Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण २ : विरहातील पहिला भाग

ऑस्ट्रेलिया (टास्मानिया): ऑस्ट्रेलियाचा दिवस सकाळी सहापासूनच सुरु होतो. आठ-नऊपर्यंत कार्यालयं सुरु झालेली असतात. ऑफिस संपेपर्यंत काम आणि फक्त कामच सुरु असतं. व्यावसायिकता तर इथल्या लोकांच्या रोमारोमांत भरलेली आहे. खायचं, प्यायचं आणि झोपायचं हे जणू काही कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहूनच घेतलेलं असतं, नाहीतर ते एखाद्या कंपनीचं धोरण असू शकतं. ऑस्ट्रेलियामध्ये लंच टाईममध्ये बहूतांश लोक जॉगींगला जातात. कानाला इयरफोन लावून भर दुपारी धावायचं. तसं पहायला गेलं तर तो भाग विषुववृत्तापासून थोडा दूर असल्याने आपली सकाळ आणि त्यांची दुपार, वातावरण सारखंच असतं.

झोकून द्यायची वृत्ती, चिकाटी आणि मेहनतीने काम करण्याकडे लोकांचा कटाक्ष असतो. पण पाच दिवसांचा आठवडा संपल्यानंतरचे दोन दिवस संपूर्णपणे स्वतःसाठीच असतात. ऑफिस असा शब्द उच्चारणंही महापाप समजलं जातं. शनिवारी-रविवारी तर रस्त्यांवर चिटपाखरुही नसतं. सगळेजण आपापल्या गाड्या काढून भटकंतीला गेलेले असतात. शुक्रवार आणि शनिवारची रात्र म्हणजे रस्त्यांवर सळसळत्या तरुणाईचा जल्लोष. पब, नाइट क्लब, डिस्को या ठिकाणी मुलं अड्डे जमवतात. पहाटेपर्यंत हा जोश आणि जल्लोष सुरुच असतो. सुसाट वेगाने जाणाऱ्या गाड्यांमधून मुला-मुलींवर शेरेबाजी करणं, शिट्टी मारणं असतंच. 'wanna ride?' हा प्रश्न मुलंच नाही, तर मुलीदेखील विचारतात. आपल्याकडे अशा प्रकारांना छेडछाडीचं लेबल सहजच लावता येईल, पण तिथली तरुणाई अशा प्रकारे तारुण्य जगत असते. या सर्वांना उजवा ठरुन आपली वेगळीच छाप पाडलेला अभिजीत असतो.

गुगलच्या ऑस्ट्रेलिया येथील डेव्हलपमेंट आणि अॅडव्हरर्टायझिंग विभागामध्ये खूप वेगाने काम चाललेलं असतं. जो तो आप-आपल्या कॉम्पुटरसोबत एकरुप झालेला असतो. सगळयांच्या डोळ्यांना चश्मे असतात. इंक जेट प्रिंटरचा आवाज, सतत वाजणाऱ्या फोनचा आवाज, तिथे असलेली सुपरवायझर लिझा फ्रेड्रिकचा आवाज, शिस्तबद्ध आणि काटेकोर वातावरणात काम चालू असतं. अभिजीत आणि कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर वेगातच चालत कॅबिनमध्ये शिरतात. कॅबिनमध्ये जाता जाता अभिजीत लिझाला म्हणतो, "Within half an hour, I want list of all newly joined engineers."

लिझा मान हलवत त्याला 'हो' म्हणते. मिलिटरी हेअर कट केलेला अभिजीत त्याच्या पांढराशुभ्र शर्ट आणि हाफ ब्लेझर, त्याने लावलेली लाल टाय, इम्पॉर्टेड मोबाईल, ब्लुटूथ इयरफोन, जाड भिंगाचा चश्मा, आकाराने मोठं आणि जरा महागडं घड्याळ, आणि सतत विचारात हरवलेल्या गंभीर व्यक्तीप्रमाणे तो दिसत होता. तो नुसता तसा दिसत नव्हता; वागत, बोलत, आणि चालत सुध्दा तसाच होता. चेहऱ्यावर कामाचा ताण सतत जाणवत होता. त्याच्या तब्येतीमध्ये चांगलीच सुधारणा झालेली होती. त्याला जाडं म्हणायला हरकत नव्हती. त्याने ठेवलेल्या कट् मिशीमुळे तो आणखीनच रुबाबदार दिसत होता. शरदच्या भाषेत अभिजीत 'कडक' दिसत होता. पण, त्याच्या चेहऱ्यावरचं हसणं. तीच तर त्याची ओळख होती. ती ओळख दिसत नव्हती, सतत इतरांना हसवणारा अभिजीत आणि आत्ताचा अभिजीत, म्हणायला गेलं तर एकमेकांच्या विरुध्द असणाऱ्या व्यक्तीच होत.

लिझा, "Sir, your list."

अभिजीत, What the hell, you don't have that much manners that u should knock the door before entering… now I have to teach you all of this things or what?

"काय मुर्खपणा आहे, कॉमन्सेन्स नावाच्या गोष्टी तुला आता मी शिकवाव्या लागतील का? दरवाजा फक्त नावापुरता बसवलाय का? नॉक करुन आत यायला काही त्रास होतो का तुला?"

"I'm extremely sorry sir."

अभिजीत तिचं बोलणं टाळतो, Immediately go and give me a list of newly joined Graphic Designers and Programmers. Also send a copy of Fax which is received by Facebook Head Office.

"जा, मागच्या महिन्यात आलेल्या नवीन ग्राफिक डिझाईनर्स आणि प्रोग्रामर्सची लिस्ट आण आणि फेसबूकच्या हेड ऑफिसमधून फॅक्स आलाय, तो लगेच पाठव कुणाकडे तरी "Yes sir" एवढं बोलून लिझा बाहेर जाते आणि शॉनला फॅक्स आणायला सांगते. सोबत हे सुध्दा सांगते की, Sir is already angry, please knock the door before entering in the room. You are new joined, It will take some time to know him. He is a rude, I don't know when he has smiled the last time. "नेहमीप्रमाणे सर चिडलेले आहेत. नॉक करुनच आत जा. नवीन आहेस, सरांना समजायला जरा वेळ जाईल. एक नंबरचा खडून माणुस आहे तो. शेवटी कधी हसला असेल हे देवच जाणे." शॉन निघतो.

संध्याकाळी ५:३० वाजता अभिजीत त्याच्या कॅबिनमधून बाहेन निघतो तेव्हा त्याच्या ऑफिसमधील असिस्टंट डिझाईनर क्रेस्टा विल्सन तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याला आदरपुर्वक निमंत्रण देते. अभिजीतसोबत नेहमी असणारा स्टिफन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. अभिजीत दुर्लक्ष करुन तिथून निघून जातो. सगळा स्टाफ ऑफिसमध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेला असतो आणि त्यांचे सर रागारागाने निघून जातात. आता वाढदिवस साजरा करायचा की नाही, असा प्रश्न चेहऱ्यावर ठेवून ते सगळे एकमेकांकडे पाहतात.

अभिजीत त्याच्या रुबाबदार चालीत बाहेर येतो. सगळे त्याच्याकडे आदराने पाहत असत. भारतीय असुन देखील त्याने तेथील स्थानिक सहकार्यांना कधीही कसलीही तक्रार करु दिली नाही. तसेच आपल्या कामातील कौशल्याने त्याने बऱ्यापैकी नाव कमावलं होतं.

ऑफिसच्या बाहेर गाडीत बसल्यावर अभिजीत फोनवर,

अभिजीत, "निघालीस का?"

गौरी, "नाही ना...! अजून खूप मोठी रांग आहे. तुम्ही येता का?"

"यु-ट्यूबने नवीन व्हिडीयो फॉरमॅट तयार केलाय, त्याच्या प्रेझेन्टेशनला चाललोय. पंधरा मिनिटांत संपेल ते. मग येतो मी. ओके."

"नक्की याल ना मला घ्यायला?"

"हो....!"

"प्रॉमिस...?"

"प्रॉमिस..."

"एक बोलू...?"

"हं...."

"लव यू."

"लव यू टू."

गाडी चालवत असलेला ड्रायव्हर टॉम विचारात पडतो, 'कुठलंही काम असेल तर नेहमी हा जाड्या भडकलेलाच असतो, आणि त्याच्या पत्नीशी जगावेगळाच, हा काय आहे ते परमेश्वरालाच ठाऊक.'

अभिजीत आणि स्टिफन यु-ट्यूबच्या नवीन व्हिडीओ फॉरमॅटचं प्रेझेंटेंशन पाहतात. यामध्ये व्ही.जी.ए.मोबाईलवर काढलेली व्हिडीओ आपल्याला यु-ट्यूबवर एच.डी.मध्ये स्पष्ट करता येईल. प्रेझेंटेंशन खूप जबरदस्त होतं. गुगल हे जाहिरातीचं उत्तम साधन असल्यानं त्यांना त्यांच्या या नवीन टेक्नॉलॉजीची गुगलवरुन जाहिरात करायची होती, म्हणून त्यांनी ही मिटींग ठेवलेली असते. यु-ट्यूब ही संलग्न संस्था असूनदेखील गुगलसाठी ही खूप मोठी डिल असते याचसाठी स्टिफन आणि अभिजीत त्या मिटिंगमध्ये निर्णय घेण्यासाठी बसतात. रात्री साडेआठ वाजता त्यांची मिटींग संपते आणि सगळे डिनरसाठी निघतात तेव्हा अभिजीत 'आज घरी यायला उशीरा होईल', हे सांगण्यासाठी रुपालीला फोन करतो.

अभिजीत, "रुपाली, आज मला घरी यायला उशीर होईल. तर तू आणि गौरी जेवून घ्या. मी बाहेरुन जेवून येतोय."

"पण ताई तर घरी आलीच नाही."

"काय? घरी नाही आली?"

"ताई म्हणाली, ती तुमच्यासोबत घरी येईल. जास्त वेळ झाला तर जेवून घे असं म्हणाली होती. तुम्ही दोघे सोबत नाही आहात का? ताईचा नंबर पण बंद आहे." अभिजीतला लगेच संध्याकाळचं प्रॉमिस आठवतं. तो फोन ठेवत म्हणतो, "हा, तू जेवून घे, आम्ही येतोच थोड्या वेळात घरी." आणि अभिजीत फोन ठेवून सर्वांना घाईतच पुन्हा भेटू म्हणत निघतो. जाताना स्टिफनला सांभाळून घे असं सांगतो.

टॉमला सर्व प्रकार माहित असल्याने तो सुध्दा घाईतच गाडी काढतो आणि अभिजीतला विचारतो, "Sir, Watson Street Mall?"

अभिजीत, "Why you asking me? Let's go…"

अर्ध्या तासात अभिजीत वॉटसन स्ट्रीट मॉलजवळ पोहोचतो. मॉलमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी असते. टॉम गाडी पार्क करतो आणि अभिजीत गौरीला शोधतो. संपूर्ण मॉलचे सहा मजले शोधल्यानंतर चेहऱ्यावरचा घाम पुसत कोल्ड ड्रिंक पित तो मॉलबाहेर येतो तर, मॉलच्या समोर असलेल्या फुटपाथजवळील बाकावर गौरी बसलेली असते. ती झोपलेली असते. झोपेत तिच्या चेहऱ्यावरची निरागसता एका लहान मुलीप्रमाणे असते. अभिजीत तिथे जातो आणि तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहतच राहतो. विचार करतो फोटो काढावा, पण नाही काढत. नंतर विचार करतो, बाजूला जाऊन बसावं, पण नाही बसत. बाजूला उभ्या असलेल्या गाडीच्या आरशात पाहून तो आपला चेहरा व्यवस्थीत आहे का, ते बघतो आणि गौरीच्या समोर गुडघ्यांवर बसतो. तिने हातात ठेवलेली पर्स बाजूला करतो. गौरी जागी होते. घड्याळीकडे पाहत खोडकरपणे म्हणते, "मिस्टर बिझी मॅन, मला वाटलं अजून दोन-तीन तास तरी इथेच बसावं लागेल." अभिजीत गुडघ्यांवर बसलेला असल्याने फक्त स्वतःचे दोन्ही कान पकडतो आणि तिला म्हणतो,

"सॉरी... व्हॉट्सअप तरी करायचास ना!"

"आणि माझा व्हॉट्सअप वाचून तुम्ही तुमची कसली ती ट्यूब लाईटची मिटींग..."

"यु-ट्यूब"

"व्हॉटएव्हर, तुम्ही मिटींग सोडून माझ्यासाठी आला असता?"

"सॉरी..." अभिजीत कान तसेच पकडलेले असतात. तसाच उठून तो तिच्या बाजूला जाऊन बसतो.

"कान सोडा अगोदर. नाहीतर लोक म्हणतील, गुगलचे ऑफिसर त्यांच्या बायकोला घाबरतात."

"बोल, काय शिक्षा देतेस? मी तयार आहे शिक्षेला."

"काही दिवसांसाठी बाहेर कुठेतरी पिकनिकला जाऊया का?"

"विचारतेस काय? ऑर्डर दे."

गौरी एकदम ताठ बसते आणि त्याला ऑर्डर देत म्हणते, "मला एक आठवड्यासाठी लांब पिकनिकला घेऊन चला. तिथे फक्त मी आणि तुम्ही. बाकी कोणीच नको."

"लांब म्हणजे कुठे?"

"अं... कुठे जायचं आपण?"

समोरुन एक व्यक्ती जर्मन शेफर्ड कुत्रा घेऊन जातो.

"जर्मनीला जायचं आपण."

"जर्मनी?"

"हो. जर्मनी. आता बोला, जमतंय का?"

"चल, उद्याच काम आटपतो आणि आपण परवा निघू. रुपालीचं काय?"

"कॉलेज फ्रेंड्स आहेत ना तिचे."

"मग निघायचं?"

गौरी आणखी खोडकर होते आणि अभिजीतच्या खांद्यावर डोकं ठेवून, "एकदा घट्ट मिठीत घ्या ना!"

अभिजीत प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघतो, तिचे डोळे बंद असतात आणि चेहऱ्यावर एक वेगळाच भाव असतो. जणू तिला काहीतरी हवं आहे आणि ते तिला फक्त तोच देऊ शकतो. अभिजीत गालातल्या गालात हसतो. हे सगळं लांबून दुर्बिनमधून पाहत असलेला टॉम तिथल्या तिथेच बेशुध्द पडतो. कारण तो ऑस्ट्रेलियाचा पहिला नागरिक होता, ज्याने अभिजीतला हसताना पाहिलं होतं, बेशुध्द होऊन तो यापेक्षा चांगली गोष्ट त्याच्या नजरेत कैद करण्याची संधी दडवतो. अभिजीत तिच्या चेहऱ्यावरुन हळूच हात फिरवतो आणि तिला घट्ट पकडून त्याच्या दिशेने खेचतो, गौरी इतकी चकित होते की, तिला त्याला विरोधही करावासा वाटत नाही. दूसऱ्या क्षणाला ओठ ओठांना मिळतात. विरोधाचे कारणच उरत नाही. तिचे बॅग-पर्स सांभाळत असलेले हात हळूच त्याच्या मानेभोवती जातात आणि दोघंही वेगळ्याच विश्वात रमतात, जिथे दोघेही एकच आहेत आणि शब्दांशिवाय एकमेकांना स्पर्श करुन दोघेही मनमोकळेपणाने गप्पा मारतात.

मैत्र जीवांचे

अभिषेक ठमके
Chapters
अर्पण पत्रिका मनोगत मराठी साहित्याचा ठेवा समृध्द करणारी कादंबरी ‘मैत्र जीवांचे’ प्रकरण १ : अयशस्वी सुरुवात प्रकरण २ : विरहातील पहिला भाग प्रकरण ३: विरहातील दुसरा भाग प्रकरण ४: विरहातील तिसरा भाग प्रकरण ५: एकटेपणाच्या अंधारामधून मैत्रीच्या प्रकाशाकडे प्रकरण ६: जर्मनीतील आव्हानांच्या दिशेने प्रकरण ७: अंधूक आशा प्रकरण ८: आणि प्रेम फुललं जर्मनीमध्ये प्रकरण ९: परदेशवारी, फक्त मित्रासाठी प्रकरण १०: थरारक पार्श्वभूमी प्रकरण ११: पुन्हा एकत्र येण्याचं वचन प्रकरण १२: नव्या कुटूंबाची सुरुवात प्रकरण १३: विवाहाचं रहस्य प्रकरण १४: वडीलांचा आधार प्रकरण १५: देशप्रेम प्रकरण १६: मैत्र जीवांचे, एक नवी सुरुवात