Android app on Google Play

 

मार्च १७ - प्रपंच

 

सत्त्वगुणात भगवंत असतो; तेव्हा त्या मार्गाने आपण जावे. भगवंत आपल्यात यायला, सर्व कर्मे चांगल्या प्रकारे केली तरी ती भगवंतार्पण बुध्दीने करावी. व्यवहार सोडू नये, प्रयत्नही कसून करावा; परंतु त्याबरोबर मन भगवंताकडे कसे लागेल इकडे लक्ष द्यावे. आपण प्रपंचाची जितकी काळजी घेतो, तितकी जरी देवाची घेतली तरी खूप होईल. आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजते; तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावे. काळजी न करतादेखील प्रयत्न होणार नाही असे नाही. उलट, प्रयत्न दुप्पट करावेत; पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे. आपण स्वत:बद्दल काळजी करतो याचे कारण असे की, आपण आपल्यापेक्षा जास्त दु:खी असलेल्या माणसाकडे पाहात नाही. एक म्हणतो की, मला लोकांच्या ‘ देण्याची ’ काळजी आहे; दुसरा म्हणतो की, मला लोकांकडून माझे येणे ‘ येण्याची ’ काळजी आहे; तर तिसरा म्हणतो की, मला माझ्या मुलाबाळांची काळजी आहे. पण काळजीच्या या सर्व घोटाळ्यामध्ये आपली स्वत:ची काळजी कुणालाच नाही ! मागल्या आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करीत बसतो. ही काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही याला काय करावे? यावर रामबाण असा एकच उपाय आहे; तो म्हणजे, आजपासून काळजी करण्याचे अजिबात सोडून देऊन तेवढा वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालविणे.
एका माणसाने माझ्यापाशी तक्रार केली की, “ काय करावे, हा माझा मुलगा कशाचीच काळजी करीत नाही, नुसता हसतखेळत दिवस घालवितो; पुढे याचे कसे व्हायचे? ” मी म्हटले, “ तुमचे म्हणणे वरवर खरे दिसते; पण वास्तविक पाहता ते खरे नाही. तुम्ही आजपर्यंत इतकी काळजी करुन काय मिळविले? शारीरिक आणि मानसिक त्रास भोगला, आणि भगवंताला विसरला, इतकेच ना? मग तेच तुमच्या मुलाला का शिकविता? त्याने आपले कर्तव्य जरुर करावे आणि आनंदात राहावे; पण काळजी करु नये असेच मी त्याला सांगेन. ” तुम्ही प्रपंचाची काळजी करता तोपर्यंत देवाची सेवा करता असे कसे म्हणावे? ‘ असले तर असू दे आणि नसले तर नसू दे, ’ अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल.