देवीचा प्रकोप
अंगात येण्याचा हा प्रकार बहुदा देवाच्या, देवीच्या आरतीच्या वेळी, पालखीच्या वेळी घडताना दिसतो. ज्या बाईच्या अंगात येते ती सुरुवातीला स्तब्ध होते, डोळे जडावल्यासारखे होतात. डोके व शरीराचा वरचा भाग हळूहळू फिरायला लागतो. हात आपोआप उचलले जातात. तोंडातून ह्युं S S ह्युं S S असा आवाज यायला लागतो. थोडयाच वेळात या सर्व हालचालींचा वेग वाढतो. त्या स्त्रीच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटतो. त्यातच इतर स्त्रिया पुढे जाऊन तिचा घाबरत घाबरत मळवट भरतात, नमस्कार करून बाजूला होतात. लहान मुले "तो" अवतार बघून घाबरून जातात.
आता त्या बाईच्या अंगात आलेल्या देवीने तिचा चांगलाच ताबा घेतलेला असतो. घुमण्याचा आणि हुंकाराचा सूर टिपेला जातो. देवी आता सर्व उपस्थित भक्तसमुदायाला कडक शब्दात सूचना देऊ लागते. आपला प्रकोप का झाला तेही असंबद्ध भाषेत सांगू लागते. पालखी झाली, शेजारती झाली की अंगात आलेली देवी हळूहळू बाहेर पडते. ती बाई शुद्धीवर येते तेंव्हा तिला आपण काय केले तेही आठवत नाही. तिच्या अंगात काही काळ का होईना पण देवी येते त्याचा अर्थ ती बाई अध्यात्मिक द्रुष्ट्या इतरांपेक्षा उच्च दर्जाची असल्याचाच निर्वाळा मानला जातो. अशा बाईच्या बाबतीत मग अंगात येण्याच्या प्रकाराची सतत पुनरावृत्ती होताना दिसते.