Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह १

"सासरच्या वाटे कुचुकुचू काटे"

*

अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारीतं

अस्सं माहेर गोड बाई खेळाया धाडीतं"

*

"तुपातलं कारलं आजीरलं ग सई

गोजीरलं ग

कोण्या सुग्रीणिनं रांधलंन्‌ ग सई

रांधलं ग...."

*

"नणंदा भावजया दोघीजणी

शिंक्‍यावरचं लोणी खाल्लं कोणी...."

*

"तुपांत तळली, साखरेंत घोळली

जिलबी बिघडली...."

*

रुणझुणत्या पांखरा रे

जा माझ्या माहेरां

कमानी दरवाजा रे

त्यावरी बैस जा

घरच्या आईला रे

सांगावा सांग जा

दादाला सांग जा रे

ने मला माहेरा

*

नवरी पाहूं आले आले गडाचे गणपति

भांग तुर्‍या लक्ष मोतीं उषाताईच्या

*

उभ्या मी गल्‍लीं जातें खडा हालना भुईचा

येल शीतळ जाईचा

उभ्या मी गल्‍लीं जातें नीट धरुन पासवा

कुन्या गरतीचा कुसवा

उभ्या मी गल्‍लीं जातें न्हाई हालत पापनी

नांव बापाचं राखुनी

*

नदीच्या पल्याड ग काडी हालती लव्हाळ्याची

तिथं माजी हैती बाई मामा मावशी जिवाळ्याची

हिरव्या चोळीवरी कुणीं काढीली गवळण

ह्या ग नारीला सांगू किती घरीं हौसची मावळण

उचकी लागयिली कां ग उचकी तुजी घाई

मायेच्या आज्जीनं ग सई काडीली कशा पाईं

जागा बगुनी दिल्या पागा वतनं बगूनी दिल्या लेकी

चुलत्या ग दौलताला शाना चातुर म्हनूं किती

*

लुगडयाची घडी बाई यीना ग माज्या मना

बापा नेसूं दे तुमच्या सुना

*

हलदीनं साडी रंगलीय गो

लग्नाचं पातळ आणलंय गो

*

देवळाचे दारीं कोगबीवर कोगबा दाटली वो दाटली वो

ती कोगबा तोडुनी भरील्या परडया

सयांच्या साडया रंगविल्या वो रंगविलेल्या वो

ती साडी नेसली चंद्राची भारजा न्‌

तुळशी पुंजायला गेली वो, गेली वो

तुळशी पुंजतांना चांदसूर्व्या पुसतो

साडीचं मोल काय बोला वो, बोला वो

दोन लाख साडी न्‌ लाखाची चोळी

चुडयाला गणीत न्हाई वो, न्हाई वो

*

ताला भरला राते कंबलांनीं

एकेक कंबाल भोलूबाईचे पूंज

भोलबाईनं यावं

वाजंत्री तुर्‍यांनीं

*

आवातनं गेलं पाटलाच्या देवा

पाटलाच्या देवानं येवावं

नवर्‍याला हळद लावावी

आवातनं गेलं चांदसूर्व्या देवा

चांदसूर्व्या देवांनीं येवावं

नवरीला हळद लावावी....

*

मांडवाच्या दारीं हळदीबाईचं वाळवान

नवर्‍या बाळाला केळवान

मांडवाच्या दारीं हलग्या शिंग्याची एक घाई

नवरा कळशीं पाणी न्हाई

वाजंत्री वाजत्याती पानमळ्याच्या टिपरीखालीं

नवरा सोन्याच्या छत्रीखालीं

*

कृष्णदेवजी नवरा झाला

शिरीं बाशींग तुरा लेला

मोडीव मंदील भगवान्‌ लेला

कृष्ण ग देवाच्या नवरीसाठीं

तोडे घडवीले मध्यान्‌रातरीं

पैंजण जडवीले नानायापरी

*

झुन्‌ झुन्‌ वाजंत्री वाजती म्होरं कळवातनी नाचती

नवरा आला शिवेपाशीं शिवपुंजान देईन

नवरी जितून नेईन

*

"पाऊस येतो झिरीमिरीं भिंती झाल्या काळ्या, सोनाराच्या पोरीच्या लांब भिगबाळ्या"

*

"जैसे न सांगणे वरी । काळा पतीसी रुप करी ।

बोलु निमालेपणें विवरी । अचर्चा तें"

*

"आला आला रुखवत त्यावर ठेवला दागिन्यांचा डबा, आंत उघडून बघतें तर इंद्रलोकींची सभा."

*

आधीं ववी गातें बाप्पाजी रायाला

मागून हळदीच्या येलाला मायबाईला

राया बाप्पाजी चंदन मायबाई गोंदन

मला झाली वाट दोही झाडांच्या मधून

बाप्पाजी समींदर बया मालन व्हाती गंगा

दोघांच्या सावलींत कर आंगळ शिरीगंगा

बाप्पाजीराया माझा समींदराचा ग साठा

माय मालनीचा बाई गंगेचा ताफा मोठा

माझ्या गौळणीचं दूध अमृताचा पान्हा

सावळ्या बंधुराया वाटून पिऊ सरावना

माझे ग मायबापा सये तुळशीची रोप

त्येंच्या ग सावलीला लागून गेली झोप

*

माझी ग जातकूळ कोण पुशीतो भंजूळ

चला दावीतें आजूळ

माझी ग जातकूळ कोण पुसत खांदीगुंदी

सुर्ती रुप्पाया खरी चांदी

माझ्या बाप्पाजीचं कूळ काय पुसशील भल्या गडया

तुला सांगतें सात पिढया

माझ्या काकाजीचं कूळ काय पुसतां तुमी दाजी

उच्च कुळीची माझी आजी

*

उभ्या गल्लीनं जातें पदराची बंदोबस्ती

मला ताकीद केली होती

उभ्या गल्लीनं जातें घेऊ पदर कुठवरी

चौक्‍या बसल्या वाटेवरी

उभ्या गल्लीनं जातें म्यां सोडीना पासवा

गरती माजीचा कुसवा

उभ्या गल्लीनं जातें चालनी माझी तशी

शान्या तुजी मी मावशी

उभ्या गल्लीनं जातें बघतें मी मातीला

माझ्या अस्सल कुळीला

*

सासूचा सासूरवास कोणापाशीं सांगूं देवा

मनधरनीचा यावा बंधुराया

सासूचा सासुरवास सोशीतें नखींबोटीं

अशीलाच्या नांवासालीं बंधुराया

सासूचा सासुरवास किती सोसावा हरनी

येक्या भ्रताराकारनीं मायबाई

*

परपंचाचा गाडा लोटतां लोटना

हात लावा नारायणा देवराया

*

माहेराची वाट कोण पुशीती यशवदा

सांगीतें तुला बाई माडी दिस कळसासुद्धां

जिवाला वाटतं पांखराच्या पायीं जावं

वाडयावरी उतरावं बंधुजीच्या

धन संपता ग बाई काय करावी लोकाची

मला सावली झोकाची बाप्पाजींची

देवा नारायणा आगाशीं तुझी छाया

अमृत द्यावा प्याया बंधु माझा

ववी मी गातें बाई देसाई सागराला

निरशा दुधाच्या घागरीला भाईराया

*

'गुळ्ळव मण्ण तरलिल्ल, गुलगुंजचि आडलिल्ल

सुळ्ळ होत येन्‌प्यव्वा नागंरपंचमी ॥ सुव्वा नारी ॥'....

*

भाईराजा परीस भावज मालन चांगली

राया देसायाला घडी रंगाची लागली

मालन कुंकूं लावी बारीक गव्हायनी

भाईराजसा माझ्या रुप तुला देवावानी

सावळी भावजय जशी शुक्राची चांदणी

चंद्र डुलतो आंगनीं भाईराजा

*

बंधुजी म्हनीयीतो भैना दिल्या घरीं र्‍हावं

भांडं न्हवं तें बदलावं

आज सासूरवाशीन घरी जात्याचं झाडनं

उद्यां फिटल पारनं

*

वाटेच्या वाटसरा नको करुंस उभा घोडा

कंथ माझा जंगलांत मोजे वाघिणीच्या दाढा

*

थोरलं माजं घर हंडया गल्लास लोंबत्याती

सासूबाईचं बाळराज धनी वाडयाला सोबत्याती

हिरव्या चोळीनं ग दंड करीतो रसारसा

हावसा कांतायानं छंद पुरविला हवा तसा

*

गोड भरताराचं सुख सये सांगतां येतां जातां

भर दिवसा डोलला ग बाई सुख्या पाणी पितां

माडीवर ग माडी सये सासर मामाजीची

उभी राहुन बघतें मी लंका तिथून म्ह याराची

*

गुज बोलायाला दार माळीचं ढकलाव

लाडके भैनाबाई मग हुरदं उकलावं

दिव्याला भरायान घाला दिव्याला जोडवाती

लाडके भैनाबाई गुज बोलूंया सार्‍या रातीं

*

अंतरीचं गुज माज्या हुरदीं झाली गोनी

मायेची शेजी माजी माप घेनार झाली रानी

*

सदरीं सोप्यामंदी नारुशंकर तांब्या लोळे

लाडका बाळराज माजा जावळाचा खेळे

रांगत रांगत बाळ जातं या उंबर्‍यांत

लाडका बाळराज हिरा झळकतो बंगल्यांत

*

तुझ्या गालावरी कुणीं ग गोंदलें

फूल कुणी ग टोचलें गुलाबाचें

*

माझे हे कीं चुडे बत्तीस बंदांचे

तेत्तिस कोटी देवाजींचे आशीर्वाद

*

समुद्राच्या पाण्या स्वस्थता अणु नाहीं

नाचतें हालतें सदा खालींवर होई

*

सूर्य उगवला किरीट किरणांचा

पांखरा फुटे वाचा झाडांवरी

*

माझें तान्हें बाळ देवाचें मंगल

अमृताचें फळ संसाराचें

*

जिवाच्या जिवलगा प्रेमाच्या सागरा

सुखाच्या माहेरा येई गा तूं

अपराध पोटीं प्रेम थोरांचे घालित

येई धांवतधांवत भाईराया

नको धन नको मुद्रा नको मोतियांचे हार

देई प्रेमाश्रूंची धार भाईराया