Get it on Google Play
Download on the App Store

मार्च १ - प्रपंच

सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत. पण त्यांतल्या त्यांत समर्थांनी आपली जागा न सोडता, विषयी लोकांचे चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच रोगाचे निदान केले. आमचा मुख्य रोग, संसार दु:खाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते, हा आहे. रोग कळून आला पण औषध जर घेतले नाही तर तो बरा कसा होणार? रोग असेल तसे औषध द्यावे लागते. अजीर्णाने पोट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल? संसार ज्याला दु:खाचा वाटतो त्यालाच परमार्थमार्गाचा उपयोग ! एखादा दारु पिणारा मनुष्य दारुपायी आपले सर्वस्व घालवतो. दारुचा अंमल नसतो त्या वेळी तो शुध्दीवर येतो. आणि त्याला आपल्या बायको-मुलांची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असेही त्याला वाटते. पण त्याच्या बुध्दीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुन: इतकी दारु पितो की त्यात त्याला स्वत:चा विसर पडतो; आणे अशा रीतीने त्यामध्येच तो स्वत:चा नाश करुन घेतो. अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते. पहिल्यापहिल्याने प्रपंच बरा वाटतो, मनुष्य त्यात रमतो. पुढे काही दिवसांनंतर तो थकतो, त्याची उमेद कमी होते, आणि म्हणून, आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असे त्याला वाटते. पण नंतर तो पुन: जोराने प्रपंच करु लागतो, आणि शेवटी हीन अवस्थेत मरुन जातो.
जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वत:ला सांभाळून घेईल; पण जो स्वत:चा घात करुन घेतो त्याला कोण सांभाळणार? तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो. खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो, आणि देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो. मनुष्य तेच करीत असूनसुध्दा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही? कालच्या गोष्टीच आपण आज करतो. आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. तेच ते जेवण, ती नोकरी, तोच तो पैसा मिळविणे, सगळे तेच ! असे असताना माणसाला कंटाळा का येऊ नये? याचे कारण असे आहे की, विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे, किंवा हावेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या दोन कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे; आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली. त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला. तरी अजून आपली कल्पना ही खरी की खोटी हे आपल्याला कळत नाहे, हे मात्र और आहे.