Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह १८

कोंवळी बाभूळ लवते बाई

त्याच्यावर झगडा झुलतो बाई

तो काय झगडा नानापरी

"तुला का देऊं कोणा घरीं ?"

"मला का दे जो खात्याघरीं"

"खात्याघरचें काय काय काज ?"

"घण कां मारतां पडली लाज ?"

कोंवळी बाभूळ लवते बाई

त्याच्यावर झगडा झुलतो बाई

त्याची माय कनगई नानापरी

"तुला का देऊं कोण्या घरीं ?"

"मला कां दे जो वाढयाघरीं"

"वाढयाघरचें काय काय काज ?"

"झिलप्या कां भरतां पडली लाज ?"

कोंवळी बाभूळ लवते बाई

त्याच्यावर झगडा झुलतो बाई

तो काय झगडा नानापरी

"तुला का देऊं कोणाघरीं ?"

"मला का दे जो ब्राह्मणाघरीं"

"ब्राह्मणा घरीं काय काय काज ?"

"भांडे कां उटतां पडली लाज ?"

कोंवळी बाभुळ लवते बाई

त्याच्यावर झगडा झुलतो बाई

त्याची माय कनगई नानापरी

"तुला का देऊं कोणा घरीं ?"

"मला का दे जो सोनाराघरीं "

"सोनाराघरचें काय काय काज ?"

"भाता कां फुंकतां पडली लाज ?"

कोंवळी बाभुळ लवते बाई

त्याच्यावर झगड झुलतो बाई

तो काय झगडा नानापरी

"तुला का देऊं कोणा घरीं ?"

"मला का दे जो ढिवराघरीं "

"ढिवराघरचें काय काय काज ?"

"मच्छी पकडतां कां पडली लाज ?"

कोंवळी बाभुळ लवते बाई

त्याच्यावर झगडा झुलतो बाई

त्याची माय कनगई नानापरी

"तुला का देऊं कोणा घरीं ?"

"मला का दे जो गोवार्‍याघरीं "

"गोवर्‍याघरचें काय काय काज ?"

"माठया कां घालतां पडली लाज ?"

कोंवळी बाभुळ लवते बाई

त्याच्यावर झगडा झुलतो बाइ

त्याची माय कनगई नानापरी

तुका कां देऊं कोण्या घरीं ?"

"मला कां दे जो कुणब्याघरीं"

"कुणब्याघरचें काय काय काज ?"

"शेण कां फेकतां पडली लाज ?"

*

आंगणीं तोंडल्याचें झाड रायबाईजी

त्याला सूप सूप पान

"तुला न्यायला आले कोण ?"

"आला राईचा सासरा

त्यानें आणलें काय काय ?"

"त्यानें आणली चुनडी"

"त्याची चुनडी नेसत नाहीं

त्याच्या गाडींत बसत नाहीं

त्याच्यासंगें जात नाहीं

त्याची गाडी मय गाडी

त्याचे बैल चंदन

बसे धुरेवर बाह्मण" ॥

आंगणीं तोंडल्याचें झाड रायबाईजी

त्याचें सूप सूप पान

"तुला न्यायला आला कोण ?"

"आला राईचा दीर"

"त्यानें आणलें काय काय ?"

"त्यानें आणली शिलारी"

"त्याची शिलारी नेसत नाहीं

त्याच्या गाडींत बसत नाहीं

त्याच्या संगें जात नाहीं

त्याची गाडी मयगाडी

बसे धुरेवर कैकाडी" ॥

आंगणीं तोंडल्याचें झाड रायबाईजी

त्याला सूप सूप पान

"तुला न्यायला आला कोण ?"

"आला राईचा भासरा"

"त्यानें आणलें काय काय ?"

"त्यानें आणली पैठणी"

"त्याची पैठणी नेसत नाहीं

त्याच्यासंगें जात नाहीं

त्याची गाडी मयगाडी

बसे धुरेवर कैकाडी" ॥

अंगणीं तोंडल्याचें झाड रायबाईजी

त्याला सूप सूप पान

"तुला न्यायला आले कोण ?"

"आला राईचा पति"

"त्यानें आणलें काय काय ?"

"त्यानें आणलें लुगडें "

"त्याचें लुगडें नेसते

त्याच्या गाडींत बसते

त्याची गाडी आहे चंदन

त्याचे बैल नंदन

बसे धुरेवर ब्राह्मण" ॥

*

खण खण कुदळी मण मण माती

देऊळ खचलें चांदण्यारातीं

चांदण्यारातचें माणिक मोती

घाल घाल गौराई आपल्या नाकी

घालतां घालतां मोडली दांडी

त्याची केली उपर माडी

उपर माडीवर उभी राह्य

गौराई आपलं माहेर पाह्य

माहेर कांहीं दिसेना दिसेना

शंकराला पुसेना पुसेना

शंकराला पुसलें पुसलें

गौराईचें माहेर दिसलें दिसलें

*

सासर्‍याला सून आवडली मनांतून

तोडयाखालीं पैंजण हळूं वापर जिन्यांतून ॥

सासर्‍याला सून आवडली मनांतून

शंभराचे तोडे पायीं हंडयानें पाणी वाही ॥

पहांटे उठूनी हातीं दावें वांसराचें

दैव तुझ्या सासर्‍याचें ॥

सीता भावजई उचल भांडयांचा पसारा

जेवून गेला बाई तुझा दैवाचा सासरा ॥

*

दळण दळीतां पीठ भरा लौकरी

सासू माझी सुंदरी ॥

माझ्या चुडयावरी सासूबाईंचें लक्ष्य फार

शाई बिजलीचे चितार ॥

दळण म्यां दळीलें पीठ म्यां भरीलें

सासूपुढें ठेविलें ॥

*

अडकित्ता घुंगराचा तुझ्या सासुरवाडीचा

रंगमहाल खिडकीचा ॥

*

गोद शेजेवरी नाहीं कोंडा फेकीन वाळीत

माझें माहेर झाडींत ॥

माझ्या माहेराला माहेर कोणाचें लागत नाहीं

आंब्याची आंबराई तिथें फुलांची बागशाही ॥

माहराला जातें माहेरीं माझा सुई

जेऊं वाढायला माय ताट मांडायला भावजई ॥

दळण कांडणानें आले हाताला घोगले

सुख माहेरीं भोगलें ॥

धान कांडूं कांडूं हाताला आले फोडे

माहेरचें सुख गोरी आठवून रडे ॥

*

कसें आईच्या डोळ्यां पाणी बाप म्हणतो, "उगी तान्ही"

"अरे माझ्या तान्ह्या राघू जावें मैनेला आणायाला

अशी झाली तुला रात्र गाडी खिडक्यांची विणायाला"

*

सखी जाते माहेराला आलें आभाळ जांभाळूनी

सखी न्या जा सांभाळूनी ॥

*

सखी जाते माहेराला उभा कंथ आंब्यातळीं

"कधीं येशील चंद्रावळी ॥"

*

मैना जाते सासराला तुला पोहोचवायला येते

असा तान्हा राघू माझा संगे मुरळ्या तुझ्या देतें ॥

अशी सासराला जाते माझी कौतुकाची उमा

पुढें बंधु मागें मामा ॥

*

लेकुरवाळी झाली जंजाळी गुंतली

पोटच्या बाळापायीं माहेर विसरली ॥