संग्रह १३
नवस बोललें । माझ्या नवसाला पाव ।
बंधवाच्या घरीं । कडदोर्याचं बाळ दाव ॥
बहीणीचं बाळ । कीती केलं लोकाचं ।
आत्या मनून हांक मारी । बाळ परानसख्याचं ॥
आळीच्या बायांनों । साखर घ्यावी ती आनीक ।
झाला बंधवाला मानीक ॥
भावाला ल्योक झाला । बंधूच्या रानीला ।
चीरे फोडीले न्हानीला । गवंडी लागले कामाला ।
बंधूला झाला ल्योक । आमां बयनीला भूषेन ।
साखर वाटीतें पशानं । मारवतीला नीशान ॥
बंधूला झाला पुत्र । आमां बयनी काय कळं ।
उंच माडी दीवा जळं । बापाजीचा नातू खेळं ॥
बंधूला झाला ल्योक । हास मनांत मायेना ।
जोड फिरक्याचा पाळना । तूला सूतारा येईना "
बंधूला झाला ल्योक । आमां बयनीला इच्छाव ।
असं त्याचं नांव ठेवा । भाचा दिल्लीचा वाच्छाव ॥
*
सोमवारीं नाहूं नाहीं । नको मंगळवारीं वेणी ।
पाठीं बंधु सौभागिनी ॥
दीव्याच्या वलसावीं । नको बसूं तान्ह्याबाई ।
तूझा पाठींचा देसाई ॥
*
आयुक्ष चिंतीतें । हातच्या कांकणाला ।
पाठींच्या रतनाला । पोटच्या राजसाला ॥
*
भाई समींदर । आमी बयनी नर्मदा ।
आमी टाकूं ऊडया । नका ऊचंबळूं दादा ॥
समींदर समींदर । मोठी नांवाची बढाई ।
पानी नाहीं गोड । तिथं तहान मोडावी ॥
समींदर सोकल्यानं । तहान माझी नाहीं गेली ।
मायनाई मावलीची । गंगाची वळती केली ।
समींदर सोकल्यानं । जाईना माझी ताहान ।
माय ग मावली । गंगा माझी आसमान ॥
सांवलींत सांवली । चींचबाईची गार ।
आंबा माझा डौलदार । भाईराजस ग माझा ॥
*
आपण मायलेकी । गूज बोलूं रातीं ।
शेजी नवल करती । तूला येवढाल्या लेकी ॥
मायलेकींचं गूज । वरषाला गेलं ।
अंजनाबाई मने । तूला कसं करमलं ॥
मायलेकींचं ग गूज । सरंना ईळाचं ।
सीतामालनीला । नीमित्त दीव्याचं ॥
मायलेकींचं ग गूज । सरनां रातीची ।
पूर्व्याला उगवली । चांदनी शुक्राची ॥
*
मायेसारखी ग माया । येईना पूरुषाला ।
संपादत नाहीं । दूध साळीच्या भाताला ॥
मायेसारखी ग माया । येईना पूरुषाला ।
झाडामंदीं वूरुक्षाला । फूल येईना शेराला ।
हजार माझं गोत । झाडीचा झाडपाला ।
माय बाईच्या माझ्या । मीत चींचच्या सांवलीला ।
मायेवांचून माहेर । कंथावांचूनी सासर ।
सांगतं सईबाई । बाळावांचूनी ग घर ॥
*
माऊलीची माया । सर्व्या बाळावरी ।
चिमणी खोपा करी । अवघड झाडावरी ।
पांच रुपयाची चोळी । आठ आन्याचा ग दोरा ।
मायबाईनं माझ्या । छंद पूरवीला खरा ॥
सांगून धाडीतें । माझ्या सांगण्याचा लाड ।
तूझ्या घरीं फूलझाड । तशी मला चोळी धाड ॥
सांगून धाडीतें । राघूच्या पंखापखीं ।
हिरवी चोळी लाल नखीं ॥
हात भरला काखनानं । मागंपुढं बीलवर ।
छंद तुझ्या जीवावर ॥
मला ग वाटलं । मावलीला ग भेटावं ।
चंद्रसेनाला लुटावं ॥
मला ग वाटलं । माझ्या जीवाला गारवा ।
चींचची सांवली । मधीं जोंधळा हीरवा ॥
जीवाला जडभारी । वसरीला देतं ऊसं ।
मावलीच्या सायासाचं । धरणीं लोळतात केस ॥
लांब लांब केस । सडक माझी वेणी ।
माय मालणीनं बाई । नीगा केली बालपणीं ॥
लांब लांब केस । चौरंगाहूनी भूईला ।
यवढा सायास मायेला । पाला गव्हाचा लाईला ॥
*
पहेली माझी ववी । गूरुला गाईली ।
जन्म दिल्याली राहीली । माय माझी ॥
नव महीने वझं । वागवीलं मीरीआड ।
मझ्या मायबाईला । ओवी गातं देवा चढ ॥
नऊ महीने वझं । वागवीलं डाव्या कूशीं ।
मायबाईला माझ्या । फिरुन बोलूं कशी ॥
नवं अठरा धारा । नीत्य पीलं सरासरी ।
मायबाई माझे । आलं तूझ्या बराबरी ।
नवं अठरा धारा । पीलं मी माझ्या रंगं ।
तूझ्या मांडीचा चवरंग ॥
बत्तीस तूझ्या धारा । सार्या घेतल्या वसून ।
मायबाई माझे । तूझ्या मांडीवर बसून ॥
नव्हती आशा केली । शेजीच्या शीदोरीची ।
सोडीतं गांठ । मझ्या मायेच्या पदराची ॥
शेजी नाहूं घाली । नाहीं भीजला ग धोंडा ।
मायबाई नाहूं घाली । येसी खालून गेला लोंढा ॥
शेजीचा सावणा । तळहातांत राहेना ।
माझ्या मायेच्या सावणा । भरल्या थाळ्या उचलंना ॥
शेजी जेऊं घाली । भरेना माझं पोट ।
माय जेऊ घाली । दूधासंगं साय लोटं ॥
शेजी जेऊ घाली । शीर्यावरी तूप ।
मझ्या जेवन्याची खूण । मझ्या आईला ठावूक ॥
*
बाप करी बोळवण । माय करीते शीदोरी ।
चला बंधु तेथवरी । वाट तूम्हानं साजरी ॥
बाप करी बोळवण । माय करी नाडातोडा ।
बंधु शीनगारीतो घोडा । दावनींची गाय सोडा ॥
बोळवन केली । हलक्या तोलाची ।
बापाजीनं देली । गाय बैलाच्या तोलाची ॥
लुगणं घेतलं । पदराला मासा ।
कीती पडल्यात वीसा । माझ्या बंधवाला पूसा ॥
लुगडं घेतलं । पदराला रामसीता ।
माझ्या बापाजीचा । चाटी वळखीचा व्हता ॥
बोळवन केली । मनाला नाहीं आली ।
भाईराजसानी । गाय दावणीची दीली ॥
बोळवन केली । जव मने थोडं थोडं ।
वडिल मागें धाकल्याला । दावणींची गाय सोड ॥
बोळवन केली । पदराला वेळूवन ।
बंधु तुझं भारीपन ॥
मोठया मोठया चोळ्या । चाटी म्हने आहेराला ॥
सांगतो भाईराज । बहिनी आल्या माहेराला ॥
बोळवन केली । बहिणीसकट भाचीची ।
बंधवाला माझ्या जत्रा घडली काशीची ।
बोळवन केली । पदराला बाई सोनं ।
बंधवानं माझ्या । अवधी धुंडीली दुकानं ॥
नांदेड गांवाच्या वाटनं । तांगा कोनाचा पळतो ।
पदर जरीचा लोळतो । भाऊ बहीण बोळवतो ॥
चोखाट साडी । आयाबाया तूमी मना ।
बंधु माझ्या सोयर्याचं । मला मन मोडवना ॥
*
नवं ग नेसतें । जुनं ठेवीतें आडभींतीं ।
भाईराजसाचं माझ्या । भोळं राज्य लूटूं कीती ॥
नवं ग नेसतें । जुनं देतें धरमाला ।
भाईराजसाला । आयुक्ष देणार्याला ॥
*
बहिणीचा आसीर्वाद । भाऊ नांदतो बळी ।
गंगना गेल्या केळी । हात पूरना कंबळीं ॥
बहीणीचा आसीर्वाद । भावाला मानवला वाडा कैलासी बांधला ।
*
लेक नांदाया चालली । आयाबायांची लांबण ।
मागं फीरा ग बायांनों । दूर पल्लयाची मालण ॥
लेक नांदाया चालली । गनगोताची हारन ।
हीच्या डोळ्याच्या कोरानं । गंगा चालली वाहून ॥
*
माय आहे तंवर माहेर । बाप म्हणे येऊं जाऊं ॥
भाच्चे कवनाचे भाऊ । मना नको आशा लाऊं ॥
माय आहे तंवर माहेर । बाप असा तसा भारी ।
बंधवाची धर्मपूरी । भाचीयाची लंका दूरी ।
अशी भावाची बहीन । बहिन कशानं दूबळी ।
एक्या धुन्याची चोळी । तिनं घातली चुंबळीं ।
मी मापल्या घरीं । दूबळी नांदतें ।
मायबाप बंधवाला । तुम्हां भाग्याची सांगतें ।
मी मापल्या घरीं । नको करुं माझा घोर ।
मायबाई माझे । मला वाटतं माहेर ॥
मी मापल्या घरीं । नको करूं माझी चिंता ।
मला देलं भाग्यवंता ॥