मार्च १३ - प्रपंच
आईकरिता रडत असलेले मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबवत नाही, त्याप्रमाणे, समाधानाकरिता, आनंदाकरिता धडपडणारा जीव, परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही. म्हणून प्रपंचाची काळजी न करता, परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याची काळजी करा. भगवंतावर पूर्णपणे निष्ठा ठेवल्याशिवाय आपली प्रपंचाची काळजी दूर नाही होणार. सर्व जगताचा जो पालनकर्ता, तो आपले पालन नाहे का करणार? प्रत्येक गोष्ट त्याच्याच सत्तेने होते हे ल्क्षात ठेवा, मग प्रपंच कधीच बाधक होणार नाही. एक भगवंताची निष्ठा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळा. आपण पुराणात वाचलेच आहे की, भीष्माने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली. भीष्मप्रतिज्ञाच ती, मग ती खोटी कशी होऊ शकेल? सर्व पांडव चिंताग्रस्त झाले, पण द्रौपदीची निष्ठा जबरदस्त होती. ती म्हणाली, " आपण श्रीकृष्णाला विचारू. " तिने सर्व वृत्तांत त्याला कथन केला. श्रीकृष्ण म्हणाला, " भीष्माची प्रतिज्ञा खोटी कशी होईल? तरी आपण एक प्रयत्न करून बघू. " तो म्हणाला, " द्रौपदी तू आता असे कर, रात्री भीष्माचार्यांच्या आश्रमात जा. तिथे फक्त संन्याशांना व स्त्रियांना मुभा आहे. मी तुझ्यासोबत आश्रमापर्यंत येतो. " त्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन आश्रमापर्यंत गेले. आणि बाहेरच तिचे अलंकार व इतर वस्तू सांभाळत बसले. श्रीकृष्णांनी तिला आत जाताना सांगितले, " भीष्माचार्य झोपत आहेत अशा वेळी तू आत जा आणि बांगड्या वाजवून नमस्कार कर. " त्याप्रमाणे द्रौपदी आत गेली आणि बांगड्या वाजवून भीष्माचार्यांना तिने नमस्कार केला. त्यांनी लगेच तिला " अखंड सौभाग्यवती भव " असा आशिर्वाद दिला. मग त्यांनी पाहिले तो द्रौपदी! तेव्हा ते म्हणाले, " द्रौपदी, ही तुझी अक्कल खचित नव्हे; तुझ्याबरोबर कोण आहे ते सांग. " ती म्हणाली, " माझ्याबरोबर गडी आणला आहे; तो बाहेर उभा आहे. " भीष्माचार्यांनी बाहेर येऊन पाहिले, त्यांनी श्रीकृष्णाला ओळखले, पण आता सर्व काम होऊन चुकले होते. म्हणून म्हणतो, परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे. या निष्ठेच्या आड काही येत असेल तर तो म्हणजे आपला अभिमान. हा अभिमान सर्वांना घातक आहे. तो घालवण्यासाठीच परमात्म्याला वारंवार अवतार घेणे भाग पडले. ही अभिमानाची हरळी नष्ट करण्यासाठी भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही. नामावर प्रह्लादाने जशी निष्ठा ठेवली तशी ठेवावी. त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरिता घेतले, आपण ते विषयासाठी घेऊ नये. नामापरते दुसरे सत्य नाही हे समजावे. याच जन्मात हे नाम शांतीचा आणि समाधानाचा ठेवा मिळवून देईल.