Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह २१

घे घे गडनी चल जाऊं न्हवणां

जिथं पाय पडलं तिथं उगवल दवणा

दवणा न्हवं बाई दवण्याची काडी

राजानं बांधली तिथं उप्पर माडी

माडी बांधुनी शाबास केली

लंका लुटूनी शाबास दिली

त्या का लंकाला गवर आली

चांफ्यावरचं सोनं बोनं घे म्हटली

एक तोळा सोनं घ्या वो वैनी

बरम्या लेकी द्यावो वैनी

एक तोळा सोनं मी घियाची न्हाइ

बरम्या लेकी मी दियाची न्हाई

रघुरायाच्या वो पती सायाच्या

लेकी थोराच्या न्हाई वो दियाच्या

तुज्या पिंग्यानं मला बोलीवलं

दिस घालीवलं ग दिस घालीवलं

अग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग.....

*

माझी सासू कशी ? सांग बाई पोरी

काय सांगूं मावशी ?

माझी सासू, चुलीपुढं बसलेली

मांजरीनच जशी ग जू....जू....

माझा सासरा कसा ? सांग बाई पोरी

काय सांगूं आत्यासाब ?

माझा सासरा, हातभर दाढीचा

बोकूडच जसा ग जूं....जूं....

अग, अग, थांब पोरी थांब !

आणिक मी ग कशी ?

काय सांगूं वैन्स ?

हातांत घाटी न्‌

मुरळीच जशी ग जूं....जूं....

*

भावा भैनींला दिल्यानं न्हाईं तुजं होत कमी

झरा उपस येतं पानी भाऊराया

भैनीचा आशीर्वाद भाऊ झेलतो बळी

गंगनीं गेल्या केळी हात पुरना कंबळीं

नवखंड पिरतीमी तिचा योकच चांदतारा

भाऊ भैनीला वाटे प्यारा

देव कुठें ? देव कुठें ? भरीरुन जो उरला

अरे उरीसन माझ्या माहेरांत सामावला

अरे लागले डोहाळे सांगे शेतांतली माटी

गातें माहेराचं गानं लेक येईन वो पोटीं

*

आवरा भात मना पेरुन दे गो

मंग जा तुझ्या तूं माहेरा

भात पेरीले रे माझ्या भरतारा

आतां मी जातें माझे माहेरा

आवरा भात मना कापून दे गो

मंग जा तुझे तूं माहेरा

भात कापीले रे माझ्या भरतारा

आतां मी जातें माझे माहेरा

आवरे भात मना झोरुन दे गो

मंग जा तुझे तूं माहेरा

भात झोरीले रे माझ्या भरतारा

आतां मी जातें माझे माहेरा

आवरे भात मना टिपून दे गो

मंग जा तुझे तूं माहेरा

भात टिपीले रे माझ्या भरतारा

आताम मी जातें माझे माहेरा

आवरे भात घरा आणून दे गो

मंग जा तुझे तूं माहेरा

*

पंचमीच्या सणायाला

नणंद आणली म्हायाराला

कांहीं नाहीं घालायला

ऐका वो साजणी बाई

सर्व दिलं घालायाला

ऐका वो, साजणी बाई

गोट आणि पाटयिल्या

लेण्यामंदीं दाटयिल्या

त्याबी दिल्या घालायाला

ऐका वो, साजणीबाई

आग्गरबाळ्या बग्गरबाळ्या

दिसायाला आगयिळ्या ----

त्याबी दिल्या घालायाला

ऐका वो, साजणीबाई

कंबरचा कंबरपट्‌टा

गळ्यांतली चिंचपेटी

तीबी दिली घालायाला

ऐका वो, साजणीबाई

काळी ती वो चंद्रकळी

वर मोतियांची चोळी

तीबी दिली नेसायाला

ऐका वो, साजणीबाई

सर्व दिलं घालायाला

ऐका वो, साजणीबाई