, "रुपा, काय चाललंय?"

रुपाली लगेच फोन कट करते, "ता...ई... तू... झोपली नाहीस?"

गौरी, "प्रसादचं नाव घेतलंच कसं तू? कुणाशी फोनवर बोलत होतीस?"

रुपाली, "कुणाशी नाही. मैत्रिणीसोबत बोलत होते."

गौरी, "तुझ्या कुठल्या मैत्रिणीला मराठी येतं? आन तो फोन इथे."

रुपाली, "स्टिफन सरांशी बोलत होते."

गौरी तिच्या हातून फोन हिसकावून घेते आणि स्टिफनला फोन करते. ती काही बोलणार इतक्यात स्टिफन बोलतो, "बेटा, तू काळजी करु नकोस. मी नक्कीच बदमाश ग्रुपला पुन्हा एकत्र आणणार. आय प्रॉमिस."

गौरीच्या हातून मोबाईल खाली पडतो आणि त्याचे दोन तुकडे होतात. ती एकदम शांत होते. पाच वर्षांनंतर अनोळखी ठिकाणी एका ओळखीच्या व्यक्तीकडून भुतकाळाची वाईट गोष्ट ऐकल्याने तिला जबरदस्त धक्का बसतो. रुपाली मोबाईल उचलून विचारते,

"काय झालं ताई?"

गौरी काही बोलत नाही. रुपाली जेव्हा तिला हलवते तेव्हा ती शुध्दीवर येते. रुपालीकडे रागाने बघून ती जोरात तिच्या कानाखाली वाजवते.

"मला आताच्या आता सांग. तुझं आणि स्टिफनचं काय चाललंय. त्याला ग्रुपबद्दल कसं काय कळलं? सगळं खरं खरं सांग. तुला माझी शप्पथ आहे."

 रुपाली, "ताई प्लीज आता काही विचारु नकोस. मी सकाळी तुला सगळं सांगते. वाटल्यास स्टिफन सरांना सुध्दा घरी बोलावते पण प्लीज आता काही विचारु नकोस." इतक्यात अभिजीत येतो.

अभिजीत, "काय झालं? कसला आवाज होता?"

रुपाली गौरीकडे लहान चेहरा करुन अप्रत्यक्षपणे 'नको सांगूस' असं म्हणते.

गौरी, "काही नाही. तुम्ही झोपा."

अभिजीत, "झोप नाही येत. अंग खूप दुखतंय. जरा मालिश करुन देतेस का? चल ना!"

गौरी रुपालीकडे मोठे डोळे करुन पाहत तिथून निघून जाते. रुपालीला चांगलीच धडकी भरली होती. घडलेला प्रकार ती स्टिफनला फोन करुन सांगते. स्टिफन तिला धीर देतो, 'कधी ना कधी हे होणारच होतं. तू काळजी करु नकोस. मी उद्या भेटतो तुझ्या ताईला.'
 

मैत्र जीवांचे

अभिषेक ठमके
Chapters
अर्पण पत्रिका
मनोगत
मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’
प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात
प्रकरण २ : विरहातील पहिला भाग
प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग
प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग
प्रकरण ५: एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे
प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने
प्रकरण ७: अंधूक आशा
प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये
प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी
प्रकरण १०: थरारक पार्श्वभूमी
प्रकरण ११: पुन्हा एकत्र येण्याचं वचन
प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात
प्रकरण १३: विवाहाचं रहस्य
प्रकरण १४: वडीलांचा आधार
प्रकरण १५: देशप्रेम
प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात