Android app on Google Play

 

हिस्टेरिया

 

अंगात येण्याचा चौथा आणि सर्वात गंभीर प्रकार म्हणजे हिस्टेरिया किंवा भ्रमिस्टावस्था. यात मानसिक विघटन महत्वाचे असते. समजा एखादया बाईला लग्नानंतर खूप वर्षे होऊनही मुल होत नाही. घरच्यांची बोलणी खावी लागतात, नवरा दारू प्यायला लागतो व मारतो. चूक बाईची असेच सर्वांना वाटते. अशावेळी त्या बाईला आरती ऐकली, घंटानाद ऐकला की तिची शुद्ध हरपते, केस मोकळे सोडून ती घुमायला लागते. त्यावेळी तिला सासू, शेजारी-पाजारी, नवरा कुणीही त्रास देत नाही. काहीवेळा अंगात देवी आली की शुद्ध हरपल्यासारखी जोरजोरात ओरडते. एरवी सुतासारखी सरळ असली तरी "त्या" वेळी नवऱ्याची अक्षरशः गचांडी धरते. मुळूमुळू रडणारी, कधीही अपशब्द न बोलणारी ही सून अस्खलित शिव्या दयायला लागते! हा तिच्या अबोध मनाने धारण केलेला प्रकट अविष्कार असतो.