सद्गुरू - जुलै १२
शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा . भक्ती ही अशी निरपेक्ष असावी . देवालये बांधली , देवांचे पूजन - अर्चन केले , म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे . देवाचे करीत असताना , जप करीत असताना , त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे . तुम्ही सर्व लोक भजन - पूजन करता , परंतु हे सर्व कसे होऊन बसले आहे ? जसे भांडे कुठे ठेवावे , पळीताम्हन कुठे ठेवावे , वगैरे जे शास्त्रात लिहिलेले असते ते सर्व , माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो ; कारण , त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते . तसे आपण देवाचे करतो , परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून , ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून ; आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे . एक मुलगा होता , त्याला त्याची वडिलांची पत्रे येत असत . तो पत्र वाची आणि देव्हार् यात ठेवून देई . दुसरे पत्र आले की ते वाची , आणि मागले पत्र काढून टाकी . एकदा वडिलांनी पंचवीस रुपये मागितले . मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवले . नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला , " तुला तुझ्या वडिलांचे पत्र मिळाले का ? " त्यावर तो म्हणाला , " हो . " " अरे , मग पैसे का नाही पाठविलेस वडिलांना ? " त्या गृहस्थाने विचारले . त्यावर तो म्हणाला , " तेवढेच राहिले बघा ! " तसे आपले होते . आपण कृती करतो , पूज्यभाव वगैरे ठेवतो , परंतु सदगुरुने सांगितलेले तेवढे करीत नाही . त्यामुळेच आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता , उलट अहंपणा वाढवायलाच मदत करतात . म्हणून सदगुरुने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे , संशयरहित होऊन करावे . त्याकरिता व्यवहार सोडण्याची जरुर नाही .
आपण व्यवहाराला सोडू नये , पण व्यवहारात गुंतू नये . युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असते . तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो , आणि योग्य वाटेल तेथे रथ नेऊन उभा करतो . युद्धकर्त्याचे काम , फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणे . त्याप्रमाणे , आपले सर्व जीवन एकदा सदगुरुच्या ताब्यात दिल्यावर , तो सांगेल त्याप्रमाणे वागणे हेच आपले कर्तव्य ठरते .
ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे . एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच हाती येतात , त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच . परमार्थात भगवंताची गरज असते . ही भगवंताची गरज , सदगुरु त्याचे ‘ नाम ’ देऊन भागवितात . आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे . अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो , भगवंताची गरज भासते , प्रपंचात समाधान मिळते , आणि जन्माला आल्याचे सार्थक होते .