Get it on Google Play
Download on the App Store

मार्च १२ - प्रपंच

परमात्मा आनंदरूप आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. भगवंताच्या हास्यमुखाचे ध्यान करावे. प्रत्येक गोष्टीत मनुष्य आनंद पाहात असतो. उकाड्यात वारा आला, त्याला वाटते बरे झाले; पाऊस आला की त्याला वाटते, आता गारवा येईल. कोणत्याही तर्‍हेने काय, मनुश्य आनंद साठवू पाहात असतो. मनुष्याला भूक लागेल तेव्हा तो जर अन्न तर त्याचे पोट भरेल आणि त्यापासून त्याला आनंद मिळेल; परंतु त्याने विष खाल्ले तर त्याने आनंद न होता मरण मात्र येईल. तसे आपले होते. आपण विषयातून आनंद घेऊ पाहतो, आणि तो आपल्याला बाधक ठरतो. एखाद्या रोग्याला जंत झाले आणि त्याला जर खूप खायला दिले, तर ते शरीरास पोषक न होत, जंतच वाढतात; त्याप्रमाणे आपण सत्कर्मे करताना पोटात विषयांचे प्रेम ठेवून केली, तर त्यामुळे विषयच पोसले जाऊन, त्यांपासून समाधान लाभू शकत नाही. याकरिता कर्तव्यबुद्धीने कर्म करावे, म्हणजे ते बाधक ठरत नाही.
मनुष्य जन्मभर जो धंदा करतो त्याच्याशीच तद्रुप होऊन जातो. एखादा वकील घ्या, तो त्याच्या धंद्याशी इतका तद्रूप होतो की मरतेवेळीसुद्धा वादच करत जाईल. नोकरी करणारा नोकरीशी इतका तद्रूप होऊन जातो की, स्वप्नात देखील तो स्वतःला नोकर समजूनच राहतो. कर्म कसे करावे, तर त्याच्यापासून वेगळे राहून. लग्नाचा सोहळा भोगावा, लाडू खावेत, पण ते दुसर्‍याचे आहेत असे समजून. आपल्या मुलीचे किंवा मुलाचे नाहीत असे समजून; नाही तर व्याह्यांचे काळजी लागायची, किंवा हुंडा मिळतो की नाही इकडे लक्ष लागायचे! त्यामुळे तापच निर्माण होईल. कर्माशिवाय कोणालाच राहता येत नाही. एखाद्याला शिक्षा द्यायची म्हणून, ‘ अगदी हलायचे नाही, पापणी, हात, पाय, काहीही हलवता कामा नये. ’ असे म्हटले तर ते जसे त्याला शक्य होणार नाही. होणर नाही, तसे काही ना काही तरी कर्म हे होणारच. भगवंतांनी अशी सांगड घालून दिले आहे की कर्म केल्याशिवाय गत्यंतरच नाही. परंतु ती कर्मे ‘ राम कर्ता ’ ही भावना विसरून केली तर बाधक होतात, आणि मरणापर्यंत माणूस पुढ्ल्या जन्माची तयारी करीत राहतो; तेव्हा, देहाने कर्म करतानाही ‘ कर्ता मी नव्हे ’ हे जाणून कर्म करावे. आपल्याला कर्म केल्याशिवाय करमत नाही. पण आपण फळाची आशा उगीचच करीत असतो. आपण फळाची आशा सोडून कर्म करू लागलो, की ते कर्म करीत असतानाच समाधान प्राप्त होते.