Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १३: विवाहाचं रहस्य

सकाळी अभिजीत ऑफिसला निघून जातो. गौरी रुपालीशी काही बोलत नाही. तीदेखील सोफ्यावर शांतपणे बसलेली असते. मध्येच गौरीकडे बघते, पण गौरी तिच्याकडे लक्ष देत नाही. थोड्या वेळाने बेल वाजते. गौरी दरवाजा उघडते. समोर स्टिफन असतो. ती तोंड वाकडं करुन स्वयंपाकघरात जाते. स्टिफन सोफ्यावर बसतो. भुवया आणि मान उंचावून रुपालीला प्रश्नार्थक नजरेने विचारतो. रुपाली लहान चेहरा करुन नकारार्थी मान हलवते. गौरी पाणी घेऊन येते. स्टिफन पाणी पितो. गौरी तिथेच बसते. थोडा वेळ कोणीही काही बोलत नाही.

स्टिफन, "Gauri, please listen…"

गौरी, "माझ्याशी मराठीतच बोला."

स्टिफन, "मराठीत बोलतो. हे बघा, रुपालीला काही बोलू नका. मी भारतात तुमच्या मित्रांना भेटायला गेलो होतो. तिथे मी सागरला भेटलो, वृषालीला भेटलो, प्रसाद, शरद, अशोक..."

त्याला मध्येच तोडून, गौरी, "पण काय गरज होती त्या सर्वांना भेटण्याची?"

स्टिफन, "पाच वर्ष होऊन गेली, तुम्ही इथे आलात. एकत्र काम करताना मला अभीच्या अनेक गोष्टी खटकत होत्या. इतक्या वर्षांनंतर..."

गौरी, "त्यांच्या आयुष्यात काय झालं हे तुम्हाला माहित नाही."

स्टिफन, "तुम्ही मला बोलू द्याल तर मी सांगेन (गौरी शांत होते) तुम्ही दोघं जर्मनीला गेले तेव्हा मी ऑफिसमधल्या काही फाईल्स पाहत होतो त्यासाठी मला अभीचं ब्लॉकींग ओपन करावं लागलं. नंतर त्याच्या नावाने सर्च केला आणि तुमच्या ग्रुपचे भारतातले फोटो पाहिले. तेव्हाचा अभिजीत आणि आताचा अभिजीत यांच्यात खूप मोठा फरक आहे. मला वाटलं त्याच्या आयुष्यात झालेल्या वाईट घटनांबाबत समजावून त्याला पुन्हा पुर्वीसारखं हसत असताना पाहू. हाच विचार करुन मी भारतात गेलो. तेव्हा वृषाली, सागर, प्रसाद यांच्याकडून अनेक गोष्टी माझ्यासमोर आल्या."

गौरी, "काय म्हणाले ते?"

स्टिफन, "लाखात एक असा तुमचा ग्रुप होता. प्रत्येकाची आपली एक खास ओळख होती. तुमच्यापैकी कुणालाही एकमेकांशिवाय राहवत नव्हतं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण सुवर्णा नावाची एक मुलगी अभीच्या आयुष्यात आली आणि तुमचा ग्रुप विखूरला गेला. अभी खूप विचित्र वागू लागला. प्रत्येक वेळी स्टेज शो झाल्यानंतर न सांगता निघून जायचा. कधी कधी येत सुध्दा नव्हता. शेवटी एक दिवस अजयने त्याचा पाठलाग केला. अभी सुवर्णाला भेटायला गेला होता. ग्रुपमधील सर्वांपासून लपून तो तिला भेटू लागला होता. त्या मुलीचं कॅरेक्टर बरोबर नव्हतं. अभीकडे पैसा होता, तो मोठा होऊ लागला होता. तिचा त्याच्या पैशावर डोळा होता. तुम्ही सर्वांनी त्याला खूप समजावलं, अजयने त्याला मारलं सुध्दा होतं. पण त्याच्यावर काही फरक पडला नाही. मग त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला. नंतर कळलं तिला त्याच्याकडून दिवस गेले होते. पोलिस त्याला पकडायला गेले तेव्हा तो सात ते आठ बाटल्या बियर प्यायला होता. त्याने पोलिसांना सुध्दा मारहाण केली. त्याला आत टाकण्यात आलं. नंतर तुम्ही त्याला सोडवलं. त्याच्या अशा वागण्यामुळे ग्रुपमधलं कोणीही त्याच्याशी बोलत नव्हतं. फक्त तुम्हीच त्याच्याशी बोलत होत्या. त्याच्या अशा वागण्याचा परिणाम तुमच्या पूर्ण ग्रुपवर झाला. वृषाली ग्रुप सोडून निघून गेली. अजय आणि नम्रताच्या लग्नाची धावपळीत तिच्या वडिलांनी त्याला एका अटीवर लग्नासाठी परवानगी दिली. त्याला ग्रुप सोडायला सांगितला. अभिजीतसारख्या मित्रांची संगत असेल तर त्यांच्या मुलीचंही असंच काहीतरी वाईट होईल असं त्यांचं म्हणणं होतं. असं करता करता ग्रुपमधून एक एक करुन अभी, तुम्ही, वृषाली, अजय निघून गेले. एकदमच सगळं वाईट झालं होतं म्हणून तुमच्या ऑर्डर्स बंद झाल्या, ट्रस्ट बंद झाली. प्रसादला त्याचं मुल गमवावं लागलं."

गौरी, "एवढंच बोलले का ते? त्यांनी तुम्हाला यांच्या आणि सुवर्णाबद्दल एवढंच सांगितलं?"

स्टिफन, "हो. आणखी काही होतं का?"

गौरी, "हो. खूप काही होतं. (ती थोडं शांत बसते. मान खाली घालून स्वतःशीच हसत ती पुन्हा बोलू लागते) जगात मीच अशी पहिली पत्नी असेल जी आपल्या पतीच्या पहिल्या प्रेमाचे गुणगाण गातेय.

सुवर्णा यांचा जीव होती आणि यांच्यात तिचा प्राण होता. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचे. त्यांच्या प्रेमाचा ऑफिसमध्ये वाईट परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी आणि मी तिला घरी बसायला सांगितलं. तेव्हा तिचं आणि आयुशचं ब्रेकअप झालं होतं. ती पूर्णपणे तुटली होती. दुसऱ्यांदा आम्ही जेव्हा तिला भेटायला गेलो होतो तेव्हा हे मला म्हणाले होते, 'दुसऱ्या भेटीत कळलं, मी पहिल्या भेटीतच तिच्या प्रेमात पडलो होतो.' मग ते तिची काळजी घेऊ लागले.

यांनी पहिल्यांदाच कुणाला तरी प्रेमाची मागणी घातली होती आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी स्वतः तिथे होती. तिने लगेच होकार दिला. कितीही मोठा कार्यक्रम असला तरी हे तिच्यासाठी सगळं बाजूला ठेवून भेटायला जायचे. हळूहळू दोघांमधलं प्रेम फुलू लागलं. त्यांच्या प्रेमाबद्दल फक्त मलाच माहित होतं आणि माझ्यापासून काही लपून राहत नव्हतं. एक दिवस तिच्या घरी दोघांबद्दल कळलं. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला खूप मारलं. तिचं बाहेर जाणं बंद केलं. तिचा मोबाईल फेकून दिला. तेव्हा मी तिला भेटायला जायचे, त्या दोघांमधलं प्रेम मी स्वतः जवळून पाहिलं होतं. ती मला यांच्याबद्दल विचारायची आणि हे व्यवस्थित आहे असं कळल्यावर तिला बरं वाटायचं. तिच्या घरुन निघाल्यावर हे मला तिच्याबद्दल विचारायचे. दोघांच्या डोळ्यात प्रेम स्पष्टपणे दिसत होतं. दोघंही मनाने एक झाले होते...." गौरीला मध्येच थांबवून.

स्टिफन, "अभी तर चांगला होता. त्याच्याकडे कशाचीही कमी नव्हती. दोघं एकमेकांवर जिवापाड प्रेम करत होते, मग तिच्या वडिलांना काय प्रॉब्लेम होता?"

गौरी, "आम्ही भारतात राहत होतो. तिथे नुसतंच प्रेम करुन चालत नाही. तिथे 'जात' महत्वाची असते. तिची जात यांच्या जातीपेक्षा श्रेष्ठ होती म्हणून तिच्या वडिलांना हे प्रेम मान्य नव्हतं. त्यांना त्यांच्या मुलीला खालच्या जातीत द्यायची नव्हती. हे जात बदलायला देखील तयार झाले होते. मग तिचे वडिल म्हणाले, 'माझ्या पोरीसाठी आज जात बदलतोस, उद्या काही झालं तर दुसऱ्या मुलीसाठी माझ्या मुलीची जागा बदलशील. मला हे मान्य नाही. माझ्या मुलीचा विचार सोड. जर मुलगा आमच्या जातीतला असेल तर मी माझ्या मुलीचं लग्न त्याच मुलाशी करेन. मग तो रस्त्यावर भिक मागत असेल तरी चालेल.' सुवर्णाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. ती यांच्याकडे आली आणि 'पळून लग्न करुया.' असं म्हणाली. यांना ते पटत नव्हतं. प्रेम केलं आहे काही गुन्हा नाही. पळून लग्न करायची गरजच काय? मी आणि यांनी खूप प्रयत्न केले तिच्या वडिलांना समजावण्याचे. पण त्यांनी आमचं काही ऐकलं नाही.

विरहामुळे सामान्य दुबळे प्रेम नाहीसे होते. पण तोच विरह उत्कट प्रेमाला मात्र अधिक तीव्र करतो. प्रेमात एकमेकांना भेटण्यासाठीची तळमळ मी त्या दोघांमध्ये बघितली आणि म्हणूनच मी त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. एक दिवस मी तिला माझ्या घरी घेऊन आले, हे सुध्दा होते घरात. दोघांना एकांत मिळावा म्हणून मी घराला कुलूप लावून बाहेर गेले. तो दिवस ते दोघे प्रत्येक क्षण एकमेकांसाठी जगले, दोघांनी एकमेकांना कधी न केलेला स्पर्श केला, त्याच दिवशी दोघे मनाप्रमाणे शरीराने देखील एक झाले. त्या दोघांमध्ये कसलंही अंतर नव्हतं फक्त आणि फक्त प्रेम होतं. दुसऱ्या दिवसापर्यंत दोघांना एकमेकांपासून दूर जावंसं वाटलं नाही. घरी येण्याअगोदर मी यांना फोन करुन 'मी दहा मिनिटात पोहोचतेय' असं सांगितलं. तरीही दोघांनी एकमेकांना सोडलं नव्हतं.

त्या भेटीनंतर मात्र तिला त्रास होऊ लागला. तिचे वडिल रोज तिला मारहाण करु लागले. भावनेच्या भरात ही गोष्ट मी यांना सांगितली आणि रागाने पेटून उठलेले हे तिच्या नातेवाईकांसमोर तिच्या घरी गेले. मी तिथेच होते. तिच्या घरच्यांसमोर आम्ही दोघं एकमेकांना ओळखत नाही असंच आम्ही वागत होतो. हे आले आणि सुवर्णाच्या पलंगाशेजारी जाऊन बसले. तुम्हाला सांगते, दोघं एक अक्षरसुध्दा नाही बोलले. फक्त एकमेकांच्या डोळ्यात  पाहत होते. तिचे वडिल यांना पाठीमागून मारताहेत, आई शिव्या देतेय हे काहीही यांना जाणवत नव्हतं. यांनी हळूच तिच्या कपाळावर कुंकू लावलं. तिने जेव्हा प्राण सोडला तेव्हा यांचा हात तिच्या हातात होता.

एका खऱ्या प्रेमाचा तो दुःखद शेवट होता. (डोळ्यात आलेलं पाणी पुसत) हे तिच्या हातावर डोकं ठेवून रडत होते. तेव्हाच तिच्या आईने त्यांना मारण्यासाठी कोयता उचलला आणि यांच्या हातावर वार केला. मी जोरात किंचाळले. यांना खूप राग आला होता. तिच्या आईवडिलांच्या जातीच्या हट्टामुळे ती या जगात नव्हती. रागाच्या भरात यांनी तिच्या वडिलांना जोरात कानाखाली वाजवली. तिचे वडिल टी.व्ही.वर जाऊन पडले. तिच्या आईलादेखील यांनी खूप मारलं. एक शब्दही ते कुणाशी बोलले नाही. मला फक्त नजरेने 'जा.' असं म्हणाले. नंतर कळलं, तिचा आणि तिच्या आईवडिलांचा खून केल्याप्रकरणी यांना अटक करण्यात आली. दुसरीकडे आमच्या ग्रुपचं आर्थिक नुकसान होऊ लागलं. मला ते पैसे महत्वाचे नव्हते, मला माझ्या मित्राचं आयुष्य महत्त्वाचं होतं. मग मी यांना जेलमधून सोडवलं. तिथून आल्यावर यांच्यामध्ये खूप बदल झाला होता. हसणंच विसरले होते हे. खून केल्याचा आरोप होता म्हणून कोणीही त्यांच्याशी बोलत नव्हतं. आमचा ग्रुप जो इतके दिवस यांच्या नावाचा गजर करत होता, तोच ग्रुप संकटाच्या वेळी यांच्या सोबतीला आला नाही. मित्रच काय? नातेवाईक सुध्दा यांना जवळ करत नव्हते. मी एक मुलगी असल्याने मला सुध्दा यांच्याकडे जास्त लक्ष देता येत नव्हतं. माझ्या घरच्यांनी सुध्दा यांच्यापासून लांब रहायला सांगितलं होतं. तरीही मी लपून यांना भेटायचे. यांनी दारु प्यायला सुरुवात केली होती. एखादी व्यक्ती त्यांचं तेव्हाचं वागणं बघून नक्कीच त्यांच्यापासून लांब गेली असती. पण मला माहित होतं, यांनी काय गमावलंय ते. यांचं दुःख समजू शकणारी तेव्हा मीच एकटी होते. म्हणून मी यांना सांभाळत होती.

पण तेव्हा प्रसादने मिडियासमोर सांगितलं, 'यांच्यामुळे सुवर्णाला दिवस गेले.' तिथेच माझं डोकं फिरलं आणि मी त्याला जाब विचारायला गेली, तर सर्वांनी माझ्यावर नको ते आरोप केले.

वृषालीने तेव्हा ग्रुप सोडला होता. तरीही ती तिथे होती, मी येणार याची त्या सर्वांना आधीपासूनच कल्पना होती. मी प्रसादला शिव्या देणार इतक्यात वृषाली बोलू लागली, 'हिच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीतरी चालू आहे. आपलं लपवण्यासाठी या दोघांनी सुवर्णाला बळीचा बकरा बनवलं होतं. मला हे आधीपासूनच माहित होतं, पण मी बोलेल आणि ग्रुपमध्ये प्रॉब्लेम्स येतील म्हणून मी सर्वांपासून लांब झाले.' मी बोलली तिला, 'मग इथे कशाला आलीस?' ती बोलली, 'माझ्या लग्नाचं कार्ड द्यायचं होतं. सगळ्यांना इनव्हाईट केलंय. तुला आणि तुझ्या रोमियोला सोडून.' खूप राग आला होता, पण जवळच्या मित्रांना माझ्या आणि यांच्याबद्दल असं नको ते वाटत होतं म्हणून तशीच रडत मी तिथून निघून गेले."

सगळं एकदम सुन्न झालं होतं. गौरीच्या तोंडून पुढचे शब्द निघत नव्हते. ही गोष्ट रुपालीला देखील माहित नव्हती.

एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या मित्रांमध्ये इतकं मोठं वादळ आलं होतं त्यामुळे सर्वांना एकमेकांपासून खूप दूर विखरून टाकल्या गेलं होतं. मैत्रीचा असा शेवट पाहून स्टिफनचं मनदेखील भरुन येतं. त्याच्या आणि रुपालीच्या डोळ्यातून पाणी येतं. तरीही मोठा धीर करुन तो म्हणतो, "मग आता तुम्ही त्यांच्यापैकी कुणालाही माफ नाही करणार का?"

गौरी, "मुळातच नाही. कारण मैत्री करण्यासाठी मैत्रीची भावना मनात असावी लागते जी त्यांच्यात नाही. आणि मैत्री टिकवण्यासाठी एकमेकांवर विश्वास असावा लागतो."

स्टिफन, "मी फक्त तुम्हा सर्वांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होतो. पण या सत्याची मला कल्पनाच नव्हती. जुने मित्र पुन्हा एकत्र आणून सर्वांच्या आयुष्यात आनंद आणावा असा विचार करत होतो. खरंच मी चुकीचा होतो."

रुपाली, "नाही सर. चुक माझी आहे. मला या सत्याची माहिती नव्हती आणि उगाचच ग्रुप पुन्हा एकत्र व्हावा हे स्वप्नं बघत होती. ताई, मला माफ कर. मी पुन्हा कधी असं काही करणार नाही. प्रॉमिस ताई."

गौरी, "ही गोष्ट मला कळली हे ठिक आहे. पण यांना ही गोष्ट अजिबात कळता कामा नये. हे सगळं इथेच संपवा आणि पुन्हा हा विषय काढू नका."

रुपाली आणि स्टिफन दोघेही गौरीच्या बोलण्याला सहमती दर्शवितात. रुपाली रडतच गौरीच्या कुशीत जाते. गौरी विचारांत हरवलेली असते. रुपालीच्या केसांमधून ती हळूवार हात फिरवते. स्टिफन सरळ आपल्या घरी जातो, कारण ऑफिसमध्ये जाऊन अभिजीतसमोर जायची त्याची हिंमत होत नाही. उगाच भारतात गेलो आणि वृषाली व प्रसादच्या घरी थांबलो असं त्याला वाटत होतं. आपल्या मोबाईलमध्ये काढलेले सर्व फोटो तो उडवून टाकतो. डोक्यावरील केस ओढून तो आपलं डोकं भिंतीवर आपटू लागतो. माझा मित्र जसा आहे तसाच ठिक आहे. त्याला त्या भारतात जाऊ देणार नाही. गौरीने तेव्हा खरंच मैत्री जपली होती. संपूर्ण जग अभिजीतविरोधात असून देखील शेवटपर्यंत मैत्री टिकवणारी गौरी ही स्टिफन आणि रुपालीच्या नजरेत मोठं स्थान निर्माण करते. त्याला अभिजीतचे शब्द आठवतात, 'आय एम इन लव. मी माझ्या पत्नीच्या प्रेमात पडलोय.' मित्राच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वतःवर घेऊन त्याच्याशी लग्न केलं म्हणजे तिने स्वतः खूप मोठा त्याग केला होता. तिच्या मनात देखील काही स्वप्नं असतील, काही आकांक्षा असतील. त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून फक्त मित्राचं आयुष्य सुधारण्यासाठी तिने त्याच्याशी लग्न केलं? अशी मैत्री करण्यासाठी खूप मोठी हिंमत लागते जी खूप कमी लोकांमध्ये असते.

ऑफिस सुटल्यानंतर अभिजीत घरी येतो.

अभिजीत, "मला तर काहीच खरं दिसत नाहीये. आजसुध्दा स्टि ऑफिसमध्ये आला नव्हता. शंभर टक्के तो आपल्या रुपाबरोबरच होता."

गौरी, "तुम्हाला कसं माहित?"

अभिजीत, "ती आजसुध्दा कॉलेजला गेली नव्हती. आणि तुला किती फोन ट्राय करत होतो. रिसिव्ह का करत नव्हतीस? अगोदरच रुपाचं टेंशन आणि त्यात तू फोन उचलत नव्हतीस...." बोलता बोलता तो टाय काढत असतो. गौरी त्याला मध्येच अडवते.

गौरी, "अहो."

अभिजीत तिच्याकडे बघून, "काय?"

"आय लव्ह यू." एवढंच बोलून डोळ्यातलं पाणी लपवत ती त्याच्या मिठीत जाते. ती त्याला एकदम घट्ट पकडते. सुरुवातीला त्याला काही कळत नाही, पण मिठीत आल्यावर कळतं, हिच्या मनात खूप दुःख आहे. ते कमी करण्यासाठी तिने मला मिठीत घेतलं आहे. तिच्या घट्ट पकडण्याने तो देखील तिला घट्ट पकडतो आणि म्हणतो, "लव्ह यू टू माय वन अॅन्ड ओन्ली हार्ट. काय झालं?"

गौरी, "काही नाही. तुमच्या मिठीत यावंसं वाटलं."

अभिजीत, "वेडी. काय झालं सांग ना! काहीतरी झालंय."

मग ती जरा बाजूला होते. "सॉरी. जा तुम्ही, फ्रेश व्हा. आज माझा मुड नाहीये."

अभिजीत, "काय झालं तुला?"

गौरी, "तुम्ही फ्रेश व्हा ना! मला थोडं वेळ एकटं रहायचंय."

एवढं बोलून बेडवर बसून ती आपले डोळे बंद करते आणि भुतकाळात शिरते. वृषालीने तिच्या आणि अभिजीतच्या मैत्रीला अनुसरुन जे शब्द वापरले असतात त्या शब्दांनी ती खूप दूःखी झालेली असते. त्या दिवशी घरी जाऊन आपल्या खोलीचा दरवाजा बंद करुन बिछान्यावर पडून ती बराच वेळ रडते. मग पुढचे दोन-चार दिवस ती कुणाशी काहीही बोलत नाही. तरीही 'अभिजीत आता व्यवस्थित असेल ना!' ही काळजी तिला असते. दोन दिवसांनंतर संध्याकाळी ती मंदिरात सहजच जाते. हात जोडून देवाचं नामस्मरण करते मग देवाकडे प्रार्थना करत म्हणते, 'देवा, मी कुणाचंही कधीही काही वाईट केलं नाही. मग आज माझ्यावर आणि माझ्या मित्रांवर अशी वेळ का आली? मी तुला प्रश्न विचारत नाही. फक्त या संकटातून बाहेर निघण्यासाठी मला योग्य मार्ग दाखव.' डोळे उघडून थोडावेळ देवाकडे पाहते. मागे वळताच तिला तिच्या लहानपणीची मैत्रिण योगिता भेटते.

योगिता, "गौरी ना!"

गौरी, "योगिता का?"

योगिता, "बरोबर ओळखलंस."

गौरी, "माय गॉड. किती दिवसांनी दिसलीस! तुझ्या लग्नानंतर आता बघतेय मी तुला."

योगिता, "अगं आईकडे आले होते. मग विचार केला, चला मंदिरात जाऊन येऊ. ओळखीचं कोण ना कोण नक्कीच भेटेल. आणि बघ ना! तू भेटलीस"

गौरी, "तुला आठवतं का? आपण सगळîा मैत्रिणी प्रत्येक गुरुवारी इथे यायचो."

योगिता, "हो. आठवतं तूला ते?"

गौरी, "मग काय? तूला नाही आठवत?"

योगिता, "आठवतं ना! इथेच काय बोलत बसलोय आपण? चल माझ्या घरी. तुला लग्नाचे फोटो दाखवते."

दोघी मंदिरातून योगिताच्या घरी जातात. गौरीच्या चेहऱ्यावरचं खोटं हसू योगिताने मंदिरातच ओळखलं असतं. नक्की काय झालं हे विचारण्यासाठी ती गौरीला तिच्या घरी घेऊन जाते. घरी गेल्यावर ती गौरीला तिच्या बेडरुममध्ये नेते. दरवाजा बंद करुन ती गौरीला बोलते,

योगिता, "बोल."

गौरी, "काय बोलू? लग्नाचे फोटो दाखवणार होतीस."

योगिता, "लग्नाचे फोटो तू मागच्या वेळीच बघितले होतेस. तुला काय झालंय ते सांग मला."

गौरी, "मला काय झालंय?"

योगिता, "लहानपनाची मैत्रिण आहे तुझी. आता मला शिकवू नकोस. खरंच मला मैत्रीण मानत असशील तर सांग."

गौरी, "काही नाही गं. थोडंसं टेन्शन होतं."

योगिता, "तुमच्या ग्रुपबद्दल पेपरात वाचत असते मी. मागच्या महिन्यात काय झालंय हे माहितीये मला."

गौरी, "अगं तसं काही नाहीये."

योगिता, "मग कसं आहे?"

मग ती योगिताला श्रीगणेश कलामंचच्या सुरुवातीपासून बदमाश ग्रुपच्या शेवटपर्यंत सगळं सांगते. प्रसादचा झालेला अपमान, त्यानंतर एक एक करुन प्रत्येकाच्या नोकरीवर आलेली समस्या, गणेशोत्सवातील भजन, मग अभिजीतला गाणं गाण्यासाठी केलेला आग्रह, बदमाश ग्रुपची वाटचाल, अभिजीत, अशोक, शरद यांची यशस्वी वाटचाल, प्रसाद, अजय आणि तिने सांभाळलेली 'बदमाश फ्रेंडस् एज्युकेशनल ट्रस्ट', मग सुवर्णाचं आगमन, तिचा भुतकाळ, मग अभिजीत-सुवर्णा यांचं फुलत जाणारं प्रेम, सुवर्णाच्या घरच्यांचा आणि ग्रुपचा त्यांच्या प्रेमाला होणारा विरोध, सुवर्णाची आत्महत्या आणि अभिजीतच्या मनावर झालेला मानसिक परिणाम.

गौरी, "तुच सांग ना! त्याने मित्रांसाठी आपलं करियर सोडलं. मित्रांसाठी घरच्यांच्या विरोधात गेला आणि जेव्हा त्याला मदतीची गरज होती तेव्हा एकही मित्र त्याच्याबरोबर नाही. मी त्याला मदत करायला गेली तर सगळ्यांचं असं म्हणनं आहे की माझ्यात आणि त्याच्यात काही चाललंय. इतकी वाईट असते का मैत्री?"

योगिताने मानसशास्त्रामध्ये पी.एच्.डी. केली होती. गौरीच्या मनात होणारी चलबिचल ती समजू शकत होती. ती गौरीला थोडावेळ शांत बसायला सांगते. किचनमधून ती दोघींसाठी कॉफी घेऊन येते. कॉफी पिऊन झाल्यानंतर गौरीचा पडलेला चेहरा पाहून ती गौरीला समजावते,

योगिता, "तुला एक सल्ला देऊ?"

गौरी, "कोणता?"

योगिता, "अभिजीतसोबत लग्न करशील?"

गौरीच्या मनात भुकंप येतो.

गौरी, "काय? अभिजीतबरोबर लग्न? वेडी झालीस का?"

योगिता, "माझं पुर्णपणे ऐकून तर घे. मग तुला काय बोलायचं ते बोल. अभिजीतच्या आयुष्यात जे काही झालं त्या सर्व गोष्टी तुझ्यापेक्षा जास्त कुणालाही माहित नाही. तू त्याला समजून घेऊ शकतेस. आणि जसं तू म्हणालीस, तो जीव ओतून सुवर्णावर प्रेम करायचा. एकदा लग्न कर त्याच्याशी. तो तुझ्यावर देखील तेवढंच प्रेम करेल. कदाचित तिच्यापेक्षाही जास्त."

गौरी, "अगं पण ते कसं शक्य आहे? आम्ही दोघं जस्ट फ्रेंडस् आहोत."

योगिता, "जस्ट फ्रेंडस् की बेस्ट फ्रेंडस्? दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत."

गौरी, "बेस्ट फ्रेंडस्."

योगिता, "बेस्ट फ्रेंडस् की मोअर दॅन फ्रेंडस्."

गौरी, "अती होतंय तुझं. चल बाय."

योगिता, "हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये."

गौरी, "आम्ही फक्त एकमेकांचे क्लोज फ्रेंडस् आहोत."

योगिता, "मग काय प्रॉब्लेम आहे त्याच्याशी लग्न करायला?"

गौरी, "लग्न करायला दोघांमध्ये प्रेम असावं लागतं. तो सुवर्णावर प्रेम करतो आणि माझं त्याच्यावर प्रेम नाही."

योगिता, "सुवर्णा आता या जगात नाहीये. आणि मी सांगू शकते तू त्याच्यावर प्रेम करतेस. मैत्रीच्या नात्याने का होईना, पण तू त्याच्यावर प्रेम करतेस."

गौरी, "तू वेडी झाली आहेस. पी.एच्.डी.चा अभ्यास करुन तू पूर्णपणे वेडी झाली आहेस."

योगिता, "मी सिध्द करुन दाखवलं तर?"

गौरी, "कर सिध्द. माझ्या मनात तसं काहीच नाही."

योगिता, "बरोबर बोलतेस. तुझ्या मनात काही नाही. प्रेमाचा संबंध असतो फक्त मनाशी. शरीराचा काय संबंध? असं ठाम मत आहे ना तुझं? मग ते जरा बदल. प्यार दिल-दिमागसे नंतर होतो. आधी होतो शरीरातील बदलणाऱ्या काही हार्मोन्समुळे. आयुष्यात आपण प्रेमात पडण्याचा अनुभव कधी ना कधी तरी घेतोच. शाळेत, कॉलेजमध्ये असताना, बसस्टॉपवर, कॅफेत, मॉलमध्ये, ऑफिसात, ऑन द जॉब कुठेही, अगदी मैत्रीत सुध्दा. फक्त आपलं मन ते मानायला तयार होत नाही. कुठे ना कुठेतरी त्याची आणि तिची नजरानजर होते. एक क्षण नजरेला नजर भिडते आणि काळजात खोलवर काहीतरी होतं, पोटात गोळा येतो, छाती धडधडायला लागते. तुला समजण्यासारख्या भाषेत बोलायचं झालं तर, आपल्याला त्याच्याशिवाय काहीच दिसत नाही. आपल्याला वाटतं, तो दिसायला खूप छान आहे, बोलतो मस्त, माझी किती काळजी घेतो किंवा अशी अगणित कारणं आपण स्वतःला देत असतो. पण प्रेमात पडण्यामागे आपल्या मनाइतकाच आपल्या शरीरातल्या रसायनांचा हात असतो, असं जर मी तूला सांगितलं तर तू माझ्यावर विश्वास ठेवशील?"

गौरी नकारार्थी मान हलावते.

योगिता, "कारण आत्तापर्यंत तूला असंच वाटलं असेल की, प्रेमाचा मनाशी आणि भावनांशी संबंध असतो. पण मन आणि मनातल्या भावनांचा प्रेमाशी संबंध येण्याआधी जागं होतं आपलं नाक, आपले डोळे आणि आपली त्वचा. खरंतर आपली पंचेंद्रिय हेच मूळ कारण असतं आपण प्रेमात पडतो त्यामागे. डॉ.हेलन फिशर प्रेमशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या एक महत्वाच्या व्यक्ती. तर डॉ.हेलन यांच्या संशोधनानुसार प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा म्हणून स्वतःचा एक गंध असतो. आपण बाहेरुन कितीही स्प्रे मारले तरी आपल्या शरीराला येणारा मुलभूत व विशिष्ट गंध जात नाही. तर आपल्या शरीराचा हा गंध समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करतअसतो. एका व्यक्तीच्या शरीराचा गंध दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरापर्यंत पोचल्यानंतर मेंदूमध्ये काही रसायनं उद्यपित होतात आणि आपल्याला वाटतं मनाच्या कॅमेऱ्यात क्लिक झालं. जे काम नाक करतं तशीच काही कामं आपले डोळे आणि त्वचाही करत असते. नजरेतून आणि स्पर्शातून अगणित अशा गोष्टी आपल्यापर्यंत पोचतात ज्या कधीच कुणी शब्दांत मांडू शकत नाही. अनेकदा जवळच्या मित्रमैत्रिणीला आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे माहीत असतं. त्या दोघांपैकी कुणीही त्याबद्दल बोललं नाही तरीही हे कसं घडतं? तर, आपण बोलत नसलो तरी आपले डोळे बोलत असतात. आपल्या शरीराचा गंध आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीपर्यंत योग्य ते संदेश पोचवत असतो आणि स्पर्शातून प्रेमाची भावना अधिक स्पष्ट होत जाते. त्यामुळे अनेकदा शब्द नसले तरीही त्याला कळतं तिला काय म्हणायचं आहे ते.प्रेमशास्त्रानुसार प्रेमात पडण्याचे प्रमुख तीन टप्पे असतात. आणि या तीनही टप्प्यांमध्ये आपल्या शरीरातील निरनिराळे हार्मोन्स काम करत असतात.

पहिला टप्पा म्हणजेच लस्ट आकर्षण, तू या गोष्टीला शारीरिक आकर्षण सुध्दा म्हणू शकतेस. यामध्ये आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल विलक्षण शारीरिक आकर्षण वाटतं. त्या व्यक्तीचं दिसणं, चालणं, शरीराची ठेवण, आवाज  या  साऱ्या गोष्टींकडे आपण आकर्षित झालेलो असतो. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात अशा भावना निर्माण होतात त्यावेळी आपल्या शरीरातील ओस्टोजिन आणि टेस्टोस्टेरोन यासारखे हार्मोन्स जागृत होतात. तुला असं कुणाच्या बाबतीत झालंय?"

गौरी, "अभिजीत दांडकेकर."

योगिता, "कोण? तो हिरो?"

गौरी, "हो."

योगिता, "वेडी आहेस."

गौरी, "तेच म्हणाली ना मी. तुझ्या बोलण्यानुसार बघितलं तर मी त्याच्यावर प्रेम करते."

योगिता, "माझं बोलनं अजून संपलं नाही, तर दुसरा टप्पा आहे तीव्र आकर्षणाचा आणि ओढीचा. दुसरा टप्पा त्याच व्यक्तीसंदर्भात जर निर्माण झाला तर याचा अर्थ तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल जे काही वाटतंय ते फक्त लस्ट नाहीये, तर तुमच्या मनात प्रेमाची पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे. हा प्रेमात पडण्याचा काळ असतो. तहान-भूक हरवते ती त्या व्यक्तीच्या विचारांनी नाही, तर त्यामुळे शरीरातल्या रसायनांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे. झोप येईनाशी होते. सतत त्याच व्यक्तीचे विचार मनात घोळायला लागतात. आपण त्या व्यक्तीच्या निकट आहोत, असं दिवास्वप्न बघण्याचा हाच काळ असतो. नोरपिनेफ्रिन नावाचं हार्मोन या काळात आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत असतं."

गौरी दोन्ही डोळे बंद करुन भुवया उंचावत मान हलावते.

योगिता, "तिसरा टप्पा आहे भावनिक गुंतवणूक. प्रेमात पडून एकत्र येण्याच्या आणाभाका तोवर झालेल्या असतात. आपल्या मनाची पुरेपूर खात्री पटलेली असते की, हीच ती व्यक्ती ज्याच्या शोधात आपण होतो. त्यामुळे आपल्या शरीरातील रसायनांबरोबरच आपलं मनही कामाला लागतं. आपल्या लाडक्या व्यक्तीच्या बाबतीत आपण हळवे होतो. त्याच्या सुरक्षेची काळजी वाहायला लागतो. आपली मनं एकमेकांत गंुततात. एकदा भावनिक गुंतागुंत झाली की, मग त्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटायला लागतो. सुख-दुःखात ती व्यक्ती जवळ असली पाहिजे, असंही वाटायला लागतं आणि माणसं लग्नाच्या बंधनात स्वतःला ओढवून घेतात. त्यांच्यामध्ये कुटूंब सुरु करण्याच्या भावना तीव्र व्हायला लागतात." आता मात्र गौरी विचार करायला लागते.

योगिता, "विचार कसला करतेस? अगं तुलाच माहित नव्हतं की तू प्रेमात आहेस."

गौरी, "पण हे मला कसं नाही कळलं."

योगिता, "सगळ्याच गोष्टी आपल्याला लगेच कशा कळणार? तूला त्याची जी काळजी आहे त्यातूनच हे प्रेम फूलतंय. खरं सांग, गेल्या दोन दिवसांत तुझ्या मनात त्याच्याविषयी कोणते विचार येत होते?"

गौरी, "हेच की, तो व्यवस्थित असेल ना! त्याने जेवण केलं असेल ना! तो वेळेवर झोपला असेल ना! तो जास्त प्यायला नाही पाहिजे. तो स्वतःचं काही वाईट तर करुन घेणार नाही ना! मला तिथेच त्याच्याजवळ असायला हवं होतं वगैरे."

योगिता, "आता हेच शब्द मी बोलते मग तू सांग मी प्रेमात आहे की नाही? बोल, काय म्हणतेस?"

गौरीला आपण प्रेमात असल्याचा आनंद होतो आणि ती स्वतःशीच हसते. योगिताकडे बघून होकारार्थी मान हलवते उठून आनंदाने उडी मारणार इतक्यात, "नाही योगिता, मी त्याच्याशी लग्न नाही करु शकत. त्याचे आणि सुवर्णाचे शारीरिक संबंध झाले होते. तिच्या पोटात त्याचं मुल होतं. मी कशी त्याच्यासोबत लग्न करणार? माझ्या घरचे काय म्हणतील?"

योगिता खुर्चीवरुन उठते आणि पलंगावर गौरीच्या बाजूला जाऊन बसते. तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, "त्याचं तिच्याशी शरीरसंबंध झाला याचं वाईट का वाटून घेतेस? घरचे विरोध करतील म्हणून तू तुझं प्रेम असं अर्ध्यावर सोडशील का? इकडे बघ मी काय म्हणते, अनैतिकपणे उपभोगलेल्या आणि उपभोगातून झालेल्या शरीरावर आधाराच्या रुपाने नव्याने कपडे चढवले की माणूस पुन्हा एकदा नैतिकतेच्या वाटेवर चालायला सज्ज होतो."

गौरी, "काय म्हणलीस? परत बोल."

योगिता, "वेडी, अनैतिकपणे उपभोगलेल्या आणि उपभोगातून झालेल्या शरीरावर म्हणजे अभिजीतच्या शरीरावर आधाराच्या रुपाने नव्याने कपडे चढवले म्हणजे तू त्याच्या आयुष्यात गेलीस की तो पुन्हा एकदा नैतिकतेच्या वाटेवर चालायला सज्ज होईल. लक्षात ठेव, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एखादी स्त्री असते. त्याच्या प्रत्येक यशामागे तुच असशील. विचार कर, लग्न करुन तू त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळण देशील. माझा हा सल्ला तुला जरा विचित्र वाटेल. पण मैत्रीच्या नात्याने तू त्याची मदत करायला गेलीस तर समाज त्याला तर नाव ठेवेलच. पण तुलादेखील नाव ठेवेल. मैत्री काय असते हे अजूनही आपल्या समाजाला समजलेलं नाही. आज फक्त तूच एक आहेस जी त्याला पूर्णपणे ओळखतेस. त्याला पुन्हा एकदा जगण्यासाठी प्रेरणा देऊ शकतेस. मैत्री आणि प्रेम दोन्ही भूमिका पार पाडू शकतेस."

गौरी योगिताच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि तिला अलिंगन देते.

गौरी, "बरं झालं तू भेटलीस. मी माझं प्रेम नाही गमावणार. मी त्याला परत पहिल्यासारखं करण्याचा प्रयत्न करेन. मी त्याच्याशी लग्न करेन. आजच्या आज. थॅंक्स योगिता." एवढं बोलून गौरी निघू लागते.

योगिता, "अगं कुठे चाललीस?"

गौरी, "आताच कळलंय मी प्रेमात आहे. एकदा तरी त्याला भेटू दे. तीन दिवस झाले त्याला भेटले नाही."

चेहरा फूलवत गौरी निघून जाते. तिलाच माहित नसतं की तिला किती आनंद झाला आहे. म्हणूनच रस्त्याने सगळे लोक तिच्याकडे बघत असतात आणि ती डोळ्यात आनंदाश्रू ओठांवर हसू घेऊन धावत असते. अभिजीतने मागे बोललेले शब्द तिला आठवतात, 'मैत्री फक्त बोलण्याने केली जात नाही. त्यासाठी त्यागाची तयारीसुध्दा असावी लागते. गौरी, जसं प्रेमाचं असतं तसंच मैत्रीचं सुध्दा असतं. एक ना एक फक्त दिवस मैत्रीसाठी नियती आपली परिक्षा घेते. तेव्हा तू विचार कर, मला शक्य आहे मदत करनं. मी त्याला मदत करु शकते. पण लोक काय बोलतील, या पेक्षा मी त्यावेळी मदत नाही केली तर मैत्रीचं नातं काय म्हणेल हा विचार कर.' अभिजीतच्या घरी पोहोचल्यावर ती समजून जाते, त्याच्या घरातील सर्वजण त्याला एकटं सोडून कायमचे दूर निघून गेलेले असतात. शेजारची माणसं म्हणतात,

'कोण सांभाळणार आता या मुलाला? चांगला तर होता.'

ती स्वतःचे डोळे पूसते आणि घरात प्रवेश करते. दारात पाय ठेवल्या ठेवल्या तिला दारुचा वास येतो. घरभर दारुच्या बाटल्या पडलेल्या असतात. आणि तो समोरच्या सोफ्यावर बाटली घेऊन झोपलेला असतो. ती हळूच त्याच्याजवळ जाते. मद्यपान आणि तो वास तिला आजिबात सहन होत नसतो. मात्र आताची गोष्ट वेगळीच असते. तिच्या डोळ्यासमोर फक्त अभिजीत असतो. ती त्याच्या जवळ जाते त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहते. झोपेतच त्याच्या हातातली बाटली त्याच्या हातून खाली पडते आणि तो जागा होतो.

अभिजीत, "अगं... तू कधी आलीस?"

गौरी, "आताच."

अभिजीत, "सॉरी. जरा डोकं दुःखत होतं."

गौरी, "एक विचारु? नाही नाही ना म्हणणार!"

अभिजीत, "तू बोल फक्त. माझ्याकडून 'हा' समज."

गौरी, "मला तुझ्याशी लग्न करायचंय."

अभिजीत, "मी जास्त प्यायला नव्हतं पाहिजे. भलतंच काहीतरी ऐकायला येतंय मला."

गौरीला राग येतो. ती अभिजीतची कॉलर पकडते आणि त्याला ओरडून म्हणते, "मला तुझ्याशी लग्न करायचंय आणि माझा निर्णय झाला आहे. तू सुध्दा तयार व्हायचंयस आणि लोक काय म्हणतील हे मला माहित नाही. मला तू महत्त्वाचा आहेस आणि तू जर स्वतःचं काही करुन घेतलंस तर मी सुध्दा स्वतःचं काहीही करेन आणि तू नाही म्हणालास तरी मी स्वतःचं काही करुन घेईन. मग कधी करतोस लग्न?"

अभिजीत, "तू बोलशील तेव्हा."

गौरी दचकते.

गौरी, "इतक्या लवकर कसा तयार झाला?"

अभिजीत होकारार्थी मान डोलावतो. त्याला खऱ्या अर्थाने आधाराची गरज आहे हे त्याला जाणवलं होतं. गौरीवर त्याला पूर्ण विश्वास होता म्हणून विचार न करता तो तत्काळ तिला होकार देतो.

गौरी, "खरंच लग्न करणार ना!"

अभिजीत होकारार्थी मान हलवतो. गौरी त्याच्या मिठीत शिरते. तिला नाही आवडत म्हणून त्या दिवशीच अभिजीत मद्यपान करनं सोडून देतो. गौरी तिच्या घरी जाते. अभिजीत अंगावर डोक्यावरुन पाणी घेतो. नंतर तो मंदिरात जातो. दरम्यान गौरीचा फोन आलेला असतो. योगिताबरोबर ती देखील त्याच मंदिरात आलेली असते. रात्रीची वेळ असल्याने मंदिरात भजन चालू असतं.

योगिता त्या दोघांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देते. सोबतच ती गौरीला म्हणते, "बघीतलंस तुझ्या प्रेमात किती ताकद आहे ते? तुझ्या बोलण्याने त्याने दारु सोडली. असंच प्रेम कर त्याच्यावर. बघ एक दिवस नक्कीच तू सुवर्णाची जागा घेशील."

गौरी होकारार्थी मान हलवते. मग दोघीही अभिजीतकडे बघतात. तो भजन ऐकण्यात गुंग झालेला असतो. गौरी मुद्दाम त्याच्या जवळ जाते.

गौरी, "कसला विचार करतोस?"

अभिजीत, "मला एकदा भजन करायचंय. वेगळ्या दिशेची सुरुवात भजनानेच झाली होती. आता शेवटसुध्दा भजनानेच करेन. तुझी इच्छा असेल तर"

गौरी होकारार्थी मान हलवते. अभिजीत भजन करणाऱ्या मंडळींकडे बघतो. त्या सर्वांची इच्छा असते, अभिजीतने स्वतः तिथे येऊन भजन करावं आणि तसंच होतं. तो भजनामध्ये मनसोक्त शेवटचं गातो.

अभिजीत गौरीला हलवतो आणि गौरी एकदम शुध्दीवर येते.

अभिजीत, "काय झालंय तुला? आल्यापासून बघतोय. कसला विचार करतेस?"

गौरीच्या डोळ्यात पाणी येतं. अभिजीत तिच्या बाजूला बसतो. ती त्याच्या कुशीत शिरते. तो तिच्या केसांमधून हात फिरवतो. मग विचारतो, 'काय झालं?'

गौरी, "काही नाही."

अभिजीत, "आपलं आयुष्य पुढे जात असतं. दिवस पुढे सरकत असतात. त्यासोबत आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येत असतात. त्यातील काहींना आपण मुद्दाम लक्षात ठेवतो. काही विसरुन जातात तर काही मनाच्या कोपऱ्यात कायम जतन केलेले असतात. आपल्याला हवे असेल वा नसेल तरी... मग एकांतात आपण त्यांपैकी कोणाच्यातरी आठवणीत हरवलेले असतो तेव्हा अचानक एखाद्या आठवणीने आपण नकळत स्वतःशीच हसून जातो किंवा रडतो आणि आपल्याला असं हसताना आणि रडताना बघून कोणीतरी विचारतं, 'काय झालं?' आणि आपण पटकन उत्तर देतो, काही नाही."

गौरी स्वतःशीच हसते आणि परत म्हणते, "काही नाही झालं."

अभिजीत, "मीसुध्दा तेच म्हणालो ना! काही नाही झालं."

गौरी, "जा ना! मला त्रास होतो. शांतपणे तुमच्या कुशीत झोपू द्या. बरं वाटतं."

तो जरा तिच्याजवळ सरकतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून दोघेही झोपी जातात. त्या दिवसानंतर रुपाली आणि स्टिफन त्या दोघांची खूप काळजी घेऊ लागतात. इथेच होतो या संपूर्ण गोष्टीचा शेवट. दिल्लीमध्ये अजय आणि नम्रता एकमेकांसोबत खूश असतात. महाराष्ट्रात प्रसाद त्याची पत्नी मिनाक्षी, बहिण काजल आणि मुलगी अनामिकासोबत खूश असतो. अजय आणि अशोक यांची जगावेगळी मैत्री तशीच नाबाद राहते. सागर वेगवेगळे सेमिनार करत राहतो आणि वृषाली त्याला प्रत्येक सेमिनारच्या वेळी मदत करते. टास्मानियामध्ये अभिजीत आणि गौरी आता एकमेकांवर खरोखरच प्रेम करु लागले होते. रुपाली अभ्यासात व्यवस्थित लक्ष देत होती. स्टिफन त्याच्या मित्रासोबत खूश होता. मित्राच्या चेहऱ्यावरील एका हास्यासाठी ज्याने देश पादाक्रांत केला होता त्या मित्राला आनंदी बघून तो समाधानी असतो.

मैत्र जीवांचे

अभिषेक ठमके
Chapters
अर्पण पत्रिका मनोगत मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’ प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात प्रकरण २ : विरहातील पहिला भाग प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग प्रकरण ५: एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने प्रकरण ७: अंधूक आशा प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी प्रकरण १०: थरारक पार्श्वभूमी प्रकरण ११: पुन्हा एकत्र येण्याचं वचन प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात प्रकरण १३: विवाहाचं रहस्य प्रकरण १४: वडीलांचा आधार प्रकरण १५: देशप्रेम प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात