मार्च २१ - प्रपंच
जगात दोन प्रकारचे रोग माणसाला नेहमी सतावीत असतात. एक रोग असा की त्याने भूकच लागत नाही. कितीही औषधपाणी करा, काही उपयोग होत नाही. अशा माणसाला पंचपक्वान्नांचे जेवण तयार असूनही काय फायदा? तो म्हणतो, " खायला खूप आहे, परंतु मला भूकच नाही, त्याला काय करू? " दुसरा रोग असा की, कितीही खाल्ले तरी खाण्याची हाव काही पूरी होत नाही. काहीही खा, त्याचे भस्म होते. तद्वत् आपले आहे. मात्र, आपल्याला एकच रोग नसून दोन्ही रोग आहेत. इतका परमार्थाचा हाट भरला आहे, भजन-पूजन चालू आहे, परंतु आपल्याला त्याचे प्रेम नाही. त्याची आवडच वाटत नाही. आपल्याला त्याची खरी भूकच लागलेली नाही. उलटपक्षी, भगवंताने आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा खरोखर कितीतरी जास्त दिले: बायको, मुले, नोकरी-धंदा, घरदार, इत्यादि कितीतरी गोष्टी, की ज्यांपासून सूख मिळेलसे आपल्याला वाटते, त्या गोष्टी पुरविल्या; पण अजून आपली या सर्वांना पुरून, या सर्वांचे भस्म करून, कायमच आहे, आणि परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही. हे असे किती दिवस चालणार? आपण नीतिधर्माने चालतो, आपली वागणूक वाईट नाही, हे खरे. पण याचे कारण, वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील ही भीती! असा हा दिखाऊ चांगुलपणा, ही वरवरची सुधारणा, काय कामाची? मानवी जीवन सुखी झाले तर ती सुधारणा म्हणायची! उलट आजची स्थिती पाहावी, तर ‘ सुधारणा ’ जितक्या जास्त तितका माणूस जास्त असमाधानी झाला आहे. परमेश्वराचे प्रेम लागल्याशिवाय आणि इतर गोष्टींची हाव कमी झाल्याशिवाय काही फायदा नाही. तीर्थयात्रा, पूजा, भजन, ही परमार्थाची नुसती आठवण देतील, पण अंतरंग सुधारेलच असे नाही; आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा उपयोग नाही. आपण दरवर्षी वारी करतो, आणि जन्मभर वारी करतच राहणार, परंतु परमेश्वराचे प्रेम मात्र काही लागत नाही, खरोखर, मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही; आहे त्या परिस्थितीत समाधान मानले की जे आहे ते पुरेल. परमार्थ ‘ समजून ’ जो त्याचे आचरण त्याला तो लवकर साधेल. अशा माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणार नाही. मनात भगवंताचे प्रेम नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्याची पूजाअर्चा करावी आणि त्याचे नामस्मरण करावे. पहिल्याने स्मरण बळजबरीने करावे लागेल, पण सवयीने तोंडात बसेल. याच स्मरणाने पुढे ध्यास लागेल. ‘ मी पूर्वीचा नाही, आता मी भगवंताचा आहे, ’ असे वाटणे जरूर आहे.