संग्रह २
बहिणा जातीया सासराला हात करीत गडणीला
घोडं लागलं चढतीला लवंगा टाकीतें फोडणीला
*
लेक निघाली सासरीं तिच्या ओटींत घाला गहूं
ज्याची त्यांनीं नेली सई चला माघारी जाऊं
*
बाळ सासर्याला जाती मागं फिरुन हे ग पाहती
माझ्या बाळीला सांगी देती संगं मुराळी चंद्रज्योती
*
बाळ सासुगर्याला जाते वेशी पातुर आयाबाया
कडे पातुर बंधुराया
*
बाळ सासुगर्याला जाते तीका येशींत झाली दाटी
बंधु हौशा पानं वाटी
*
बंधुजी घेतो चोळी भावज गुजरी पुढंपुढं
दोघांच्या सावलीनं माझ्या चोळीला रंग चढं
*
बंधुजी घेतो चोळी भावज गुजरी देइना दोरा
चांदाच्या उजेडांत काय चांदनी तुझा तोरा
*
पाटानं पाणी जातं सरळ सापावाणी
बंधू इमानी बापावाणी
लुगडं घेतीयलं दोन्ही पदर टोपायाचे
माझ्या बंधूजीचे इष्ट मैतर गोकाकाचे
हिरव्या चोळीवरी राघू काढीती कुंकवाचा
बंधु मुराळी हुकूमाचा
*
दुबळ्या भर्ताराचे मी गा लोटुनी राहितें घरदार
सम्रत बंधुजीचा नको करुसा कारभार
*
सारव्या गोतामंदी नंदबाईची आवईड
माझ्या पती पाटची शालजोड
*
नणंद आक्काबाई तुम्हीं नणंदपना दावा
सोन्याच्या करंडाला तुम्हीं मोत्याचे घस लावा
*
सासुरवास माझ्या देव्हार्यावरलं सोनं
त्यांच्या उजेडांत मी लोटतें चारी कोन
सासू नी सासईरा माझ्या वाडयाच्या आडभिंती
नंद कामिनी पार्वती माझ्या चुडयाला शोभा देती
सासू सासईरा माझ्या माडीचे कळईस
नणंद आक्काबाई माझ्या दारींची तुळईस
सासु नी सासईरा माझ्या वाडयाची दोन दारं
दोघांच्या सावलीनं नाहीं लागत ऊनवारं
सासूचा सासुरवास सासू नव्ह ती बयाबाई
ताट करुन वाट पाही
सासु सासईरा दोनी शंकर पार्वती
नणंद माझी भागिरथी दीर माझा गणपती
पती माझा चंद्रज्योती
*
हौशा भरताराची सेवा करावी आदरानं
पाय पुसावा पदरानं
भरतार पुशिल्यात कां ग अस्तुरी अबोल्यानं
तुझ्या डोरल्याचं सोनं न्हाई जोखलं ताजव्यानं
गेल्या कुन्या गांवीं माझ्या सईचा मोहन
त्याच्याबिगर ग तिला ग्वाड लागेना जेवन
पिकलं सिताफळ वर हिरवी त्येची काया
सावळ्या भर्ताराच्या पोटांत त्याची माया
रागीट भरतार नागाचा धुस्सकार
मी का हांसूनी केला गार
गांवाला गेलं म्हनूं वाट पाहितें दारांतून
हळदीकुकवाचं जहाज आलंया शेरांतून
हौस भर्ताराची उसुशी कंबळाची ( कमळाची )
माझी ती मैनाबाई ईनी रुतली कुरळाची
*
काजळ कुंकू हळद लागली
कुठूनी तुमच्या गालां
अहो हरी तुम्ही गेला
सवतीच्या महालाला
देवाजीला जातो-सार्या गलीची गेली सारी
हौशा भरताराला किती सांगूं-आटिप तालीवारी
*
गीता नी भागवत माझ्या गळ्याचं होई तें सोनं
बापजी दौलईत त्यानं शिकवलं शहानपन
*
बंधु इवाही करुईल यीनी नाईत माझ्या तोला
सरदार बंधु तुम्हांसाठीं मी शब्द दिला
*
बापानं दिली लेक देस सोडून कोंकणात
आली बापाच्या सपनांत गेंद रुतली चिखलांत
*
अंबर डाळिंबाचा त्याचा आलाय मला काव
बया माझी मालईनी राजवरकी जोडी लाव
भरल्या बाजारांत चोळी देखिली कांदापात
माझी ती बयाबाई मन रुतलं घाल हात
लुगडयाची घडी मी ग टाकीतें चांफ्यावरी
माझा रुसवा बापावरी
लुगडं घेतईलं त्यांत रेशमी कांहीं नाहीं
बंधुजी बोलीयतो बहिणा एवढयानं झालं नाहीं
*
सयांनों पाहूं चला बहिणा माजीचा सवंसार
इच्या नवर्याचा कृष्णदेवाचा अवतार
*
"उभ्या मी गल्लीं जातें
दंड भुजया झांकोनी
नांव पतीचं राखोनी
*
डाळी डोरल्याचं सोनं सोनाराच्या दुकानाचं
कपाळीचं कुंकूं बरहम्देवाच्या ठिकाणींचं