Android app on Google Play

 

मार्च २० - प्रपंच

 

भीति न बाळगावी चित्ती। रक्षण करणारा आहे रघुपति॥ भीति न बाळगावी कशाची काही। राम रक्षिता आहे हे हृदयी जाणून राही॥ सर्वस्वी झाल्यास रामाचे। राम उभा राहिला तेथे। काळजीचे कारण न उरे साचे॥ राम म्हणावा दाता खरा। न द्यावा भीति-काळजीला थारा। काळजी करू नये। प्रयत्न सोडू नये। कोणत्याही कारणाने रामास विसरू नये॥ म्हणावा प्रपंच रामाचा झाला। मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला। तेथे ठाव नाही काळजीला, तळमळीला॥ देहाशी ठेवता माझे-मीपण। तेच होते दुःखाचे अधिष्ठान॥ आजवर जे जे काही केले। ते ते मीपणाने झाले॥ जे जे मीपणाने केले ते दुःखाला कारण झाले॥ बाह्य वस्तू जरी मीपणाने सोडली। तरी अभिमानाने वृत्ति बळवली। तेथेच घाताला सुरुवात झाली॥ आग्रह आणि हट्टीपण। हेच अभिमानाचे लक्षण॥ कर्तेपणाचा अभिमान। हाच दुःखाला कारण जाण॥ प्रपंचाचे दुःख भोगणे। ते मीपणा असल्याची खूण जाणणे। मी-माझेपणाने जोपर्यंत धडपड जाण। तोपर्यंत नाही समाधान॥ देहबुद्धीचे प्रेम। स्वार्थाला वाढविते जाण॥ स्वार्थाचे आपलेपण। हेच घाताला कारण॥ आजवर जो जो प्रयत्न झाला। तो तो देहबुद्धी वाढवीतच गेला॥ देहबुद्धीचा भाव। तो मुळीच दुःखाचा ठाव॥ जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला। तोवर देहदुःखे पस्तावला गेला॥ म्हणून देहबुद्धी धरून राही। त्याला कोठे सूख नाही॥ रामाविण अन्य प्रीति। उपजे देहबुद्धीचे संगती॥ म्हणून मीपणाचे न व्हावे अधीन। जेणे भंगेल आपले समाधान। कारण जेथे मीपणाचे ठाणे। तेथे दुःखाचे साम्राज्य असणे॥ पाप पुण्याची भीति। ही देहबुद्धीचीच संगति॥
वासनेत जीव गुंतला। कष्टी फार फार झाला॥ आजवर वासना पोटी धरून राहिला। आपल्या हिताला नागवला। नदी जशी अखंड वाहते। वासना तशी सारखी वाहते॥ वासना भोगाने कमी होत नाही। त्यागाने नाहीशी होत नाही॥ आपण देहधारी। देहदुःख न सोसवे क्षणभरी॥ ज्याला म्हणावे मी माझे। त्यावर माझी सत्ता न गाजे॥ माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही। जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही॥ सर्व काही देता येते दान। पण उर्वरित राहतो अभिमान॥ कर्तेपणाचा अभिमान। हेच भगवंताच्या आड मुख्य जाण॥ म्हणून माझे-मीपण। हेच्दुःखाला कारण। रामाचे होण्याने होईल निवारण॥