Get it on Google Play
Download on the App Store

इस्लाम धर्म

इस्लाम धर्मसंस्थापक मुहंमदांचा कालखंड इ. स. ५७१ ते ६३२ हा होता. सबंध अरबस्तानचे धार्मिक तीर्थक्षेत्र आणि सर्वांत मोठे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या मक्का शहरात ते जन्मले. त्यांच्या जन्मापूर्वी शेकडो वर्षे अरबस्तानावर रोमन आणि इराणी साम्राज्याची अधिसत्ता होती. परंतु ही दोन्ही साम्राज्येखिळखिळी झाली होती. मक्का, यस्त्रिब (मदीना), ताइफ यांसारख्या शहरांना स्वायत्तता होती. इतरत्र ठिकठिकाणी ज्यू, ख्रिश्चन जमातींच्या वसाहती आणि भटकणाऱ्या अरब टोळ्यांचे तांडे पसरलेले होते. मक्केची यात्रा हा त्या काळीही अरब जीवनातील एक महत्वाचा भाग होता. प्रत्येक अरब टोळीच्या कुलदेवता असत आणि या कुलदेवतांच्या मूर्ती, मक्केच्या भव्य काबा मंदिरात ठेवलेल्या असत. वर्षातून एकदा मक्केची यात्रा करून आपल्या कुलदैवताची पूजा करण्याचा टोळीवाल्यांमध्ये प्रघात होता. काबा मंदिरात येशू आणि मेरी यांची भव्य चित्रेही होती. सर्व अरबांचे यात्रास्थान असल्यामुळे काबा मंदिराचे उत्पन्नही मोठे होते. मक्का शहरावर कुरैश जमातीचे वर्चस्व होते. कुरैशांच्या निरनिराळ्या घराण्यांकडे मक्का शहराची आणि देवालयाची व्यवस्था ठेवण्याच्या कामगिऱ्या होत्या. कुरैश लोक व्यापारातही खूप पैसा कमावीत. कुरैशांच्या बानी हशिम या घराण्यात ]मुहंमद पैगंबरांचा जन्म झाला. विसाव्या वर्षांपासून तेथील एक श्रीमंत विधवा खदीजा हिच्या मोठ्या व्यापाराचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहण्यास सुरुवात केली. त्या निमित्ताने उंटांच्या काफिल्यांबरोबर त्यांनी सबंध देश पालथा घातला होता. पुढे त्यांनी खदीजाशीच विवाह केला.त्या काळातही अरबी भाषा बरीच प्रगत होती. अनेक सुंदर कवने, लोकगीते आणि पोवाडे लोकांच्या जिभेवर असत. इतर मागासलेल्या समाजांत जशा अनेक खुळ्या समजुती आणि रीतिरिवाज असत, तसेच वेगवेगळ्या अरब जमातींत आणि टोळीवाल्यांमध्येही ते प्रचलित होते. अरबी भाषा आणि मक्केचे तीर्थस्थान हेच त्यांना एकत्र जोडणारे दुवे होते. प्रत्येक टोळीतील लोक एकमेकांविषयी बंधुभावाने वागून टोळीची एकजूट अभेद्य राखीत. टोळीप्रमुखं सर्वांत वयोवृद्ध आणि शहाणा असा निवडला जात असे. त्याच्या आज्ञा सर्वजण मानीत. परंतु इतर टोळीवाल्यांशी मात्र त्यांचे जवळजवळ हाडवैरच असे आणि त्यामुळे टोळीवाल्यांच्या आपापसात सदोदित लढाया चालत. ठिकठिकाणी वसाहती करून राहिलेल्या ज्यू आणि ख्रिश्चन जमाती मात्र यापासून दूर राहत. व्यापाराच्या निमित्ताने तिन्ही शहरांत ज्यू आणि ख्रिश्चन कुटुंबेही राहत असत.
व्यापारामुळे आणि देवस्थानाच्या उत्पन्नामुळे मक्केची भरभराट झाली होती. परंतु पैसा कमावण्यासाठी श्रीमंत लोक फसवाफसवीही करीत असत. देवस्थानसुद्धा यापासून मुक्त नव्हते. सावकारी पाशांनी काही श्रीमंतांनी गरीब जमातींना जखडून टाकले होते. हे लोक देवाचे नव्हे, तर पैशाचे पुजारी आहेत अशी त्यांना कुप्रसिद्धीही मिळाली होती. त्यामुळे अनेक़जण अबरस्तानमध्येच वाढलेल्या हनीफ पंथाकडे आकर्षित होत. हनीफ पंथाच्या लोकांची एकेश्वरवादावर गाढ श्रद्धा होती. मूर्तिपूजा आणि इतर धार्मिक सणांऐवजी टेकडीवर जाऊन एकांतात अमूर्त परमेश्वराचे ध्यान करण्याचा रिवाज हनीफ पंथीयांत होता. ईश्वर एकमेवाद्वितीय आहे हे हनीफांचे तत्त्व असल्यामुळे ज्यू धर्मीयांना ते जवळचे मानीत. मुहंमद व्यापाराच्या निमित्ताने सर्वत्र फिरत असल्यामुळे, अरबस्तानातील वेगवेगळ्या जमातींच्या श्रद्धा आणि रीतिरिवाज त्यांना माहीत असल्यास आश्चर्य नाही. मुहमंद स्वत: हनीफ पंथाकडे आकर्षित झाले होते.वयाच्या चाळीसाव्या वर्षी नेहमीप्रमाणे मक्केजवळील हिरा टेकडीवर ध्यान करीत असता मुहंमदांना गेब्रिएल या देवदूताचे दर्शन झाले. ज्यू आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मांचे लोक गेब्रिएलला मानीत असत. गेब्रिएलकरवी मुहंमदांना ईश्वरी संदेश वाचण्याची आज्ञा झाली. तेव्हापासून पुढील बावीस वर्षे अधूनमधून त्यांच्या मुखातून उत्स्फूर्त अशी वाणी बाहेर पडत असे. त्याचा संग्रह कुराण (कुओन) म्हणून प्रसिद्ध आहे. कुराण याचा अर्थच ‘मोठ्याने वाचन’ असा आहे. धार्मिक कारकीर्दीतील पहिली अकरा-बारा वर्षे कुराणपठन आणि उपदेश करण्यात घालविल्यानंतर मुहंमदांना मक्का सोडून मदीनेस जावे लागले. तेथे लोकांनी त्यांच्या हातात राजसत्ता सोपविली. पुढील दहा वर्षांत त्यांनी सर्व अरबस्तान एकछत्री अंमलाखाली आणला. अरबस्तान शंभर टक्के मुसलमान देश झाला.