सद्गुरू - जुलै २२
एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता . त्याची एक वस्तू आत पडली होती . ‘ ती काढण्याकरिता मी आत उडी मारतो ’. असे तो म्हणू लागला . त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला , ‘ तू असे करु नकोस , आत बुडून जाशील . ’ तरी पण तो ऐकेना , एवढ्यात त्याचा बाप तिथे आला . त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले , पण तो ऐकेना , मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले . आता , मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का ? " एकुलता एक मुलगा , नवस करुन झालेला , त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते ? " असे म्हणाल का ? नाही ना ? तर मग गुरु तरी काय करीत असतो ? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरु हे त्याला माहीत असते ; म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो . आपण तेही न ऐकले , तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो . आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो . आपण तर चांगले शिकले -सवरलेले ; त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर ; तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते . गुरुने सांगितले ‘ लग्न करु नकोस ’ , तर आपण ‘ लग्न कधी होईल ’ म्हणून त्याच्या पाठीस लागत असतो . आणि शेवटी तर ‘ गुरुला समजतच नाही ’ असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते ! सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानीत असतो . पण अंतिम सुख काय , हे गुरुला कळत असते . म्हणून तो सध्या दिसणार्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो . तेव्हा , आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे . तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे , म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल . गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो ? तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो .
भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो , म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही . ती काय , सहज दूर करता येतात ; पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देतो . भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो . असे भक्तच संतपदाला पोहोचतात . एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे , त्याचप्रमाणे , संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे . संतांचा मुख्य गुण म्हणजे , ते भक्तीला चिकटलेले असतात . सत्पुरुषांचे बाहेरुन वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात , पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते .