Android app on Google Play

 

इस्लामी संस्कृती

 

कर्मठ सनातनी इस्लामला चित्रकला, गाणे बजावणे इ. गोष्टी वर्ज्य आहेत. सूफी संतांच्या मठांतून धार्मिकगीते गाण्याससुद्धा उलमांचा विरोध असे. सूफी पंथाला मान्यता मिळाल्यानंतर गायनकला विकसित झाली. प्रत्येक मशिदीला जोडून पाठशाळा किंवा मदरसा असण्याचा प्रघात अकराव्या शतकापासून पडला. त्यांत मुख्यत: धार्मिक शिक्षण दिले जाते. पण या सर्व परंपरा १००० ते ११०० नंतरच्या. त्याअगोदर अरबी मुसलमान विचारवंतांनी आणि विद्वानांनी इस्लामी संस्कृती उभारण्याचे भगीरथ प्रयत्‍न केले होते. सनातन इस्लामच्या उदयानंतर हे सर्व प्रयत्‍न बंद पडले.यूरोपमध्ये ख्रिश्चन धर्माचा पगडा बसल्यावर प्राचीन-विशेषत: रोमन आणि ग्रीक- संस्कृतींची पाळेमुळे नष्ट करण्यास आरंभ झाला. ख्रिस्तापूर्वीचे ज्ञान ते खरे ज्ञान नव्हेच, या आवेशाने ग्रीक विद्वानांची हकालपट्टी करण्यात आली. आपले ग्रंथ घेऊन सहाव्या आणि सातव्या शतकांत हे विद्वान यूरोप सोडून इराक, इराण या देशांत स्थायिक झाले. आठव्या शतकात अरब विद्वांनानी तत्वज्ञान, शास्त्र आणि कला इ. विषयांवरील ग्रीक ग्रंथांचा अभ्यास सुरू केला. या ख्रिस्तपूर्व विद्वत्तेची त्यांच्यावर एवढी छाप पडली, की त्यांनी या सर्व ग्रंथांची अरबी भाषांतरे करण्याचा सपाटा सुरू केला. संस्कृत भाषेतील अनेक ग्रंथांची भाषांतरेही  अरबीत झाली. नवव्या  शतकापासून या ज्ञानाची जोपासना करून त्यात भर घालण्यापर्यंत अरबी विद्वानांनी प्रगती केली. आज अ‍ॅरिस्टॉटल, प्लेटो इ. तत्ववेत्त्यांची मूळ पुस्तके अस्तित्वात नाहीत; तथापि अरबी भाषांतरांवरूनच अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांत यूरोपियनांनी या आपल्या अमोल ठेव्याचे पुनरुज्‍जीवन केले. गणित, बीजगणित, भौतिकी, रसायनशास्त्र, इतिहास, भूगोल आणि खगोलशास्त्र यांत अरबी विद्वानांनी मौलिक भर घातली. अ‍ॅरिस्टॉटल आणि प्लेटो यांच्या तत्त्वज्ञानावरील भाष्ये अरबीत तयार झाली. ग्रीक वैद्यकाचा आणि अरबी वैद्यकाचा मिलाफ होऊन नवे यूनानी वैद्यक तयार झाले. युद्धशास्त्रात प्रगती झाली आणि नवी शस्त्रे तयार करण्यात आली.या नवीन ज्ञानाचा फायदा इस्लामी साम्राज्यास झाला. त्या वेळच्या जगात अरबी संस्कृती वैभवाच्या शिखरावर पोहोचली होती. यामुळेच इतर देशांतील मुसलमानांना, विशेषत: तुर्कांना, इस्लामधर्म स्वीकारल्यानंतर ही संस्कृती आत्मसात करता आली. पुढे तुर्कांनी इस्लामी साम्राज्यावर ताबा मिळविला. त्यानंतर ३०० ते ४०० वर्षेपर्यंत इस्लामी राज्यांना, संबंध यूरोपीय देश एकजुटीने विरुद्ध उभे राहिले असूनसुद्धा, विजय मिळविले. मुस्लिम राज्यांना या लढायांत आपल्या श्रेष्ठ ज्ञानामुळे, नव्या युद्धतंत्राच्यायोगे आणि आधुनिक शस्त्रांमुळे इतर सर्वांशी दोन हात करून विजय मिळविण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांत यूरोपीय संस्कृती इतर संस्कृतींच्या जेवढी पुढे होती, तेवढीच इस्लामी संस्कृती अकराव्या ते पंधराव्या शतकांमध्ये इतर संस्कृतींच्या पुढे होती. यूरोपात सहाव्या शतकात जे घडले, तेच इस्लाममध्ये दहाव्या आणि अकराव्या शतकांत घडले. त्यामुळे इस्लामी संस्कृतीची पुढील प्रगती रोखली गेली. तथापि जे ज्ञान आणि तंत्र आत्मसात केले गेले ते विसरणे शक्यच नव्हते.