Get it on Google Play
Download on the App Store

मार्च २२ - प्रपंच

नारदांनी एकदा श्रीकृष्णांना विचारले, " तुम्ही कुठे सापडाल? " त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, " नारदा, मी वैकुंठात नाही, रखुमाईपाशी सापडेन असेही नाही, तर मी भक्तांपाशी सापडेन. " भक्त नाही तरी देवाशिवाय कसे राहणार? देवाला देवपण तरी कुणी आणले? भक्त जर नाहीत तर देव तरी कुठचे आले? देव आहे असे मानतात त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते. नास्तिकाला देव कुठला? त्याला विचारले," तुझे कोण आहे या जगात? " तर तो सांगेल, " हे जे सर्व काही आहे, आपले भाऊ, बहीण, बायको, मुले, नातेवाईक, तसेच प्रपंचात ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्व माझ्या आहेत, "परंतु मग देवाघरची वाट काय? ज्याने जग निर्माण केले त्याला विसरायचे, आणि जे उत्पन्न केले ते माझे म्हणायचे, हा परमार्थ होईल काय? तेव्हा, ‘ देव आहे’ अशी भावना धरा आणि देवाला दार उघडा, म्हणजे तो सदासर्वकाळ तुमच्या जवळच आहे. भावनेने देव आपलासा केला पाहिजे. आपण कुठेही गेलो तरी आपल्या रामाला बरोबर घेऊन जात जा, म्हणजे तुम्हाला काही भीती नाही. ‘ रामाला बरोबर नेणे ’ हे बोलणे लोकांना चमत्कारिक वाटेल, पण ज्यांना देवच नाही असे वाटते त्यांच्याशी आपल्याला काहीच कर्तव्य नाही.
जो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला असे काहीजण म्हणतात. परंतु ज्याने प्रपंच निर्माण केला, त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का? कधीही होणे शक्य नाही; तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो निटनेटका होईल. प्रपंच सोडून परमार्थ होणार नाही. प्रपंच करा, पण त्यातली आसक्ती सोडा म्हणजे झाले. तुम्हां सर्वांना जडभरताची गोष्ट माहित आहेच. भरत जरी घरदार सोडून वनात गेला तरी तिथे हरिणाची आसक्ती धरलीच! तर हरिण काय आणि माणसे काय, आसक्तीच्या दृष्टीने दोन्ही सारखीच. जोपर्यंत आसक्ती सुटली नाही तोपर्यंत परमार्थ करणे व्यर्थ होय. तरी आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करा, आणि माझा राम सदासर्वकाळ माझ्या मागेपुढे आहे ही भावना धरा. एकाने विचारले, " तुम्ही सर्वांना मानसपूजा करायला सांगता, पण एकटा राम सर्वांच्या जवळ कसा जाणार? " मी त्याला सांगितले, " तू मानसपूजा कर म्हणजे तो तुझ्याजवळ राहील. " तो जर सर्व ठिकाणी भरलेला आहे, तर त्याला जाणे-येणे नाहीच! आपण मात्र त्याला पाहणे जरूर आहे. भगवंताचे नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल.