Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह १७

सासुरवाशी सून रुसोनी बसली कैसी

यादवराया राणी रुसोनी बसली कैसी

सासू गेली समजावयाला

"चला चला सूनबाई अपुल्या घराला

अर्धे राज्य देतें तुम्हाला"

"अर्धे राज्य नको मला

मी नाहीं यायची तुमच्या घराला" । सासुरवाशी----

सासरा गेला समजावयाला

"चला चला सूनबाई अपुल्या घराला

साखळ्यांचा जोड देतों तुम्हाला"

"साखळ्यांचा जोड नको मला

मी नाही यायची तुमच्या घराला" । सासुरवाशी----

दीर गेला समजावयाला

"चला चला वहिनी अपुल्या घराला

विटीदांडू देतों तुम्हाला----"

"विटीदांडू नको मला

मी नाही यायची तुमच्या घराला" । सासुरवाशी----

जाऊ गेली समजावयाला

"चला चला बाई अपुल्या घराला

"खाऊ कांही नको मला

मी नाहीं यायची तुमच्या घराला" । सासुरवाशी----

नवरा गेला समजावयाला

"चला चला राणीसाहेब अपुल्या घराला

मंगळसूत्र देतों तुम्हांला"

"मंगळ्सूत्र पाहिजे मला

मी येतें तुमच्या घराला"

यादवराया राणी घरासी आली कैसी

सासुरवाशी सून घरासी आली कैसी

*

नणंदा भावजया खेळत होत्या

खेळतां खेळतां भांडण झालें

डाव आला भावजईवर

रुसून बसली गाईच्या गोठयांत

यादवराया राणी रुसोनी बसली कैसी

*

सासू - अर्धा संसार

सासरा - दौत टाक

दीर - विटी दांडू

जाऊ - डेरा, नथ

नणंद - खेळ

*

पति गेले समजावयाला

"चला चला राणीसाहेब आपल्या घराला

लाल चाबूक देतों तुम्हाला"

उठली ग उठली सरसावून

पदर घेतला आवरुन

कापत कापत घरासी आली

सासुरवासी सून घरासी आली कैसी

*

नदीच्या अलिकडे राळा पेरला बाई राळा पेरला

एके दिवशीं काऊ आला बाई काऊ आला

एकच कणीस तोडून नेलं बाई तोडून नेलं

सईच्या आंगणांत टाकून दिलं बाई टाकून दिल

सईनं उचलून घरांत नेलं बाई घरांत नेलं

कांडून कुटून राळा केला बाई राळा केला

राळा घेऊन विकायला गेली बाई विकायला गेली

पांच ( त्याच ) पैशाची घागर आणली बाई घागर आणली

घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली

मधल्या बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला

आला माझ्या सासरचा वैद्य

डोक्याला टोपी फाटकी तुटकी

कपाळाला टिकला शेणाचा

तोंडांत विडा काळाही काळा

कपाळाला गंध शेणाचें

अंगांत सदरा चिंध्या बुंध्या

नेसायला धोतर फाटकें तुटकें

पायांत जोडा लचका बुचका

हातांत काठी जळकें लांकूड

कसा गा दिसतो भिकार्‍यावाणी बाई भिकार्‍यावाणी ॥

आला माझ्या माहेरचा वैद्य

डोक्याला टोपी जरतारी

कपाळाला टिकला केशरी

तोंडांत विडा लालही लाल ( कस्तुरीचा )

अंगात सदरा रेशमी ( मलमली )

नेसायला धोतर जरीकांठी ( रेशीमकांठी )

पायांत जोडा पुणेशाही

हातांत काठी पंचरंगी

कपाळाला गंध केशरी

कसा ग दिसतो राजावाणी बाई राजावाणी ॥

*

अक्कणमाती चिक्कणमाती खळगा तो खणावा

असा खळगा सुरेख बाई जातं ते रोवावं

असं जातं सुरेख बाई सपीट दळावं

असं सपीटं सुरेख बाई करंज्या कराव्या

अशा करंज्या सुरेख बाई तबकीं ठेवाव्या

असें तबक सुरेख बाई रुमाल झांकावा

असा रुमाल सुरेख बाई पालखींत ठेवावा

अशी पालखी सुरेख बाई वाजंत्री लावावी

अशी वाजंत्री सुरेख बाई मिरबण काढावी

अशी मिरवन सुरेख बाई माहेरां धाडावी

असं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं

असं सासर द्वाड बाई कोंडुनी मारितं

*

जो जो रे जो जो नंदन हरी

हरीचा पाळणा यशोदे घरीं

पहिले मासीं सासू कीं पूसे

"सूनबाई, सूनबाई डोहाळे कैसे ?"

"माझे की डोहाळे पुरवावे सासू

बाजारीं जाऊनी आणावा काजू" ॥ जो जो रे

दुसरे मासीं सासरा कीं पूसे

"सूनबाई सूनबाई डोहाळे कैसे ?"

"माझे की डोहाळे पुरवावे सासर्‍या

बाजारीं जाऊनी आणाव्या साखर्‍या " ॥

तिसरे मासीं दीर की पूसे

"वहिनी बहिनी हो डोहाळे कैसे ?"

"माझे की डोहाळे पुरवावे दीरा

दुकानीं जाऊनी आणावा हिरा" ॥

चवथे मासीं जाऊ की पुसे

"बाई बाई हो डोहाळे कैसे ?"

"माझे की डोहाळे पुरवावे जाऊ

बाजारीं जाऊनी आणावा खाऊ" ॥

पांचवे मासीं नणंद की पुसे

"वहिनी वहिनी हो डोहाळे कैसे ?"

"माझे की डोहाळे पुरवावे वन्सं

वाडीत जाऊनी आणावीं कणसं" ॥

सहावें मासीं बहीण की पुसे

"ताई ताई ग डोहाळे कैसे ?"

"माझे की डोहाळे पुरवावे बहिणी

बागेंत जाऊनी घालावी वेणी" ॥

सातवे मासीं भाऊ की पुसे

"ताई ताई ग डोहाळे कैसे ?"

"माझे की डोहाळे पुरवावे भावा

बाजारीं जाऊनी आणावा खवा" ॥

आठवे मासीं बाप कीं पुसे

"लेकी लेकी ग डोहाळे कैसे ?"

"माझे कीं डोहाळे पुरवावे बापा

सरी बिंदलें घडवायला टाका" ॥

नववे मासीं माय की पुसे

"लेकी लेकी ग डोहाळे कैसे ?"

"माझे की डोहाळे पुरवावे माय

खोली सारवून तयार ठेव" ॥